आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:सर्वार्थाने ‘देव’माणूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुळलेल्या वाटा नाकारणे साऱ्यांना जमत नाही. बहुतेकांच्या सर्जनाचे मार्ग प्रस्थापित राजमार्गावरून सुरू होतात आणि त्या वाटेवरचे ते सारे जण अनेक प्रवाशांपैकी एक बनून राहतात. अर्थात, या नकारासाठी त्यांना इतरही अनेक नकार सोसावे लागतात. पण त्यांची पर्वा न करता या व्यक्ती स्वत:ला पटलेल्या मार्गाने कलाप्रवास सुरू करतात. प्रसंगी मानहानी, नकारघंटा स्वीकारतात. पण शेवटी हिरा हा हिराच असतो. त्याचे तेज, झळाळी साऱ्या नकारांवर मात करत आपल्या प्रकाशाने साऱ्यांना दिपवतो. संगीतकार, गायक पं. यशवंत देव यांचे नाव नि:संशय या मोजक्यांच्या यादीत अग्रक्रमाने येते. त्यांच्या निधनाने सर्वार्थाने ‘देव’माणूस आपण गमावला आहे. 


आपली भारतीय कलापरंपरा, विशेषत: कंठसंगीत आणि वाद्यसंगीत.. घराण्याला खूप महत्त्व देते. घराणे म्हणजे विशिष्ट शैली आणि सादरीकरणाची शैली. असे वैविध्य जपणारी अनेक घराणी अस्तित्वात आली, विकसित झाली. काहींनी कंठसंगीत आणि वाद्यसंगीत दोन्हीवर प्रभुत्व मिळवले. हे सारे एकदम घडले नाही. हा प्रवास दीर्घ होता. पण ज्याला आपण आज सर्रास ‘भावगीत’ ही संज्ञा वापरतो किंवा सुगम संगीत असे म्हणतो, त्याचा प्रवास फार तर शतकभराचा आहे. या वाटेवरची जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, सुरेश हळदणकर, पराडकर ही अगदी सुरुवातीची शिलेदार मंडळी. नंतर गजाननराव वाटवे यांनी या परंपरेला खऱ्या अर्थाने ‘रूप’ दिले. उत्तम कविता गेय स्वरूपात भावपूर्ण रीतीने सादर करणे असे वाटव्यांच्या सादरीकरणाचे स्वरूप होते आणि ते विलक्षण लोकप्रिय झाले. वाटव्यांचा काळ उतरणीला लागला आणि १९४५ नंतर यशवंत देव या नावाचा युवा संगीतकार, गायक, सतारवादक, अॅरेंजर आपल्या अनोख्या चालींनी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनून राहिला. अर्थात, हा प्रवास देवांसाठी सुरळीत नव्हता. अनेक खाचखळगे, संकटे, दुरवस्था त्यांना सहन कराव्या लागल्या. पण त्याची झळ देवांच्या संगीतरचनांवर पडली नाही. 


देवांनी त्या गीताच्या-कवितेच्या गाभ्यात शिरून चाली निर्माण केल्या. गीतातील प्रत्येक शब्द हा एक अनुभवाने भारलेला जिवंत क्षण असतो याची त्यांना जाणीव होती. संगीतकार म्हणून स्वरांच्या करामती सहज व्हाव्यात हे अपेक्षित असताना देव यांच्या कुठल्याही गीतांवर, चालींवर संगीतकार देव आरूढ होऊन बसले आहेत असे कधीही घडले नाही. कवितेची जी उत्कट समज त्यांच्यात उतरत गेली त्यातून पालवी फुटावी तशा देवांच्या चाली उमलल्या. चाल म्हणजे शब्दांवर लादलेले स्वरांचे नटवे अलंकरण नव्हे, आकर्षक चमत्कृती नव्हे.. देवांचे प्रत्येक गीत याची जाणीव बाळगते. ते स्वत: म्हणतात, ‘कवितेची चाल बाहेर नसतेच मुळी, ती त्या कवितेतच असते, मी फक्त ती शोधून काढतो.’ 


आपल्या जीवनानुभूतीतून कवी गीत निर्माण करतो. मग संगीतकार त्या निर्मितीशी कलात्मक इमान राखून स्वरांची बंदिश निर्माण करतो आणि शेवटी ही दुहेरी बंदिश एकात्मरीतीने उमजून गायक कलाकार ती सादर करतो. प्रत्येक निर्मितीचा एक स्वयंभू आणि अटळ असा विकासक्रम असतो. त्याच्याशी कायम इमान राखणे देवांनी साधले होते. त्यातून देवांची उत्तमोत्तम भावगीते जन्माला आली. देवांचे मोठेपण आणखी एका बाबतीत महत्त्वाचे ठरते ते म्हणजे भाववादी गायकीला त्यांनी ‘शब्दप्रधान गायकी’ अशी अर्थपूर्ण संज्ञा देऊन त्या संज्ञेची सविस्तर, शास्त्रशुद्ध मांडणी केली. सुचले म्हणून केले असे नव्हे, तर जाणीवपूर्वक त्यांनी शब्दप्रधान गायकीची सैद्धांतिक मांडणी केली. ती आपल्या गायनातून, सप्रयोग व्याख्यानांतून सर्वदूर पोहोचवली आणि ग्रंथरूपाने अक्षर केली. इतकेच नाही तर देवांनी ललित संगीताचा विद्यालयीन अभ्यासक्रमही तयार केला. देवांना शास्त्रीय संगीताची उत्तम तालीम होती. त्यांनी पूर्वार्धात आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर केले. पुढे एएमव्ही कंपनीत ते संगीतकार म्हणून रुजू झाले. रेडिओ आणि काही ध्वनिमुद्रिका एवढीच साधने असण्याचा तो काळ होता. देवांनी हेच माध्यम आपले मानले. चित्रपटांच्या जगात ते रमले नाहीत. आकाशवाणीच्या माध्यमातून देवगीते घरोघरी पोहोचली. शब्दांना हळुवार जपणाऱ्या या चाली रसिकांनी आपल्याशा केल्या आणि नंतर सुमारे ४५ वर्षे देवगीतांचा वर्षाव रसिकांवर होत राहिला. गेली काही वर्षे देव प्रकृती अस्वास्थ्यामुळे रसिकांपासून दूर गेले होते. पण यापुढील काळात देवगीते संवेदनशील मनात सदैव जागी राहतील यात शंका नाही.

 

जयश्री बोकील

बातम्या आणखी आहेत...