आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टायलिश आणि दमदार! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका नटाने गाजवलेली भूमिका तितक्याच समर्थपणे साकारून, त्या भूमिकेवर स्वत:चेही नाव कोरणारा किमयागार रमेश भाटकर यांची एक्झिट कलाप्रेमींना खंतावणारी आहे. प्रभाकर पणशीकरांसारख्या नटश्रेष्ठासमोर 'लाल्या' म्हणून उभे राहिलेले भाटकर रसिकांनी पाहिले, अनुभवले आणि उचलून धरले. तो काळ १९७५ च्या सुमाराचा होता... सत्तर ते ऐंशी हे दशक जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरही सर्व क्षेत्रांत उलथापालथ घडवणारे होते. जागतिक स्तरावर स्त्रीवादाची क्रांतिकारी मांडणी झाली होती. विविध 'इझम्स' प्रसार पावत होते. काही मोडत होते, काहींची पुनर्मांडणी सुरू होती. त्याचे पडसाद आपल्या कलाक्षेत्रावर उमटणे अपरिहार्य होते. समांतर चित्रपटांचा प्रवाह जोर धरत होता. सत्यजित रेंसह मृणाल सेन, ऋत्विक घटक, श्याम बेनेगल यांचे चित्रपट वेगळे काही मांडू पाहत होते. रंगभूमीवर रतन थिय्याम, के. पणिक्कर, गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, विजया मेहता, सत्यदेव दुबे... ही रंगकर्मी मंडळी निरनिराळे प्रयोग करत होती. अभिजात संगीतातही पं. कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांचे सुरेल प्रयोग रसिकांना सुखावत होते. चित्रकला, शिल्पकलाही मागे नव्हत्या. अशा 'हॅपनिंग' काळात रमेश भाटकर यांची जडणघडण झाली आणि एकांकिका स्पर्धांची पुण्याई पाठीशी बांधून भाटकरांचा 'लाल्या' प्रेक्षकांसमोर आला. प्रेक्षकांच्या मनात तेव्हा आधीचा लोकप्रिय लाल्या होता. ती जागा स्वत:च्या नावाने करणे, हे कुठल्याही कलाकारासाठी आव्हानात्मक, पण भाटकरांनी ते करून दाखवले. कलाप्रेम त्यांना वडिलांकडून म्हणजे ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकरांकडून वारशाने लाभले. कलेचा हा वारसा रमेश यांनी अभिनयकलेद्वारे जपला, पुढे नेला. चित्रपट, रंगभूमी आणि छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये भाटकर अतिशय सहजतेने वावरले. चित्रपटातील भूमिका असो, रंगभूमी किंवा छोट्या पडद्यावरची असो, रमेश यांनी सर्व तांत्रिक बदल वेळोवेळी आत्मसात करत त्या भूमिका सहजतेने साकारल्या आणि स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. सुमारे ३५ वर्षे रमेश सातत्याने प्रेक्षकांसमोर होते. त्यांचा 'लाल्या' तर २३ वर्षांपेक्षा अधिक काळ लोकप्रिय होता. मी स्वत: विद्याधर सरांच्या वयाचा झालो, आता मी काय लाल्या साकारणार? असा प्रश्न ते अनेकदा गमतीने विचारत असत. इतके त्यांच्या भूमिकेचे गारूड समाजमनावर होते. 

दमदार आवाज, वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण शैली, सहज अकृत्रिम वावर आणि कामाविषयीची निष्ठा, ही रमेश यांची पुंजी होती. रंगभूमी हे माझे पहिले प्रेम असल्याचा उच्चार त्यांनी गेल्या वर्षीच्या नाट्यसंमेलनात आवर्जून केला होता. मुलुंडच्या नाट्यसंमेलनात भाटकर यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळच्या मनोगतात त्यांनी रंगभूमीवरील या प्रेमाचा उल्लेख केला. ९० च्या दशकानंतर छोट्या पडद्यावरील कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी या त्यांच्या मालिका विलक्षण लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या भूमिकेवर फिदा झालेल्या प्रेक्षकांचे प्रेमही त्यांना अनुभवता आले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटातील पृथ्वीराज चव्हाणांची भूमिकाही लक्षवेधक होती. एकंदर ३५ वर्षांच्या कारकीर्दीत भाटकरांच्या खात्यात ५० हून अधिक नाटके, शंभरहून अधिक चित्रपट आणि पंधरापेक्षा अधिक मालिका आहेत. डॅशिंग इन्स्पेक्टरच्या भूमिका, असा शिक्का मध्यंतरी त्यांच्यावर बसू पाहत होता, पण लगेच त्यांनी भूमिकांचा ट्रॅक बदलला. नायकाच्या भूमिकांमध्येच अडकून राहण्याचा हट्ट न धरता, योग्य वयात ते चरित्र भूमिकांकडे वळले आणि तिथेही त्यांनी स्वत:ची ओळख आणि गरज निर्माण करण्यात यश मिळवले. त्याचमुळे ते अखेरपर्यंत व्यग्र कलाकार राहू शकले. अभिनयाची देणगी वगैरे मला मिळाली नव्हती, मी शिकत गेलो, जे जमलं ते करत गेलो, रसिकांना ते आवडलं, म्हणून मी टिकून राहिलो, असे उद्गार त्यांनी एका मुलाखतीत काढले होते. खरे तर त्यामुळेच ते लोकप्रियता मिळवू शकले, कारण ते प्रेक्षकांना दूरस्थ वाटले नाहीत. त्यांच्याशी थेट नाते जोडणारे, त्यांच्यापैकीच एक ठरले. प्रेक्षक या संज्ञेत सामावणाऱ्या अमर्याद सामर्थ्याच्या समूह मानसिकतेत स्वत:ची जागा दीर्घकाळ निर्माण करणे, ही किमया करणाऱ्या रमेश भाटकरांसाठी कलेच्या इतिहासातले पान राखले जाईल, यात शंकाच नाही. 

बातम्या आणखी आहेत...