आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी नौदल हिंद महासागरातील चिनी पाणबुड्यांची माहिती भारताला देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - भारत आणि जपानमध्ये सोमवारी टोिकयोत १३ वी शिखर परिषद झाली. तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी हाय स्पीड ट्रेन आणि नौदल सहकार्यासह ६ करारांवर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांत टू प्लस टू चर्चा होईल. मोदींनी अॅबेंसह पत्रपरिषदेत सांगितले की, डिजिटल भागीदारीतून सायबर स्पेस, आरोग्य, संरक्षण, समुद्रापासून अंतराळात सहकार्य वाढवण्यावर आमची सहमती झाली. जपानी कंपन्या भारतात १८ हजार ३६२ कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. भारतीय शहरांतील मेट्रो प्रकल्पांतही जपान सहकार्य करेल.

 

भारतीय नौदल आणि जपानच्या मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सदरम्यान महत्त्वाचा करार झाला. त्यानुसार जपानचे नौदल हिंद महासागरात चिनी पाणबुड्यांच्या प्रत्येक हालचालीची माहिती भारताला देईल. दोन्ही देश भारत-प्रशांत भागात शांतता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करतील. तेथे चीन स्वत:ची ताकद वाढवत आहे. दोन्ही देशांत एक नियम-आधारित आणि समावेशक व्यवस्थेसाठी एकत्र काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

 

मोदी: भारत-जपानचे संबंध लोकशाही मूल्यांवर आधारित
मोदी म्हणाले, टोकियोत ज्या आत्मीयतेने माझे स्वागत झाले, त्यामुळे माझा प्रवास आणखी अविस्मरणीय झाला. मानव विकास जुने आणि नवे यांतील टक्कर नाही, तर सामंजस्य आहे हे जपानने शिकवले आहे. भारत आणि जपानमध्ये खूप साम्य आहे. दोन्ही देशांचे संबंध लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. मोदींनी जपानला जी-२० परिषद, रग्बी वर्ल्ड कप आणि २०२० ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या.

 

अॅबे : भारत-जपानमध्ये जगात सर्वात चांगले द्विपक्षीय संबंध
अॅबे म्हणाले की, जपान आणि भारताचे संबंध जगातील सर्वात चांगल्या द्विपक्षीय संबंधांपैकी एक आहेत. भारताचे पंतप्रधान कठोर निर्णय घेणारे भक्कम नेते आहेत. संरक्षण, अंतराळ आणि सायबर सहकार्य आणखी भक्कम करण्यासाठी दोन्ही देशांत सहमती झाली आहे. आयुष्मान भारत आणि आशिया वेल्फेअर बीइंगशी जोडून आरोग्य सुविधा आणखी चांगल्या करू. जपान भारताच्या नेतृत्वात आंतररराष्ट्रीय सौर आघाडीतही आगेकूच करेल.

 

भारतीय समुदाय : मोदींना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, म्हणाले- दिव्याप्रमाणे जगाच्या प्रत्येक भागात देशाचे नाव उज्ज्वल करा
भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, दिवा जसा उजेड पाडतो तसेच तुम्हीही जपान आणि जगाच्या प्रत्येक भागात देशाचे नाव उज्ज्वल करा. या वर्षी पटेल जयंतीची चर्चा जगभर होईल. त्यांची  प्रतिभा जेवढी उंच होती, पुतळाही तेवढाच उंच होईल. मोदींनी बिझनेस लीडर फोरममध्ये व्यावसायिकांची भेट घेतली. ते ‘मेक इन इंडिया, आफ्रिकेत भारत-जपानची भागीदारी आणि डिजिटल भागीदारी’ परिषदेत सहभागी झाले.

 

सहकार्य : दोघांचे लष्कर, वायुदल मिझोराममध्ये करतील सराव
परिषदेत भारत-जपानचे लष्कर आणि वायुदलात होणाऱ्या पहिल्या संयुक्त सरावावरही चर्चा झाली. जपानचे ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स १ ते १४ नोव्हेंबरपर्यंत मिझोराम येथील भारतीय लष्कराच्या काउंटर इनसर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूलमध्ये येतील. भारताच्या ईशान्य राज्यांचा जपानशी विशेष संबंध आहे. दुसऱ्या महायुद्धात कोहिमा आणि इम्फाळमध्ये लढताना जपानचे ७० हजारपेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. जपानी वायुदल डिसेंबरमध्ये ‘कोप इंडिया’ संयुक्त सरावात भाग घेईल.


विकास : ईशान्येत रस्ता बनवण्यासाठी जपान ४ हजार कोटी रुपये देणार
जपान भारताच्या नॉर्थ-ईस्ट रोड नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रकल्पात महत्त्वाचा भागीदार आहे. या प्रकल्पात भारताचा ईशान्य भाग मुख्य भारत आणि शेजारी देशांशीही जोडला जाईल. जपानची आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था त्यासाठी ४४८० कोटी रुपये देत आहे. तेथील तीन रस्त्यांचे बांधकाम जपानी कंपन्या करतील. भारतात सध्या जपानच्या १०३९ कंपन्या काम करत आहेत.


पाठिंबा : दोन्ही देशांचे संरक्षण क्षेत्रात हवाई वाहन, रोबोटिक्सवर काम सुरू
फाउंडेशनल लॉजिस्टिक्स सपोर्टबाबतही करार झाला. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात मानवरहित हवाई वाहन आणि रोबोटिक्स क्षेत्रात संयुक्त योजनांना अंतिम रूप दिलेच आहे. भारताला जपानची सोरयू श्रेणीची पाणबुडीही खरेदी करायची आहे. मित्सुबिशी आणि कावासाकीने या प्रकल्पात रस दाखवला आहे.

बातम्या आणखी आहेत...