आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना बहरू द्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जया नेरे

सहज मिळणारे शिक्षण, ताणतणावापासून मुक्त असणारे शिक्षण याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून मुलं बहरतील, सर्वांगाने फुलतील.

करील मनोरंजन जो मुलांचे... जडेल नाते प्रभुशी तयाचे!


मुलांशी असणारे नाते कसे असावे हे साने गुरुजींनी आपल्या या उक्तीत सांगितले आहे. असेच मुलांना समजून घेऊन हसत खेळत शिक्षण देण्याची गरज आहे. लहान मुलांच्या कोमल हृदयावर हळुवार संस्कार पेरण्याची आवश्यकता आहे. शिक्षकाला सर्व भूमिकेतून जायचे आहे. आजोबा होऊन छोट्या छोट्या गोष्टी मुलांना सांगत मूल्य रुजवायची आहेत, आई होऊन शाळेची गोडी लावायची आहे,मानसिक आधार द्यायचा आहे, मुलाला काय हवंय, त्याला कशाची गरज आहे, कशाची भूक आहे हे ओळखून ते कार्य आपल्या हातून होणं खूप गरजेचं आहे. पूर्वी हेच तर होत होतं, पण मधल्या काळात पध्दत बदलत गेली. शिस्तीच्या नावाने मुलं फुलायचीच राहिलीत. एक वेगळा प्रवाह आकार घेऊ लागला, तो म्हणजे अधिकाधिक मार्क असावेत. 

आजकाल शहरात काय किंवा खेड्यात काय फक्त नि फक्त मुलांनी भाषा,गणित, इंग्रजी या विषयाचे केवळ अध्ययन करावे असा पालकांचा कल दिसून येतो. बालवाडीपासूनच मुलांना शिकवणी वर्ग लावणे, अभ्यासात गुंतवून ठेवणे... जेणेकरून मुलं मोकळेपणे राहायला नकोत. शाळा आणि शिकवणी वर्ग एवढेच जर मुलगा करत असेल तर तो कसा फुलेल, परिपक्व कसा होईल? जे बालपण आपण जगलो ते मुलांनीही जगावे अशी इच्छा असणारे कमीच. अशा वेळी मुलांच्या भावना, इच्छा याकडे दुर्लक्ष केलं जातंय. यातच मुलं डिप्रेशनमध्ये राहतात आणि प्राथमिक वर्गापासून या डिप्रेशनला सुरुवात होऊन शेवटपर्यंत तसेच राहते. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता लोप पावत चाललीये. यातच विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेयं. पाल्य आपल्या पालकांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांचे ओझे घेऊन वावरत आहे.सहज मिळणारे शिक्षण, ताणतणावापासून मुक्त असणारे शिक्षण याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून मुलं बहरतील,सर्वांगाने फुलतील. अगदी आईच्या स्वयंपाकघरापासून शिक्षणाला सुरुवात होते. त्याच्या शारीरिक विकासाला सुरुवात होते. वेगवेगळ्या वस्तू हाताळणे जसे -बटाटे, टोमॅटो इकडून उचलून तिकडे ठेवणे. फायबर बरण्यांची झाकणं लावणे, रिकाम्या फायबर बाटल्यांचे बूच शोधून बसवणे, मणी दोऱ्यात ओवणे, शर्टचे बटण लावणे या कृती त्यांना करू दिल्या तर स्नायूंचा विकास होतो तसेच नकळत मिळणाऱ्या ज्ञानाकडेही नेले जाते. विविध छोटे खेळ, कृती यातून नकळत बरेच ज्ञान मुलांना देऊ शकतो. पारंपरिक पद्धतीने अंक दृढीकरणापेक्षा अंक तक्त्यावर डायसचा वापर करून अंक वाचन, असेच डायस वापरून मुळाक्षरांचे वाचन, मुलांना नेहमी व आवर्जून पुस्तकाचे पान क्रमांक सांगणे यानेही अंक दृढीकरण होते. अक्षर/ अंक फुग्याला नेम लावणे, मासा गळाला लावणे (कार्डशीटच्या आकारांवर विविध संदर्भ घेऊन-जसे अंक, शब्द, जे आपणास दृढीकरण करावयाचे आहे) बादलीत चेंडू टाकणे, अशा विविध क्लृप्त्या आहेत. फक्त त्यासाठी आपली कल्पकता असली पाहिजे. जवळजवळ सर्वच जि.प. शाळांतून अशा प्रकारचे वातावरण आपणास पाहायला मिळेल. प्रत्येक शिक्षक आपले कौशल्य पणाला लावून हे ज्ञानदानाचे कार्य अगदी मनापासून करत आहे. शाळांना जो ज्ञानरचनावादी साहित्याचा पुरवठा झालाय तोही विद्यार्थ्यास अध्ययनास पूरक व नावीन्यपूर्ण तसेच मुलांना हवाला वाटणारा आकर्षक आहे.  पालकाची व त्यासोबत आम्हा शिक्षकांची भूमिकाही  खूप महत्त्वाची व जबाबदारीची आहे. पालकांनी हे ठरवण्याची गरज आहे की, आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे शिक्षण उपलब्ध करून द्यावे.

लेखिकेचा संपर्क - 9423918363

बातम्या आणखी आहेत...