आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धारणी- हिमालयाचे रक्षण करताना अरुणाचल प्रदेशात धारातीर्थी पडलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील मुन्ना पुनाजी सेलूकर या जवानावर अंंतिम संस्कार करण्यात आले. देशाच्या सिमेचे रक्षणाचे कर्तव्य बजाविताना हिमस्खलनात दबून वीरमरण आलेल्या सातपुडा पर्वतराजीच्या मेळघाटातील या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशितील जनसागर रविवारी चुरणी येथे उसळला होता. घरचा आधारवड गेल्याने सेलूकर कुटुंबियांचा आक्रोश तर देशभक्त पुत्र गमावल्याने चुरणी गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. ७ बिहार रेजिमेंटमधील जवान मुन्ना पुनाजी सेलूकर यांना देशाच्या सीमेचे रक्षण करण्याकरिता अरुणाचल प्रदेशातील तवांग या बर्फाच्छादीत भागात तैनात करण्यात आले होते.
वातावरणात बदल झाल्याने तवांग परिसरात हिमस्खलनात सापडल्याने मुन्ना सेलूकर यांचा गुरूवार. दि. ३ जानेवारीला मृत्यू झाला. आदिवासी क्षेत्रीत कठीण परिस्थिती तसेच अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबातून मोठ्या मेहनतीने मुन्ना हा आठ आठ वर्षांपूर्वी सैन्यात रूजू झाला होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण सेलुकर कुटुंबाचा आधारवडच गेला. घरापासून तब्बल २ हजार ३८० किलोमीटर अंतरावर असलेल्या तवांग येथे वीरमरण आलेल्या मुन्नाच्या आठवणी आणि शोकसागरात चुरणीसह संपूर्ण परिसर बुडाला. शहीद मुन्ना यांच्या पार्थिवावर शनिवार ५ जानेवारीला अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले होते. मात्र, नागपूर विमानतळावर मुन्नाचे पार्थिव सायंकाळच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर सैनिक वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी चुरणी येथे आणले. शनिवारच्या मध्यरात्री २ ते २.३० वाजताच्या सुमारास शहीद जवानाचे पार्थिव चुरणी येथे पोहोचले. पार्थिव गावात पोहोचताच ग्रामस्थांनी 'भारत माता की जय, मुन्ना सेलूकर अमर रहे', अशा घोषणा दिल्या. मुन्ना सेलूकर यांची पत्नी पूजा सेलूकर, बहिण रामकली सेलूकर, वडील पूनाजी सेलूकर, भाऊ राजजी सेलूकर, रामदास सेलूकर, सुंदरलाल सेलूकर यांनी प्रचंड आक्रोश करत मुन्नाचे अंत्यदर्शन घेतले. आई रतनू, वडील पुनाजी या दाम्पत्याच्या संसाराचा गाडा मुन्नाच्या खांद्यावर होता. अल्पभूधारक असलेले पूनाजी सेलूकर यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर विसंबून आहे. त्यामुळे मुन्ना हा एकमेेव त्यांचा आधारवड होता. अंत्य संस्कारावेली स्थानिक पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून शहीद मुन्ना सेलूकर यांना प्रशासनाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्ह्याचेपालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार अानंदराव अडसूळ, आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी आदरांजली अर्पण केली. या वेळी उपविभागीय अधिकारी राहुल कर्डीले, तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा सैनिक अधिकारी रत्नाकर चरडे, पुलगाव येथील अॅम्युनिशन डेपोतील जवान उपस्थित होते.
एक वर्षांपूर्वीच जवान मुन्ना सेलूकरचा झाला होता विवाह
सेलूकर कुंटुबात मुन्नासह चार भाऊ आहेत. हातमजूरी करुन संपूर्ण सेलूकर परिवार एकत्रित राहायचे. एक वर्षांपूर्वीच मुन्ना यांचा विवाह झाला होता. पण, जीवनाचा प्रवास अर्धवट सोडून निघून गेल्याने सेलुकर कुटूंब पोरके झाले. राजाजी, सुंदर आणी रामदास यांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. घरात अठराविश्व दारिद्राच्या नरकयातना भोगत असलेल्या सेलूकर कुंटूबांची मुन्ना सैन्यदलात असल्याने प्रतिष्ठा वाढलेली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.