आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेपासून बनवतात पाणी, 12 व्या वर्षीच बनवले होते जनरेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - त्यांच्या बालपणीच्या पहिल्या मित्राचे नाव टोनी होते. टोनी म्हणजे कोणी मुलगा नव्हे, तर एक स्क्रू ड्रायव्हर होता. महाराष्ट्रातील अकोला येथे राहत होते. वय होते १२ वर्षे. अभ्यासाला बसले की नेहमी वीज जायचीच. या समस्येने मोठे स्वरूप धारण केल्यानंतर एवढ्या लहान वयात सायकलपासून जनरेटर बनवले. त्याद्वारे ५ वॅटचा सीएफएलचा बल्ब लागत होता. तेथूनच त्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करण्याची इच्छा निर्माण झाली. ही गोष्ट आहे अलीकडेच वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून 'यंग इनोव्हेटर अवॉर्ड' मिळवणाऱ्या जव्वाद पटेल यांची. त्यांचा संबंध हैदराबादशी आहे. रंजक नवोन्मेषी कल्पना मांडणारे अशी त्यांची ओळख. लोक त्यांना 'थ्री इडियट्स' या बॉलीवूडच्या चित्रपटातील फुनसूक वांगडूही म्हणतात. अलीकडेच त्यांना भारत सरकारने 'नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन रिसर्च अँड इनोव्हेशन'नेही सन्मानित केले आहे. 


२४ वर्षीय जव्वाद यांनी सांगितले की, पहिले जनरेटर तयार करण्यासाठी मला ४ महिने लागले. त्यादरम्यान मला ५ ते ६ वेळा अपयशही आले. पण अशा कामांत खूप मजाही येते. जव्वाद यांनी दुष्काळग्रस्त भागातील पाणी समस्या संपवण्यासाठी हवेच्या आर्द्रतेपासून पाणी तयार करणारे यंत्रही तयार केले आहे. 


त्यासाठी त्यांना दीड वर्ष कठोर मेहनत करावी लागली. सुमारे ६० हजार रुपयांत तयार झालेले हे यंत्र एक तासात २ लिटर पाणी बनवते. त्यांनी त्याचे पेटंटही घेतले आहे. त्यांनी सांगितले, 'मी जेव्हा इयत्ता दहावीत होतो तेव्हा आई मला पहाटे ५ वाजता उठवत असे. १५ मिनिटांची झोप जास्त मिळावी यासाठी मी मोबाइलच्या मदतीने एक सर्किट तयार केले होते, ते बिछान्यावर झोपल्या-झोपल्या कमांड दिल्यावर गीझर ऑन करत असे. नंतर अंघोळ करता-करताच एका कमांडने टोस्टरही सुरू करत होतो.' 


मात्र, त्यांच्या या सवयी अनेकांना पटत नव्हत्या. जव्वाद सांगतात, 'माझ्या यशात टीकेचा वाटा खूप मोठा आहे. यंत्रांऐवजी अभ्यासावर लक्ष दे, अन्यथा तू इलेक्ट्रिशियन होशील, असे मला सांगितले जात असे.' अकोल्यात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर जव्वाद ११ वीच्या शिक्षणासाठी औरंगाबादला गेले होते. ते सांगतात, 'मी औरंगाबादला फिंगर प्रिंट सेन्सर लॉक असलेली सेक्युरिटी सिस्टिम तयार केली होती.' जव्वाद यांनी याआधी सेन्सरयुक्त हेल्मेटही बनवले आहे. हेल्मेटमध्ये एक सेन्सर लावले आहे आणि त्याच्याशी पेअर केलेले दुसरे सेन्सर दुचाकीत लावले आहे. त्यामुळे जोपर्यंत व्यक्ती हेल्मेट घालत नाही तोपर्यंत दुचाकी सुरू होणार नाही. एखाद्याने मद्यप्राशन केले असेल तरीही दुचाकी सुरू होणार नाही. दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलत असाल, तर तीनदा इशारे दिल्यानंतर दुचाकी बंद होईल. जव्वाद यांनी या हेल्मेटचे पेटंटही घेतले आहे. त्याशिवाय जव्वाद यांनी कृषी, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक उपकरणे तयार केली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...