आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सहजपणात प्रवीण व्यासंगी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘कार्य उभे करावे, त्यावेगळे राहावे’, असे संतवचन आहे. त्याचा मूर्तिमंत प्रत्यय ज्यांनी आपल्या जगण्यातून, आचरणातून हयातभर दिला, त्या डॉ. गो. मा. पवार सरांचे निधन चटका लावणारे आहे. मराठी समीक्षेच्या आणि चरित्रग्रंथांच्या इतिहासातील सरांचे योगदान अनन्यसाधारण आहे. सुदैवाने साहित्यप्रपंच करण्यासाठी नियतीने सरांना दीर्घायुष्य दिले आणि साहित्याच्या प्रांतात सरांनी मुक्त संचार केला.

 

विठ्ठल रामजी शिंदे या महर्षींचे अवघे कार्य पवार सरांनी ज्या सखोलतेने संशोधित करून मांडले, त्याला तोड नाही. दुसऱ्या बाजूने मराठी साहित्यातील ‘विनोदा’चा सरांनी ज्या गांभीर्याने धांडोळा घेतला, तोही अद्वितीयच आहे. 


डॉ. गोपाळराव पवार खऱ्या अर्थाने सोलापूरकर. त्यांचा जन्मही तिथला, शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमधूनच पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात स. प. महाविद्यालयात दाखल झाले. पीएचडीचे संशोधन त्यांनी डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केले. त्यानंतरचा दीर्घ काळ सरांनी अध्यापनात व्यतीत केला. जवळपास ३३ वर्षे त्यांनी मराठी विषयाचे अध्यापन केले. मराठी विभागप्रमुख म्हणून अनेक जबाबदाऱ्या निभावल्या.


अध्यापन करत असतानाच, सरांमधील संशोधकाने समीक्षेच्या प्रांतातील अनेक वाटा धुंडाळल्या. काही तर पूर्ण नवीन वाटा निर्माण केल्या, ज्यावरून पुढच्या पिढीतील समीक्षेने वाटचाल केली. अशामध्ये मराठी साहित्यातील विनोदाची सैद्धांतिक समीक्षा करणारे सरांचे संशोधन आजही अभूतपूर्व मानले जाते. विनोद या साहित्यप्रकाराचा अशा प्रकारचा मूलगामी अभ्यास कुणीच केला नव्हता. चिं. वि. जोशींपासून सर्व विनोदकारांचा परामर्ष सरांनी आपल्या ग्रंथांतून घेतला आहे. एकूणच ‘विनोद’ या साहित्यप्रकाराला नाके मुरडण्याचा प्रघात असताना, विनोदाची अतिशय मूळापासून थिअरी मांडून, सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांची उत्पत्ती मांडत, सरांनी केलेली मांडणी अनन्य म्हणावी लागेल. अशी मांडणी सरांच्या आधी कुणीच मराठी साहित्यप्रांतात केली नव्हती. त्यामुळे या समीक्षाग्रंथाचे साहित्यप्रांतात लक्षणीय स्थान आहे.

 

समीक्षक ही सरांची मुख्य ओळख असली, तरी सुरुवातीच्या काळात सरांनी कविता, कथाही लिहिल्या. हंस, प्रसाद, चेतना अशा नियतकालिकांतून त्या प्रकाशितही झाल्या होत्या. पुण्यात स. प. कॉलेजमध्ये शिकत असताना प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे सरांना साहित्याची आणि समीक्षेची गोडी लागली, असा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यातूनच ‘कुसुमाग्रजांच्या रूपकात्मक कविता’ या अभ्यासपूर्ण आणि व्यासंगपूर्ण लेखनाने १९६३ मध्ये  सरांची समीक्षक अशी ओळख साहित्यविश्वात निर्माण झाली. पुढे पु. ल. देशपांडे, आनंद यादव यांच्या लेखनाची त्यांनी केलेली समीक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सरांचे पहिले पुस्तक ‘विवेकनिष्ठ जीनवदृष्टी’ १९६८ साली प्रकाशित झाले. त्यातून जीवनविषयक जाणिवांचा वेध त्यांनी साक्षेपाने घेतला. दीर्घ समीक्षापर्वात सरांनी बहुतेक नामवंत साहित्यिकांच्या साहित्याची समीक्षा केली. व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक कथांचे संपादन करून, त्या संग्रहांना त्यांनी विस्तृत, साधार व साक्षेपी  प्रस्तावना लिहिल्या. ‘मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप’ हा समीक्षाग्रंथ त्यांनी प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या सहकार्याने संपादित केला. हा ग्रंथही अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा सरांच्या अभ्यासाचा खास विषय होता. महर्षींचे चरित्र त्यांनी ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या नावाने लिहिले असून, ते २००८ साली साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ठरले. याशिवाय ‘निवडक वि. रा. शिंदे - जीवन व कार्य’,  ‘शिंदे शेष निहूणे’ ही पुस्तके व संपादनेही सरांनी आत्मीयतेने केली. ‘साहित्यमूल्य आणि अभिरुची’ (१९९४) आणि ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ (२००४) हे त्यांचे ग्रंथही पुरस्कारप्राप्त ठरले. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके तसेच महाराष्ट्र साहित्य पत्रिका यातून त्यांनी वैविध्यपूर्ण आणि विपुल लेखन केले.

 

समीक्षा पद्धतीने लेखन अनेक वेळा अत्यंत गुंतागुंतीची वाक्यरचना आणि पारिभाषिकतेमुळे क्लिष्ट आणि रूक्ष दिसते. पवार सरांचे समीक्षालेखन मात्र वेगळेपण जपणारे आहे. अत्यंत सरळ, सोपे, सुगम आणि शुद्ध मराठी भाषेत लिहिलेले, असे त्यांचे लेखन असल्याने सर्वसामान्य वाचकांनाही ते आवडते. त्यांच्या लेखनात कुठेही विद्वत्तेचा, पांडित्याचा दिखावा नाही. अहंपणाचा स्पर्श नाही. अगदी सहजपणे पण पुरेशा ठामपणे त्यांनी समीक्षकीय मांडणी केलेली आहे. ज्या साहित्याची समीक्षा ते करतात, ते मूळ साहित्य जितक्या आवडीने वाचले जाते, तितक्याच आत्मीयतेने सरांची त्यावरील समीक्षा वाचली जाते. 

 

सरांनी अध्यापन करत असताना अनेक विद्यार्थी, संशोधक घडवले. त्यामुळे कालानुरूप बदलणारी समीक्षेची आव्हानेही नव्या लेखक-संशोधकांनी पेलली. त्यांना सरांनी सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या नव्या लेखनाचे, संशोधनाचे, अभ्यासविषयांचे स्वागत आणि कौतुक केले. जरूर तेथे शाबासकीची थाप दिली. त्यामुळे विद्यार्थीवर्गातही सर अत्यंत लोकप्रिय होते. सरळ, पारदर्शी स्वभाव आणि आचरणामुळे ते अजातशत्रू राहिले. साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. मात्र कुठल्याही प्रकारीच कंपूशाही, राजकारण, लागेबांधे यापासून ते दूर राहिले. सरांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे अनेक समीक्षक वारंवार विदेशी अभ्यासक, संशोधक, तत्त्वज्ञ यांचे दाखले सातत्याने देऊन, जी छापमारुगिरी करताना आढळतात, तो प्रकार सरांनी कधीच केला नाही. त्यांचा सर्व विदेशी साहित्यप्रकार, समीक्षा, तत्त्वविचार, ईझम्स यांचा उत्तम अभ्यास होता. पण त्याचे प्रदर्शन ते मांडत नसत. विद्वत्ता, पांडित्य, व्यासंग हे सारे सरांच्या समीक्षालेखनाची पृष्ठभूमी म्हणून वावरत असत. समीक्षेच्या प्रांतातले हे आचरण दुर्मिळ म्हणावे लागेल. याबाबतीत ‘अभ्यासून प्रकट व्हावे’ हे समर्थवचन सरांनी अंगिकारले होते, असे म्हणावे लागेल. लौकिकार्थाने सरांचे पार्थिव अस्तित्व आता नसले, तरी त्यांचे ग्रंथरूप ज्ञानमयी अस्तित्व आपल्याला सतत त्यांचे स्मरण देत राहील.


जयश्री बोकील
jayubokil@gmail.com