आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातलं ओठांवर कधी आलंच नाही!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावेद शेख सूरज हा माझा जिवलग, अगदी जवळचा मित्र. मला मनातलं सर्व काही सांगणारा. थोडा लाजणारा, एकटा एकटा राहणारा. आपल्याच विश्वात गुंतलेला. पण प्रेमावाचून कोणी सुटलं नाही. हासुद्धा प्रेमात पडला. कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला त्याच्याच वर्गात असणाऱ्या मनीषावर हा जिवापाड प्रेम करायचा. ती होती साधीभोळी, गोड हसणारी. कॉलेजमध्ये यायची, कधी वेणी घालून, कधी गजरा माळून. यांचं प्रेम फक्त दोघांपर्यंत. कोणाला न कळणारं.  हा सूर्या कॉलेजला सुटी असली की मित्राची बाइक घेऊन तिच्या घराकडे चक्कर मारायचा. कॉलेजच्या आवारात हा नेहमी तिच्या अवतीभवती फिरायचा. ती एकदा दिसण्यासाठी! तिच्या एका स्माइलसाठी, हा मनापासून झुरायचा. तसे तर मनीषा जाणून होती, सूरजच्या मनातलं प्रेम. पण हा धाडस करून कधीच तिला सांगू शकला नाही. ती काय म्हणेल  या विचारानं तो मनातलं तिला कधी सांगू शकला नाही. एक दिवस मनीषा कॉलेज ग्राउंडवर पेढे वाटत होती. मैत्रिणींसोबत सेल्फी काढत होती. वर्गमैत्रिणी तिचे अभिनंदन करत होत्या. पण तिच्या चेहऱ्यावर एक नाराजी होती. इकडे सूरजला त्याच्या एका मित्राकडून कळालं, की उद्या मनीषाचा साखरपुडा आहे. हे ऐकून सूरज निःशब्द झाला.पाणावलेले डोळे घेऊन, दूर कॉलेजच्या आवारातील एका झाडाखाली, तो विचार करत बसला होता. मला मनीषाविषयी, सर्व माहीत झालं होतं. सूरजजवळ जाऊन आणि त्याला सांभाळत म्हणालो, हे बघ सूरज जे झालंय, आणि जे घडतंय, ते ना तुझ्या हातात आहे! ना मनीषाच्या.! तू मनात घुसमटण्यापेक्षा एकदा, मनातलं बोलून टाक. मोकळा हो. ती तुझी नाही झाली तर काय झाले? दूर राहून एकमेकांवर प्रेम करणे, हेसुद्धा प्रेम आहे. कॉलेज सुटल्यावर दोघं तिच्या मागे गेलो. ती मित्राकडे पाहून निरागस चेहऱ्याने हसली. तिला माहीत होतं. तिलाही कदाचित काहीतरी बोलायचं होतं. आम्ही जवळ जाताच मी म्हणालो, मनीषा तुझ्याशी सूरजला काही बोलायचं आहे? हे ऐकून मनीषा म्हणाली, सूरज, तुला काय बोलायचं आहे हे मला माहीत आहे. माझ्या मनात काय आहे हे कदाचित तुला माहीत असेल. पण याचा आता काही फायदा नाही. तू खूप उशीर केला. माझा साखरपुडा आहे. तुला  जे काही  बोलायचं होतं, ते तू कधीच बोलू शकला नाही. आता बोलून काहीच साध्य होणार नाही. ते मनात होतं, पण ओठांवर कधी आलंच नाही. एवढे बोलून मनीषा चालती झाली. जे बोलायचं होतं ते तिलाही माहीत होतं, आणि त्यालाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!! हे शब्द मनातल्या मनातच राहिले. सूरज निःशब्द होता. शेवटीही निःशब्दच राहिला. 

लेखकाचा संपर्क : ९०११२३५७८९

बातम्या आणखी आहेत...