आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: अायुक्तांच्या भूमिकेला लाल कंदील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकचे बहुचर्चित पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नियुक्ती शासनाने राज्यभरातील अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिकांमध्ये करू नये, या मुद्द्यावर नागपूरच्या महापौर परिषदेत जोरदार चर्चा झाली. या अाशयाचे लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात अाले. नाशिकचा सद्य:स्थितीतील सार्वत्रिक अनुभव लक्षात घेता तसेच लोकप्रतिनिधींनी त्यासंबंधी वारंवार वर्षा निवासस्थानी कैफियत मांडली.

 

मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने डोक्यावर बर्फ ठेवून संपूर्ण प्रकरणाकडे पाहिले ते पाहता महापौर परिषदेतील या भावनांची किती कदर होऊ शकेल याबाबत सांशकताच आहे. महापालिकेत कोण अधिकारी असावा अथवा नसावा, कोणी कसे काम करावे, शिस्तीचा बडगा कुणी कसा वा कोणा विरोधात उगारावा, कोणी कसा गोंधळ घालावा, मर्जीतील अधिकारी मोक्याच्या जागेवर नियुक्त करून त्यांच्याकरवी पालिकेचा कारभार कसा हाकावा असे एक ना अनेक प्रवाद आहेत.  नाशिक महापालिकेत मुंढेंची नियुक्ती झाली तेव्हाही हा मुद्दा नव्हता वा नाही, असण्याचे कारण नाही. 

 नाशिक महानगराची प्रथम नागरिक असलेली एक महिला तिच्या अधिकारासाठी ज्या रीतीने अन्् ज्या हिमतीने गेल्या सहा-आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री दरबारापासून अगदी कालच्या महापौर परिषदेच्या राज्यव्यापी व्यासपीठापर्यंत सर्वच ठिकाणी आपली बाजू मांडण्याची धडपड करत असताना त्यांच्या प्रयत्नांना कुठलीही दाद  न मिळणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने निश्चितच भूषणावह म्हणता येणार नाही.

 

नाशिकच्या महापौर रंजना भानसी गेल्या काही महिन्यांपासून आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात संघर्ष करीत आहेत त्याला तोड नाही. गंमत बघा, नाशिकच्या महापौरांचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील कारभाराचा अनुभव तब्बल २५ वर्षांचा आहे. त्यांचे वडील कचरूभाऊ राऊत यांची हयात राजकारणात गेली. आदिवासीबहुल पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीपासून ते खासदार अशी प्रदीर्घ कारकीर्द राहिली. रंजना भानसी या त्यांच्या कन्या आहेत. थोडक्यात काय तर या महापौरांना मोठा राजकीय वारसा तसेच लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा काही दशकांचा अनुभव पाठीशी असतानाही केवळ महिला म्हणून त्यांची उपेक्षा होते. त्या सुरुवातीपासूनच आयुक्तांच्या कारभाराविरोधात खंबीरपणे उभ्या राहिल्या. जनसामान्यांमध्ये महापौरांची प्रतिमा ही उच्च दर्जाची असते. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वसाधारण सभा हीच सार्वभौम असते, असेच किमान महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नागरिकांना माहीत आहे.

 

त्यामुळे अशा सार्वभौम सभागृहाचा सर्वोच्च पदाधिकारी हा महापौर असतो अन्् त्याच्याकडे निर्णयाची क्षमता असते. नाशिक महापालिकेत याअगोदर अनेक महापौर होऊन गेले. त्यापैकी काही जणांची कारकीर्द अमळ अधिकच गाजली, पाठोपाठ ते राजकीय पटलावरून दूरदेखील सारले गेले. शहराच्या द्वितीय महिला महापौर म्हणून भानसी यांची कारकीर्द आता कुठे सुरू झाली. संपूर्ण पालिकेवर भारतीय जनता पार्टीचे बहुमत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या अधिकाराचे हनन सुरू झाले. त्यामुळे त्या प्रचंड संतप्त आहेत. पालिकेच्या महासभांमध्ये महापौर असो की नगरसेवक, ज्या रीतीने आयुक्तांवर तुटून पडत आहेत, त्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत, ते पाहता प्रशासन प्रमुखांकरवी कदाचित लोकप्रतिनिधींच्या स्वाभिमानाला नख लावण्याचे काम झाले असावे.

 

 जेथे सुशासनाची भाषा केली जाते अशा राज्यात नगरसेवकांनी काही नियमबाह्य कामे सुचवली वा करवून घेतली असतील तर त्यांच्यावर वचक ठेवण्याचे काम शासनाचा नियुक्त प्रतिनिधी म्हणून आयुक्तांनी करायला हवेच. त्याउपरही लोकप्रतिनिधीचा आदर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील एखादा अपवाद वगळता सर्वच महापालिकांमध्ये प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवक निधी दिला जातो. त्या निधीची विल्हेवाट बरोबर लावली जाते की नाही यावरदेखील आयुक्त नजर ठेवू शकतात, पण निधीच द्यायचा नाही अशी आडमुठेपणाची भूमिका नको. या काही कारणांमुळे नाशिकमधील महापौर विरुद्ध आयुक्त हा संघर्ष टोकाला गेला. महापौरांनी दुर्गावतार धारण करीत आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापौर परिषदेच्या माध्यमातून आघाडीच उघडली. या परिषदेच्या निमित्ताने अायुक्त तुकाराम मुंढेंच्या भूमिकेला लाल कंदील दाखवण्याचा प्रयत्न झाला खरा, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास रथाची दोन चाके अाहेत. त्यांनी एकत्र मिळून काम केल्यासच विकास शक्य आहे. परंतु नागपूर असाे की नाशिक - बहुतेक ठिकाणी महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी असे जे चित्र पाहायला मिळते त्यामुळे नागरी विकासाला खीळ बसते हे वेगळे सांगायला का हवे? 

 

- जयप्रकाश पवार

निवासी संपादक, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...