आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ वर्षीय रेप पीडितेने गर्भपात केला नाही म्हणून जात पंचायतीने वाळीत टाकले, पोलिसांत तक्रार केल्याचाही लावला दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 धुळे - महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील धोंडगीपाडा गाव सध्या चर्चेत आहे. कारण, या गावात जात पंचायतीने एका १५ वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेला कुटुंबासह वाळित टाकले आहे. या मुलीच्या गर्भात वाढणारे अर्भक गोळ्या घेऊन पाडावे, असा पंचायतीचा आदेश होता. परंतु, पीडितेसह तिच्या कुटुंबीयांनीही यास नकार दिला. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या जात पंचायतीने पीडित कुटुंबावर ११ हजार रुपयांचा दंडही आकारला. यामुळे पीडितेचे हाल सुरू आहेत.


साक्री तालुक्यात धोंडगीपाडा हे गाव आहे. पीडितेचे आई-वडील मोलमजुरीसाठी गुजरातला गेले होते. एप्रिलमध्ये ते परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपली मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. एका पंचायत सदस्याच्या नातेवाईकाने मुलीवर अत्याचार केल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. न्याय मिळावा म्हणून या कुटुंबाने सुरुवातीला जात पंचायतीसमोर याचना केली. यावर पंचायतीने गोळ्या देऊन गर्भ पाडावा, असे फर्मान काढले. हा आदेश पीडित कुटुंबाने धुडकावला आणि पिंपळगाव ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पीडितेच्या पित्यानुसार, प्रारंभी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. उलट ‘गावातील प्रकरण गावातच मिटवा’, असा सल्लाही पाेलिसांनी दिला. यावर सामाजिक कार्यकर्ते नवल ठाकरे यांनी हस्तक्षेप केला आणि १९ मे रोजी गुन्हा दाखल झाला. यानंतर जात पंचायत अधिकच भडकली. तक्रार परत घ्या किंवा ११ हजार दंड भरा, असे नवे फर्मान पंचायतीने काढले.

 
सध्या ही अल्पवयीन मुलगी धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात आहे. ३० मे रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. पीडितेच्या आईने पाणावलेल्या डोळ्यांनी ही आपबीती सांगितली... “दोन महिन्यांपासून जात पंचायतीचे सदस्य गर्भपातासाठी दबाव टाकत होते. एक आई पूर्ण वाढलेल्या गर्भाचा जीव घेईल?’ पित्यानेही या प्रकरणात होत असलेली ससेहोलपट कथन केली. ते म्हणाले, “आम्ही गावात गेलो तर लोक तोंडावर वाट्टेल तसे बोलतात.आम्हाला पाणीही भरू दिले जात नाही. पीठाच्या गिरणीवरही आम्हाला टाळले जाते. आता तर मोबाइलवर धमक्या देत आहेत. आम्ही प्रचंड दहशतीखाली आहोत.’ 

 

पीडितेचे वकील विनोद बोरसे यांनी आरोप केला आहे की, पॉक्सो कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी होती. परंतु, मुलीचा जवाब नोंदवण्यापासून नवजात मुलगी व आईचा डीएनए तपासणीपर्यंत टाळाटाळ केली जात आहे. 

 

... तर सुरक्षा व्यवस्था पुरवू :

पीडित कुटुंबाने जात पंचायतीच्या पाच सदस्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याकडे तक्रार केली आहे.  या तक्रारीनंतर दहा दिवस उलटूनही आरोपी फरार कसे, असा प्रश्न केला तेव्हा पांढरे यांनी तपास सुरू असल्याचे सांगत मोघम उत्तर दिले. तपास अधिकारी कसोशीने तपास करत असून तसे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबाने धमक्या येत असल्याची तक्रार दिली तर त्यांना सुरक्षा पुरवू, असेही पांढले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...