आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक अहवाल... ईशान्य भारतीय महिलांचा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयश्री बोकील

देशाच्या ईशान्येकडील सात राज्ये, उत्तर भारतातील हरियाणा तसंच आदिवासीबहुल असणारी झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगड ही राज्ये वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. मात्र अपवाद वगळता येथील स्त्रियांच्या संदर्भात फारसे बोलले जात नाही. पुण्यात कार्यरत असणाऱ्या ‘दृष्टी स्त्री अध्ययन केंद्रा’च्या वतीने देशातील सर्व राज्यांतील स्त्रियांचा विशेष अभ्यास तसेच सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. या अहवालातील काही प्रमुख निष्कर्षांचा हा लेखाजोखा…
दृष्टी स्त्री अध्ययन केंद्राने देशातील प्रत्येक राज्यातील महिलांची सद्य:स्थिती शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन प्रमुख मुद्द्यांच्या निकषांवर तपासली. कोणत्याही समाजाचा विकास त्या समाजातील महिलांच्या स्थितीवरून ठरवला जातो. २०११ च्या जनगणनेनुसार, देशाची लोकसंख्या १२१.०६ कोटी आहे. त्यातील ४८.५ टक्के महिला आहेत. म्हणजेच जवळपास निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे समाजाच्या एकात्मिक विकासासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी महिलांचेही समप्रमाणात योगदान अनिवार्य आहे. मात्र देशात दीर्घकाळापासून महिला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अडथळ्यांचा सामना करत आहेत. त्यातही महिलांच्या शिक्षण - रोजगाराकडे सक्षमीकरणाचे प्रमुख माध्यम म्हणून पाहिले जाते. त्याच्या जोडीने वरील राज्यांमध्ये अन्य निकषांचा आधार घेऊन अभ्यास करण्यात आला, अशी माहिती या ‘स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया’ या अभ्यास प्रकल्पाच्या संचालक डॉ. मनीषा कोठेकर यांनी दिली. अभ्यासासाठी व सर्वेक्षणासाठी निवडलेल्या नमुन्यांत विभिन्न क्षेत्रातील महिला होत्या. आदिवासी, सीमावर्ती, तणावग्रस्त, शिक्षण, शास्त्रज्ञ, झोपडपट्टी, पोलिस, शेतकरी, गृहिणी, घरकामगार, विद्यार्थिनी, मच्छीमार, आध्यात्मिक क्षेत्र..अशा वेगवेगळ्या गटात काम करणाऱ्या महिलांचा समावेश होता. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर १८ राज्यांतील १७० जिल्हे आहेत. त्यापैकी ७० जिल्ह्यांमध्येही अभ्यास करण्यात आला, असे त्या म्हणाल्या.

ईशान्येकडील सेव्हन सिस्टर्समधील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सद्य:स्थितीविषयी समन्वयक डॉ. अंजली देशपांडे म्हणाल्या, ‘देशात इतरत्र अभावाने आढळणारी मातृसत्ताक कुटुंब पद्धती ईशान्येकडे आढळते. काही ठिकाणी कायदेशीर वारसाहक्क कुटुंबातील धाकट्या मुलीकडे असतो. काही ठिकाणी विवाहानंतर मुलगा मुलीकडे राहायला जातो. पण स्त्रियांना समान दर्जा न देण्याची पारंपरिक पुरुषी मानसिकता इथेही दिसते. त्याचा परिणाम स्त्रियांना सहन करावा लागतो. २०११ च्या जनगणनेनुसार ईशान्येकडे महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ७६.९४ टक्के आहे. मात्र प्रादेशिक दुर्गमता, दळणवळण सुविधांचा अभाव, आरोग्याच्या समस्या, सामाजिक अस्वस्थता, बंदमधील सातत्य, सैन्याला देण्यात आलेले विशेषाधिकार आणि अंतर्गत अशांतता याचा परिणाम ईशान्येकडील महिलांच्या जीवनावर झाला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे अमली पदार्थांचे सेवन हा चिंतेचा विषय आहे. सीमावर्ती म्यानमार तसेच थायलंड भागात अफूचे प्रचंड उत्पादन होते. त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ तयार करणाऱ्या ‘मोबाइल केमिकल लॅबोरेटरीज’ इथे कार्यरत झाल्याचे सांगितले जाते. खालील चौकटीतील आकडेवारी ईशान्येकडील महिला किती प्रमाणात अमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्या आहेत, याची कल्पना देईल. याशिवाय खुली आंतरराष्ट्रीय सीमा असल्याने एचआयव्ही - एड्सचे प्रमाणही मोठे आहे. मणिपूरमध्ये तर सर्वाधिक एचआयव्हीग्रस्त आढळले आहेत. आसाममध्ये (असेल तर) स्वत:चे शेत किंवा दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणाऱ्या स्त्रिया बहुसंख्य आहेत.

हरियाणामधील मुलींचा घटता जन्मदर हा तर गेल्या अनेक वर्षांपासूनच चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे. मुलगाच हवा, ही मानसिकता यामागे आहे. त्यामुळे आधुनिक आरोग्यसुविधांचा अयोग्य वापर करून स्त्रीलिंगी गर्भ नष्ट करण्याचे प्रमाण मोठे आहे. 

आदिवासीबहुल राज्ये म्हणून परिचित असणाऱ्या झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगडमधील परिस्थिती अधिक विदारक आहे. इथे मुलींच्या स्थलांतराची समस्या मोठी आहे. प्रचंड प्रमाणातील दारिद्र्यामुळे आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या घरकामासारख्या रोजगाराचे मुलींना आकर्षण वाटते. त्याचा फायदा घेत दिल्ली आणि अन्य ठिकाणी या मुलींचे स्थलांतर घडवून आणणाऱ्या एजन्सीज निर्माण झाल्या आहेत. त्यांची संख्या ८०० पेक्षा अधिक आहे. विशेषत: आदिवासी भागातून मोठ्या संख्याने मुली स्थलांतरित होतात.या  भागात भाताचे एकच पीक शक्य होते. दोन-अडीच महिने त्याचा काळ असतो. त्यानंतर उर्वरित वर्षभर काय करायचे, हा प्रश्न अनुत्तरित असल्याने मुली बाहेर पडतात. ही संख्या सुमारे ६० हजार इतकी मोठी आहे. फिमेल डोमेस्टिक वर्कर्स या नावाने मुली स्थलांतरित होतात. मेट्रो शहरांमध्ये त्यांना खूप मागणी असते. त्याचा फायदा घेत एजन्सी चालवणारे या मुलींना करार पद्धतीने बांधून घेतात. महिना अडीच ते तीन हजार रुपये पगारावर या मुली उच्चभ्रू कुटुंबात घरकामासाठी ठेवून घेतल्या जातात. त्यांना निवारा आणि अन्नपाणी तर मिळते, पण कामाचे तास निश्चित नसतात. कोवळ्या वयात त्यांना अतिरिक्त काम करावे लागते. शिवाय लैंगिक शोषणाचे प्रसंग ओढवतात. दुसरीकडे हळूहळू या मुलींना शहरी वातावरण, सुविधा, जीवनमान यांचे आकर्षण वाटू लागते. थोडा पैसा हातात खेळू लागतो. त्यातून बाहेर पडणे त्यांना नकोसे वाटू लागते. ही मानसिकता त्यांना पुन्हा आपल्या कुटुंबात, गावात जाण्यास प्रतिबंध करू लागते. या मुली गावाकडील इतर मुलींनाही स्थलांतराचा मार्ग दाखवतात. एजन्सी त्यासाठी तयारच असतात. त्यामुळे हे चक्र सुरू राहते, असे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. आधुनिक काळातील विविध अभ्यास हे स्पष्ट करतात, की या परिसरातून वय वर्षे १४ ते २२ पर्यंतच्या मुलींचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. प्रचंड संख्येने मुली दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात केवळ घरकाम करण्याचे काम मिळवण्यासाठी स्थलांतरित होतात. 

एकूणच या सर्व भागात स्त्रियांना समाजातील हक्काचे आणि माणूस म्हणून स्थान मिळत नाही, हे विदारक वास्तव आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारकडून स्त्रियांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जातात. पण त्या सामान्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचत नाहीत, हेही दिसून येत आहे. साक्षरतेचे प्रमाण उंचावत आहे, ही एक समाधानकारक बाब वगळली तर अन्य बहुतेक मुद्द्यांबाबत सुधारणेसाठी खूपच वाव असल्याचे या अहवालाने सिद्ध केले आहे.

काही प्रमुख निष्कर्ष 

  • ईशान्येकडील राज्यांत लिव्ह इन रिलेशनशिपमधील स्त्रियांची संख्या अधिक आहे.
  • छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील ६४.५ टक्के महिला मोठ्या एकत्र कुटुंबात राहतात
  • ईशान्येकडील ५४ टक्के महिलांकडे आधार कार्ड नाही, त्यामुळे त्यांना आधारशी जोडलेल्या सुविधांचा लाभ मिळत नाही
  • ईशान्येकडे ८० टक्के महिलांकडे वैयक्तिक बॅंक खाते आहे
  • छत्तीसगडमधील २९ टक्के महिला कौशल्य प्रशिक्षण उपक्रमासाठी सकारात्मक होत्या, त्यापैकी २५.६२ टक्के महिलांची पसंती संगणक ही होती.
  • छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील ५०.७६ टक्के स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करतात
  • छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील ६६.५ टक्के महिला संघटनेच्या माध्यमातून महिला संघटनांशी जोडलेल्या आहेत, तसेच त्यातील ६८.९६ टक्के महिलांनी गेल्या निवडणुकीत मतदान केले
  • ईशान्येकडे एकत्र कुटुंब पद्धती अधिक आहे.