आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: सारस्वतांच्या नवाेन्मेषाचा सोहळा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधीचा प्रसाद घेत.. पुढची ऐकीत साद... या काव्यपंक्तीचा आशय अधोरेखित करू पाहणारा दिव्य मराठी आयोजित लिटरेचर फेस्टिव्हल आजपासून साहित्यप्रेमी रसिकांसाठी रुजू होत अाहे. गाेवर्धन पीठाचे शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या ‘वेद अाणि विज्ञान’ या विषयावरील उद्घाटनपर सत्राने त्याचा प्रारंभ हाेत अाहे.

 

दैनिक भास्कर समूह आणि दिव्य मराठी परिवारासाठी हा आनंद साेहळा आहेच, पण एका वृत्तपत्रसमूहाने अशा प्रकारच्या साहित्यिक - सांस्कृतिक - कलात्मक उपक्रमाचे आयोजन करणे याला अनेकानेक सकारात्मक संदर्भ आहेत. विषयांची निवड, आशयाचा विचार, औचित्य, जाणकार वक्ते, हजरजबाबी सूत्रसंचालक, आमंत्रित वक्त्यांमध्ये साधला जाणारा बुजुर्ग, लोकप्रिय तसेच उदयोन्मुख पण गुणी लेखकांचा समतोल आणि या साऱ्या उपक्रमाच्या मुळाशी असणारे गांभीर्य यामुळे दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल लोकप्रिय ठरला आहे. फेस्टिव्हलमध्ये सर्वसमावेशकता असावी, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांपासून शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंतचा आस्वादक लिटरेचर फेस्टिव्हलने आपलासा केला आहे.


मराठी साहित्य विश्वात साहित्यविषयक उपक्रमांची रेलचेल प्रामुख्याने पुण्या-मुंबईत दिसते. दिव्य मराठीने लिटरेचर फेस्टिव्हलची सुरूवात नाशिकमध्ये करून नवा पायंडा पाडला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानसारखी प्रथितयश संस्था या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होती. या वर्षी लिटरेचर फेस्टिव्हल औरंगाबाद येथे अाजपासून साजरा होत आहे. यानिमित्ताने मराठवाड्यासह अन्य विभागातील  लेखक - कलावंत - रंगकर्मीची मांदियाळी रसिकांना अनुभवता येणार आहे. फेस्टिव्हलमध्ये विषयांचे वैविध्य तर आहेच पण मराठी साहित्य विश्वात सध्या कोणते प्रवाह आहेत, समाजातील कोणत्या बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटत आहेत, अनुवादाच्या क्षेत्रात काय सुरू आहे, मुख्य प्रवाहातील साहित्य निर्मितीसोबत अभिव्यक्तीची अन्य माध्यमे काय सांगत आहेत, मराठी संगीत, रंगभूमीवर नवे काय घडते आहे अशी एकूणच साहित्य, कला आणि सांस्कृतिक विश्वातली ताजी खबरबात या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहाेचणार आहे.

 

समाजमाध्यमांतून तरुणाई विशेषत्वाने प्रकट होत आहे. हे माध्यम तुलनेने नवे असले तरी त्याचे प्रभावक्षेत्र प्रचंड आहे. त्याचा अगत्यपूर्वक विचार करण्यात अाला आहे. वेब मॅगझिन, आॅडिओ बुकसारखे माध्यम सध्या वापरले जात आहे. साहित्यकृतींच्या अभिवाचनाचा ट्रेंड आहे. या साऱ्या परिवर्तनाच्या वाटांवरचे वाटसरू लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधणार आहेत. पं. नाथराव नेरळकरांसारखे अभिजात संगीताचे बुजुर्ग जाणकार जसे या व्यासपीठावर आहेत तसेच साबरी ब्रदर्स, पीयूष मिश्रा, अवधूत गुप्ते, गुरू ठाकूर, काैशल इनामदार, स्वप्निल बांदाेडकर, स्वानंद किरकिरे, जितेंद्र जाेशी यांच्यासारखे मधल्या फळीतील लोकप्रिय संगीतकार, गायकही आहेत. याशिवाय, ऋजुता दिवेकर, ख्रिस्ताेफर डाॅयेल, हुसेन जैदी, अच्युत पालव, अजित दळवी, रिना पुरी, सॅव्हिअाे मस्करेहान्स, विनीत वाजपेयी, देवांशी जैन, निर्भय कनाेरिया या दिग्गजांशी रसिकांना संवाद साधता येणार अाहे.


मराठी साहित्य अशी संज्ञा वापरताना केवळ मुद्रित-ग्रथित साहित्यापुरती मर्यादा न स्वीकारता, नागरी, ग्रामीण, दलित, आध्यात्मिक, अनुवादित, श्राव्य, दृक-श्राव्य इतकेच नव्हे तर मल्टिमीडिया साहित्याचे अवकाशही सामावून घेण्याचा प्रयत्न फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला आहे. रा. रं. बोराडे, प्रा. शेषराव माेरे, लक्ष्मीकांत देशमुख, विश्वास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांसोबत अासाराम लाेमटे, हृषिकेश कांबळे असे दमदार लेखकही सामील होत आहेत. जुन्या नव्याची अशी सांगड वाचकांनाही रुचेल असा विश्वास आहे. इंग्रजी भाषेतून लिहिते झालेले मान्यवर लेखक प्रथमच थेटपणे वाचकांसमोर येणार आहेत. कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन, अनुवाद यांचा आनंद घेत असताना साहित्य व्यवहाराच्या इतर पैलूंवर म्हणजे प्रकाशक, मुद्रक, मुद्रितशोधक, पुस्तक विक्रेते, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथालयातील कार्यकर्ते... यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे.


हा फेस्टिव्हल वाचकांच्या हाती काही सकारात्मक ऊर्जा देणारी चळवळ बनावा, असा दिव्य मराठीचा प्रयत्न आहे. दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल हा फक्त तीन दिवसांचा इव्हेंट नसून ते जुन्या जाणत्यांच्या अनुभवांचे, नव्या तरुणाईच्या नवोन्मेषांचे विश्वासाचे व्यासपीठ बनावे असा मुख्य हेतू अाहे. एका हिंदी गाण्यात म्हटल्याप्रमाणे ‘सामने इक नयी जिंदगी है मगर.. पीछे गुजरा हुवा इक जमाना भी है..’ याची आठवण या फेस्टिव्हलच्या निमित्ताने जागी राहावी. आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साद... असा प्रवास सुरू राहावा आणि आपल्या साऱ्यांच्याच जाणिवांची साथ घेत आपले जगणे संवादी आणि समृद्ध होत जावे... ही शुभेच्छा!

 

जयश्री बोकील

बातम्या आणखी आहेत...