आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: पहले मंदिर, फिर सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार’चा नारा देत सेनेच्या मावळ्यांसह अयोध्येकडे कूच करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. हवाई मार्गे तसेच उपलब्ध सोयी-सुविधांनुसार ज्यांना शक्य आहे ती मंडळी खासगी वाहनांनी प्रमुखांच्या मागे मागे प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत टप्याटप्प्याने दाखल होणार आहेत. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून केवळ सभास्थानी जमलेल्या सैनिकांना इशारा करायचे शिल्लक राहिले आहे.

 

अयोध्येतील या तालमीची खासी जबाबदारी यंदा नाशिककडे सुपूर्द करण्यात आल्याची बोलवा आहे. कुठेही कमतरता भासू नये, सभेला गर्दीच जमली नाही, अशी वाच्यता कानोकान होणार नाही, शेकडो मैलांवरून म्हणजेच थेट मराठी प्रांताकडून हिंदी प्रांताकडे मार्गक्रमण केल्यावरदेखील सैनिकांची कुमक कमी पडली असे होऊ नये म्हणून खबरदारी घेतानाच प्रमुखांच्या सभेला पुरेसे सैनिक बळ कसे जातीने हजर राहील यावर विशेष नजर ठेवली जात आहे. नाशिक प्रांताच्या खासदारांवर हजार-बाराशे सैनिकांच्या तुकडीच्या सेवेकरिता एक अख्खी आगगाडीच आरक्षित करण्याची कामगिरी सोपवल्याचीही बोलवा आहे. त्यासाठी रेल्वे खात्याला द्यावयाची बिदागी वा अन्य खर्च तोही या महोदयांनी त्यांच्याच खजिन्यातून करावयाचा आहे, असेही त्यांना सांगावा असल्याचीही चर्चा आहे.

 

असो. समाजमानसात काय चर्चा होते, विरोधक काय टीकाटिप्पणी करतात, स्वपक्षातीलच मंडळींमध्ये प्रमुखांनी घरचे सोडून अयोध्येकडे जावे की जाऊ नये या मुद्द्यांवरही मतभिन्नता आहे. तथापि, नावलौकिकानुसार ठाकरे यांनी एकदा निर्णय घेतला की त्यापासून ते तसूभरही मागे सरकत नाही. यंदाही अगदी तंतोतंत तसेच झाले आहे.  


मराठी प्रातांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षासोबत भागीदारीने सहभागी असलेल्या शिवसेनेने राम जन्मभूमीतील मंदिर उभारणीच्या अणकुचीदार मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्या सहकाऱ्याला कोंडीत पकडण्याची नामी क्लृप्ती शोधून काढली आहे. लोकसभेच्या निवडणुका नजरेच्या टप्प्यात आल्याचे दिसताक्षणी उद्धवरावांनी अचूक वेध घेतला आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सुरुवातीची दोन-अडीच वर्षे सर्व काही आलबेल होते. सरकारने अचानक नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला तरी जनता मुकाट्याने त्याकडे पाहत राहिली. जीएसटी लागू केल्यावर त्या प्रश्नामुळे बरीच खळबळ झाली खरी, पण व्यवसायिकांनी तेही निमूटपणे सहन केले. मोदी सरकारने सत्तेवर येताना स्वपक्षीयांसह सर्वच लोकांच्या अपेक्षा एवढ्या उंचीवर नेवून ठेवल्या की पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले तरी लोकांना अजूनही वाटते आहे की सरकारची जी काही वाटचाल सुरू आहे ती योग्य दिशेने आहे.

 

विरोधी काँग्रेससह काही बोटांवर मोजण्याइतक्या पक्षांनी महागाईविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा आवाज क्षीणच राहिला. त्यांच्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळू शकलेला नाही. पण रामजन्मभूमीतील मंदिराचा मुद्दा उभा राहताच देशातील एकूण राजकीय वातावरणाला कलाटणी मिळाली आहे. . नागपूरच्या रेशीम बागेतील मंडळी देखील या मुद्यावर कधी आग्रही भूमिका घेताना वा मतं मांडताना बघावयास मिळाली नाहीत. परंतु त्याच बागेतील प्रमुख कारभारी मंडळी जाहिररित्या या विषयावर बोलू लागले आहेत. 


देशभरातील सध्याचा एकूण घटनाक्रम लक्षात घेता राजकीय वातावरणाला कलाटणी मिळत असल्याचेच ते एक प्रमुख द्योतक मानायला हरकत नसावी. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत जाऊन श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर मंदिर उभारणीकामी आग्रही होण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच दूरदृष्टीचा ठरू शकतो, असा उद्धवजींचा अंदाज असावा. त्यामुळेच ‘चलो अयोध्या’ हा नारा देत मराठी प्रांतापाठोपाठ उत्तर प्रदेशसारखा हिंदी प्रांताला गवसणी घालता येऊ शकेल की नाही याचीही चाचपणी या अनुषंगाने होऊ शकते. प्रभू रामचंद्रांच्या वनवास काळातील वास्तव्याची भूमी नाशिकची पंचवटी, तर त्यांची जन्मभूमी अयोध्या हा दुवा लक्षात घेता नाशिकच्या शिवसैनिकांवर मोहीम फत्ते करण्याचे दायित्व सोपवले गेले असावे, असे दिसते आहे.

 

अयोध्येतील शरयू नदीच्या आरतीची तयारीदेखील गंगा गोदावरीवर होणाऱ्या दैनंदिन आरतीचा अनुभव असणाऱ्या नाशिककरांवर सोपवला जाणे हादेखील एक योगायोगच म्हणावा लागेल. उत्साहाच्या भरात सैनिकांकरवी संघटनाप्रमुखांच्या पुढ्यात अगदी पंचवीस हजारांपासून दहा हजारांपर्यंत सैनिक अयोध्येत घेऊन जाण्याची भाषा केली गेली. प्रत्यक्षात हा आकडा पेलवणारा आहे की नाही याचा बारकाईने विचार झाल्यावर या संख्याबळाची उतरंड सुरू झाली अन्् ती हजार-दीड हजारावर येऊन ठेपली आहे. स्थानिक पातळीवरील काही प्रमाणातील पक्षांतर्गत बेबनाव हा त्यामागचे कारण असल्याचेही लपून राहिलेले नाही.  

 

- जयप्रकाश पवार
निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...