आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कम्युनिस्टांनी उभारले जटायू स्मारक..!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुधीर जोगळेकर

प्रभू श्रीराम कधी जन्मले, कुठे जन्मले, ते जिथे जन्मले असे सांगितले जाते ती अयोध्येतली जागा त्यांचे जन्मस्थानच मानायची की, बाबराने बांधलेल्या प्रार्थनास्थळावर हिंदूंनी केलेल्या दाव्याची विवादित जागा मानायची? रामायण हे महाकाव्य मानायचे की कपोलकल्पित कथा मानायची? अशा अनेक प्रश्नांना कायमचा पूर्णविराम देणारा आणि रामलल्लाचे संवैधानिक अस्तित्व कायद्याने मान्य करत अयोध्या हेच प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असल्याच्या हिंदूंच्या आस्थेवर शिक्कामोर्तब करणारा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिला. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

अयोध्या हे शहर वसले आहे उत्तर प्रदेशात, तिथे सरकार हिंदुत्वाविषयी आस्था बाळगणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे, परंतु तिथे राममंदिर व्हावे यासाठी तब्बल ४९१ वर्षे लढा द्यावा लागला. याउलट केरळ हे राज्य 'गॉड्स ओन कंट्री' मानले जाऊनही कम्युनिस्ट राजवट असणारे. परंतु याच कम्युनिस्ट राजवटीच्या मुख्यमंत्र्याने ऑगस्ट महिन्यात तिरुअनन्तपुरमजवळच्या जटायूमंगलममध्ये जटायू अर्थ सेंटरचे उद्घाटन करून रामायणकालीन एका पक्षीयोद्ध्याचे चिरंतन स्मारक खुले केले. हे स्मारक पाहण्याचा योग अलीकडेच आला.

जटायूमंगलम किंवा चदयमंगलम हे गाव वसलं आहे ते कोल्लम जिल्ह्यात. एर्नाकुलम जिल्ह्यातलं अंगमाली आणि तिरुअनंतपुरम जिल्ह्यातलं केशवदासपुरम या दोन शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर. चार टेकड्यांचा अंतर्भाव असलेलं आणि सुमारे ६५ एकर क्षेत्रफळावर उभं करण्यात आलेलं हे पक्षीस्मारक जगातलं सर्वात मोठं पक्षीस्मारक म्हणून ओळखलं जातं. बीओटी तत्वावर केरळ सरकारनं हे उभं केलं आहे. जटायू हा रामायणातला एक महापक्षी. लंकाधिपती रावण सीतेचं अपहरण करून तिला आकाशमार्गे श्रीलंकेला घेऊन जात असताना त्याला अटकाव केला तो जटायू नामक पक्षानं. रावण आणि जटायूमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि त्या युद्धात जटायू धारातीर्थी पडला. श्रीलंकेच्या मार्गावर असताना रामाची आणि त्याची भेट याच पर्वतावर झाली. त्यानेच रावण कोणत्या दिशेनं गेला ते प्रभू श्रीरामाला सांगितलं. जटायूला भेटण्याच्या निमित्तानं प्रभू श्रीरामानं या टेकडीवर जिथे पाऊल ठेवलं ती जागा रामाच्या पदचिन्हाची निशाणी म्हणून ओळखली जाते आणि दाखवलीही जाते.

इतिहासाचं अध्ययन करत असताना राजीव आंचल नावाच्या केरळीय शिल्पकाराला या जटायूमंगलमचा संदर्भ सापडला. त्यानं त्या टेकडीवर चढून जाऊन ते पदचिन्ह शोधून काढलं आणि मग मात्र त्या टेकडीवर जटायूचं स्मारक उभं करावं असं त्याच्या मनानं घेतलं. राजीव हा सिने दिग्दर्शक, पटकथालेखक आणि शिल्पकार. १९९७ साली त्यानं बनवलेल्या गुरू नामक मल्याळी चित्रपटाला अँकॅडेमी अँवॉर्डसाठी नामांकन लाभलं. १९७७ साली राजीवला केरळ ललित कला अकादमीचा शिल्पकलेसाठीचा पुरस्कार घोषित झाला. राजीवचं एक ४० फूट लांबीचं शाकंभरी नामक शिल्प अलेप्पीला पाहायला मिळतं. केरळातल्या अनेक मंदिरांच्या भिंती राजीवच्या म्युरल्सनी सजल्या आहेत. शांतिगिरी आश्रमातलं पर्णशाला कमळ आणि जटायू अर्थ सेंटर हे राजीवच्या शिल्पकलेचा परिचय घडवणारं अत्त्युत्तम शिल्प.. त्यासाठीचा प्रस्ताव त्यानं पर्यटन विभागाला पाठवलाही होता. पण तो योग साधून यायला तब्बल २० वर्षं मध्ये जावी लागली. चदयमंगलममध्ये जटायू शिल्प उभं करण्याविषयीची एक स्पर्धा राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं जाहीर केली आणि राजीवला त्या स्पर्धेत उतरायला सांगितलं.

राजीवनं पाठवलेलं प्रकल्पशिल्प स्पर्धेत पहिलं आलं आणि राजीवनं प्रकल्प हातात घेतला. स्त्रीच्या रक्षणासाठी आणि सन्मानासाठी जटायूनं दिलेली लढत या शिल्पामागे संकल्पिण्यात आली आणि त्यातून २०० फूट लांबीचं, १५० फूट रूंदीचं आणि ७० फूट उंचीचं हे शिल्प ६०० फूट उंचीच्या टेकडीवर उभं राहिलं. जगभरातून पर्यटक येणार हे ध्यानात घेऊन सर्व वयोगटातल्या पर्यटकांना डोंगरावर जाता यावं यासाठी रोपवे उभारण्यात आला. हा संपूर्ण परिसर इको-टाऊनशिपसारखा बनावा हेही राजीवचंच स्वप्न. केरळ सरकारनं त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले.

या टेकडीवर जलसंचयन, सेंद्रिय शेती, शास्त्रशुद्ध पद्धतीने कचरा व्यवस्थापन, एक राममंदिर, एक आयुर्वेदिक रिसॉर्ट उभं राहतं आहे. जटायूच्या मुख्य शिल्पाच्या आत १५ हजार चौरस फूट जागेत चार मजल्यांवर पसरलेलं एक डिजीटल म्युझियम उभं राहणार आहे. रामायणातील प्रसंगांचं आभासी दर्शन त्यातून होऊ शकेल. जटायूच्या एका पंखाखाली सिक्स-डी प्रोजेक्शन थिएटर उभं राहणार आहे. जटायू आणि रावण यांच्यात झालेल्या युद्धावरचा एक लघुपट तिथे दाखवला जाईल.

भारत हा हिंदुबहुल देश, तो जगभरात ओळखला जातो तो हिंदुस्थान म्हणूनच. फाळणीनंतर पाकिस्तान आणि भारत असे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. दोन्ही देशांची नावे बदलली, परंतु त्यांची पूर्वापार संस्कृती तीच राहिली, आस्था तीच राहिली, पूर्वज तेच हिंदू या संबोधनाने ओळखले जाणारे राहिले, बदलली ती फक्त उपासनापद्धती. शेकडो वर्षांपासून याच हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा जगभर पसरत राहिल्या आणि देशोदेशी त्या जपल्याही गेल्या. बाली हा छोटेखानी देश अजूनही स्वतःला हिंदुबहुल देश म्हणवून घेतो तो त्याचमुळे, इंडोनेशिया त्याच्या एअरवेजचे नाव गरुडा एअरवेज असे ठेवतो तेही त्याचमुळे, आम्ही धर्म बदलला असला तरी आमचे पूर्वज बदललेले नाहीत असे सांगण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही तोही त्याचमुळे. श्रीलंकेचा धर्म बौद्ध, परंतु रावणाच्या लंकेचे संदर्भ लक्षात घेऊन श्रीलंकेला रामायण हा पर्यटनाचा आंतरराष्ट्रीय ट्रेल सुरु करावासा वाटला तोही त्याचमुळे. केरळच्या कम्युनिस्ट सरकारला हे शिल्प उभे करावेसे वाटले तेही बहुधा त्याचमुळे!!

सुधीर जोगळेकर sumajo51@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...