आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रशास्त्री गिरिजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र ही वारकऱ्यांची आणि धारकऱ्यांची भूमी आहे. मानवी इतिहासाला समांतर असाच शस्त्रांचाही इतिहास आहे.अश्मयुगीन काळातल्या दगडांच्या हत्यारापासून ते आजच्या मिसाइल युगापर्यंत मानवाची आणि शस्त्रांची वाटचाल एकत्रितपणेच होत आली. तरीही या शस्त्रांचा शास्त्रसुद्ध अभ्यास करणारी अभ्यासशाखा अद्याप बाल्यावस्थेत आहे. अशा दुर्लक्षित, पण वेगळ्या वाटेवरचा प्रवास करणारी गिरिजा दुधाट ही विद्यार्थिनी जेव्हा वयाच्या अवघ्या विशीत ‘शस्त्रवेध’ हे पुस्तक लिहिते, तेव्हा लक्ष वेधून घेते. तिच्याशी गप्पा मारताना ती या विषयासाठी किती समर्पित आहे आणि फोकस्ड आहे, हेही जाणवते. ‘मधुरिमा’च्या वाचक मैत्रिणींना गिरिजाच्या निमित्ताने एका अनवट विद्याशाखेची माहितीदेखील मिळेल…
 
मी शाळेत असताना आसपास, घरातल्या ज्येष्ठांकडून आणि शाळेत पाठ्यपुस्तकांतून कंठस्नान घालणे, पाठीत खंजीर खुपसणे, खांडोळी करणे, टांगती तलवार असणे, पायावर कुऱ्हाड मारणे असे शब्दप्रयोग ऐकत, वाचत असे. त्यातून येणारी शस्त्रांची नावे मला वेगळी वाटत असत. त्यातून शस्त्रांकडे अधिक कुतुहलाने मी पाहू लागले. मी मूळची अहमदनगरची. तिथेही संग्रहालय असल्याने मला लहानपणीच अनेक शस्त्रे पाहायला मिळाली. कुतुहलाला जिज्ञासेची जोड मिळाली आणि मग शस्त्रांचा माग घेण्याचा निश्चय मी शाळकरी वयातच करून टाकला,’ अशा शब्दांत गिरिजा दुधाट तिच्या शस्त्रप्रेमाविषयी बोलकी झाली. दहावी, बारावीत तिने उत्तम गुण मिळवले. त्या गुणांवर ती कुठलेही करिअर निवडू शकली असती, पण आपण शस्त्रांचा अभ्यास करायचा, हे तिने शाळकरी वयापासून निश्चित केले असल्याने बारावीनंतर पदवीसाठी तिने पुरातत्त्वशास्त्र असा अगदी वेगळा विषय निवडला. “महाराष्ट्रात पदवीसाठी आर्किऑलॉजी हा विषय उपलब्ध नसल्याने मी सध्या बडोदा येथे पदवी शिक्षण पूर्ण करते आहे, असे गिरिजा म्हणाली. राज्यातली आणि देशातली सगळी संग्रहालये मी पाहिली. त्यांचा माझ्या पद्धतीने अभ्यास केला. तेथील शस्त्रांविषयीची माहिती मिळवली. मात्र, दुर्दैवाने फारच कमी ठिकाणी मला शस्त्रांची माहिती मिळाली. बहुतेक ठिकाणी अनास्था दिसली. विशेषत: सूची नसणे, संदर्भ गायब होणे आणि शस्त्रांच्या जतनाच्या शास्त्रशुद्ध पद्धती नसणे हे अनेक ठिकाणी अनुभवले. त्यातून शस्त्रांविषयीची ओढ वाढत गेली. काही संग्रहालयांतून मी विद्यार्थी प्रतिनिधी (इंटर्न) म्हणून कामही केले. शस्त्रांची निर्मिती, वापरलेला धातू वा अन्य साहित्य, त्यावरील कलाकुसर, शस्त्रांचे प्रकार, शस्त्रागार असे आनुषंगिक विषयही मग अभ्यासविषय वाटू लागले आणि मी त्यात रमत गेले, असे गिरिजा म्हणते.

शस्त्रं  केवळ जीव घेण्यासाठीच नसतात. त्यांच्या मागे एक व्यवस्था असते. ज्यांतून त्या त्या काळांतील धातू कला, युद्ध इतिहास, कलाविष्कार, सामाजिक रचना यांचीही माहिती कळते.  दुर्दैवानं या सर्वांचा अभ्यास आजही फार कमी प्रमाणात होतो. त्याहूनही कमी प्रमाणात त्यावर लिहिलं गेलं आहे. महाराष्ट्र हा लढवय्यांचा प्रांत समजला जातो, या अर्थानं ‘शस्त्र’ हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असला तरीही मराठीत या विषयावरची पुस्तकं जवळपास नाहीतच. शस्त्रं म्हटली की ढाल-तलवार-गदा-धनुष्यबाण ते बंदूक-तोफा-मिसाइल्स आपल्या डोळ्यांसमोर तरळून जातात. पण या शस्त्रांचा सविस्तर अभ्यास करणारी ज्ञानशाखा मात्र आजही अस्तित्त्वात नाही. अपवाद आहे तो Hoplology या ज्ञानशाखेचा पण ती अजूनही तिच्या अभर्कावस्थेतच आहे.  त्यामुळे शस्त्रांचा उगम, त्यांची घडण, त्यांचं महत्त्व, त्यांची रचना, त्यांचा इतिहास, भविष्य याविषयी सामान्य माणसाला माहिती नसते, हे सतत जाणवत होतं. यातून मग आपण स्वत:च याविषयी मराठी भाषेत लिहावं, असं वाटलं आणि त्यातून माझं ‘शस्त्रवेध’ हे पुस्तक आकाराला आलं, असं गिरिजानं सांगितलं. मानवाची पहिली पावलं पडली तेव्हापासूनच शस्त्रांची निर्मितीही सुरू झाली. प्रारंभिक अवस्थेत ही शस्त्र दगडांची, फांद्यांची होती. कालांतराने माणूस बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगत होत गेला तशी त्याची शस्त्रंही प्रगत होत गेली. शिकारी अवस्थेत शस्त्रांची विविधता निर्माण झाली. पुस्तक लिहायचे ठरवल्यावर मी भारतीय शस्त्रांचा मागोवा घेण्याचा निर्णय घेतला. त्यातही माझा भर मध्ययुगीन काळातील भारतीय शस्त्रांवर राहिला. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्राचीन काळातील, महाभारत-रामायण काळातील धनुष्यबाण, गदा, भाले, तलवारी इत्यादी शस्त्रे नंतरही जरी वापरात असली तरीही ज्या अतिशयोक्त पद्धतीने त्यांची वर्णनं केली जातात ती पूर्णतः अशास्त्रीय आहेत. शास्त्रीय कसोटीवर ती टिकत नाहीत. नंतरच्या काळात आपल्या देशांत इतकी स्थित्यंतरं झाली की त्यांत आपल्याकडे लिखित पुरावे जवळपास उपलब्धच नाहीत. त्यामुळे या शस्त्रांचा नेमका विकास कसा झाला असेल याची काहीच माहिती आपल्याकडे नाही. मध्ययुगीन काळापासून म्हणजे साधारणतः बाराव्या शतकापासून काही प्रमाणांत तरी शस्त्रांविषयी आपल्याकडे दस्ताऐवजीकरण झालंय, त्या काळातील शस्त्रंही उपलब्ध आहेत. त्यामुळे या पुस्तकाचा भर या काळावर आहे, असं गिरिजा सांगते.
 

शस्त्रांचे प्रकार वैशिष्ट्यपूर्ण
धनुष्यबाण, तलवार, भाले अशा प्रचलित शस्त्रांच्या जोडीने कट्यार, खंजर, माडू (काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं शस्त्र), चक्र, गुप्ती, वाघनखे, दांडपट्टा, कुऱ्हाड, सुरा यांच्या अनेक शस्त्र प्रकारांची माहिती गिरिजाने शस्त्रवेध या पुस्तकात दिली आहे. वार करणाऱ्या शस्त्रांसोबतच संरक्षण करणारी शस्त्रेही असतात. ज्यात ढाल प्रमुख आहे. शिवाय शस्त्राघातापासून संरक्षण करणारी चिलखतं, शिरस्त्राणं आणि शस्त्र चालवण्यासाठी उपयुक्त ठरणारी बालीत्राण, राक, दस्तान, अंकुश, अंगुलीत्राण यांचीही माहिती दिली आहे. बाण ठेवण्यासाठीचे भाते आणि बारुद ठेवण्याचे बारुददान यांचीही रंजक माहिती यात आहे, असे गिरिजा म्हणाली.

का करायचा शस्त्रांचा अभ्यास?
 शस्त्राभ्यासातून आपल्याला तत्कालीन राजवटींची लष्करी व्यवस्था, विभिन्न प्रांतांची शस्त्रे यांची माहिती होते.  परकीय आक्रमणांतून एतद्देशीय शस्त्रांवर कशी मात करण्यात आली हे समजते. नवी शस्त्रे कशी जन्माला आली हे कळते. शस्त्रांच्या आकारावरून, स्थानिक लोकांची शारीरिक ठेवण कळू शकते. शस्त्रांच्या धातूवरून त्या त्या काळातील धातूशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो. शस्त्रांची ठेवण, त्यावरील कलाकुसर यावरून राज्यकर्त्यांची, कारागिरांची सौंदर्यदृष्टी समजते.
 

पारंपरिक मर्दानी खेळही
शस्त्रांच्या माहितीसोबतच भारतातील पारंपरिक मर्दानी खेळांविषयीही मला कुतूहल आहे. हे ‘खेळ’ असले तरीही त्यांतून शस्त्रकौशल्यही वाढीस लागायचं. त्यामुळेच इंग्रजांनी या खेळांवर बंदी आणली होती. यात सिलंबम् (तामिळनाडू), थांग-ता (मणिपूर), ठोडा (हिमाचल प्रदेश), परिखंडा (बिहार), गदका (पंजाब), कलरियपट्ट (केरळ) व महाराष्ट्रातील मर्दानी खेळांचा समावेश आहे. शस्त्रांवरील कलाकुसरीप्रमाणेच शस्त्रांची काळजी कशी घ्यावी, त्यांचं जतन-संवर्धन कसं करावं, देखभाल, सफाई कशी करायची व ती खराब होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय काय योजावेत यातही मला रस वाटतो. त्यामुळे याच विषयावर अधिक अभ्यास-संशोधन करण्याचा माझा मानस आहे. अजून मला पदवी मिळायची आहे. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी प्रयत्न करायचे आहेत. जगभरातली उत्तमोत्तम संग्रहालये पाहायची आहेत. तिथे अभ्यास करायचा आहे. सुदैवाने माझ्या या हटके वाटेवरच्या प्रवासाला कुटुंबीयांचा सर्वतोपरी पाठिंबा आहे. माझी आई तर प्रत्येक ठिकाणी ढालीसारखीच माझ्यासोबत असते. त्यामुळे मला या आवडीच्या विषयात संशोधन करण्याची वाट सुकर बनली असल्याचेही गिरिजाने आवर्जून सांगितले.
 
 

बातम्या आणखी आहेत...