आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारमुक्त भारतासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात बलात्कार, बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये तब्बल ३२१ टक्के वाढ झाली आहे. यातून समाजाचे जे विकृत चित्र समोर येत आहे, ते सुधारण्यासाठी कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. नोबेल सन्मानप्राप्त कैलाश सत्यार्थी यांनी ही संस्था सुरू केली आहे.स्त्रिया तसेच बालकांच्या लैंगिक तसेच अन्य शोषणाविरोधातआणि हिंसेविरोधात संस्थेने नुकतेच ‘बलात्कारमुक्त भारत’ हे अभियान सुरू केले आहे. या संस्थेचे पदाधिकारी ओमप्रकाश पाल यांच्याशी साधलेला संवाद…

 

रेप फ्री इंडिया, या चळवळीचा, अभियानाचा उद्देश सांगताना प्रकाश म्हणतात, ‘संस्थेने केलेले काम, अनुभव आणि कार्यकर्त्यांची मनोगते, यातून देशातील स्त्रिया व बालकांवरील लैंगिक व अन्य शोषणाच्या कित्येक कहाण्या समोर आल्या. सरकारी, निमसरकारी, खासगी तसेच स्वयंसेवी संस्थांनी या विषयासंदर्भात अनेक अहवाल प्रसिद्ध केले. यासंदर्भात एकल आणि सामूहिक असे विविध प्रकारचे अभ्यास, सर्वेक्षणे, संशोधन करण्यात आले आहे. त्या सगळ्यांचा परामर्ष घेऊन, ‘रेपफ्री इंडिया’ (बलात्कारमुक्त भारत) ही चळवळ सुरू झाली आहे. या देशव्यापी चळवळीच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. पहिली म्हणजे बलात्कारमुक्त भारतासाठी राष्ट्रीय कृती योजना आखण्यात यावी, दुसरी यासाठी स्वतंत्र बजेट असावे आणि तिसरी म्हणजे राष्ट्रीय अर्थसंकल्पात १० टक्के निधी या समस्येच्या निराकरणासाठीच्या प्रयत्नांसाठी राखून ठेवावा. नव्या सरकारकडेही आमच्या याच मागण्यांचा पुनरुच्चार केला जाणार आहे.”


राज्य आणि देशातील स्त्रिया आणि बालकांवरील लैंगिक तसेच अन्य शोषण - अत्याचारांविषयीच्या आकडेवारीविषयी ओमप्रकाश म्हणाले,‘महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये (२०१२-२०१६मध्ये) लहान मुलांवरील गुन्ह्यामध्ये ३२१ टक्के वाढ झालेली आहे. २०१६ मध्ये, चौदा हजार ५५९ इतके लहान मुलांवरील अत्याचाराचे गुन्हे भारतीय दंड संहिता आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) अंतर्गत नोंदवले गेले. २०१६ मध्ये भारतात नोंदवलेल्या स्त्रिया व लहान मुलांच्या अत्याचाराविरोधातील एकूण गुन्ह्यांपैकी १४ टक्के गुन्हे महाराष्ट्रामध्ये नोंदवलेले आहेत. २०१६ मध्ये भारतात नोंदवलेल्या लहान मुलांच्या अत्याचाराविरोधातील गुन्ह्यांच्या टक्केवारीमध्ये उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र त्याखालोखाल दुसऱ्य‍ा क्रमांकावर आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि विकसित राज्यातील ही आकडेवारी सुन्न करणारी आहे.”


देशात नुकतेच भाजप सरकार सत्तारूढ झाले आहे. कुठल्याही देशव्यापी सामाजिक अभियान अथवा चळवळीला सत्ताधारी तसेच राजकीय पातळीवर पाठिंबा मिळाला, तर चळवळीला वेग मिळू शकतो. यासंदर्भात ‘रेपफ्री इंडिया चळवळ’ कुठल्या टप्प्यावर आहे, या प्रश्नावर ओमप्रकाश म्हणाले, ‘सत्ताधारी पक्ष तसेच देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेते, प्रवक्ते, कार्यकर्त्यांशी चळवळ संपर्कात आहे. सर्वांकडून या चळवळीला सर्वपक्षीय  पाठिंबा मिळत आहे. ही मोहीम कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन आणि आशामंत फाउंडेशन यांच्या एकत्र सहयोगाने महाराष्ट्रामध्ये चालवण्यात येत आहे. गेल्या महिनाभरामध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी घोषित केलेल्या जाहीरनाम्यांमध्ये ४५० हून अधिक लोकसभा उमेदवारांनी या चालू मोहिमेसाठी लहान मुलांच्या आणि स्त्रियांच्या लैंगिक व अन्य  सुरक्षेचा मुद्दा प्राधान्याने समाविष्ट केला आहे. ज्यावर कुठल्याही लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवलेला असेल आणि त्यासंदर्भात चौकशी चालू असेल तर त्याला पक्षामधून निलंबित करण्यात यावे, असेही आवाहन चळवळीच्या वतीने राजकीय पक्षप्रमुखांना करण्यात आले आहे. ‘बलात्कारमुक्त भारत’ ही मोहीम सहा एप्रिल २०१९ रोजी पाटण्यामध्ये सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत पाटणा, रायपूर, विजयवाडा, हैदराबाद, भुवनेश्वर, बंगळुरू, अहमदाबाद आदी  १४ शहरांतील सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे कार्य देशव्यापी व्हावे, यासाठी समविचारी संस्था, व्यक्तींशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. लैंगिक तसेच अन्य शोषणाला बळी पडलेल्यांसाठी हेल्पलाइन, थेट मदत, समुपदेशन, वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला आणि सोबत शोषितांच्या योग्य पुनर्वसनासाठीचे प्रयत्न, अशा पातळ्यांवर काम सुरू आहे. 

 

फाउंडेशनच्या कामाचे स्वरूप
कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन (KSCF) ही लहान मुलांसाठी सुखद अशा जगाच्या निर्मितीसाठी काम करते आणि त्यासाठे थेट कृती आणि कार्यक्रम, संशोधन आणि क्षमता निर्माण आणि लोकांकडून समर्थन तसेच वर्तणूक बदल यासाठी मोहिमा राबवते. सत्यार्थी यांच्या कामाच्या अनुभवामधून या फाउंडेशनचे काम ठरवले जाते आणि मुलांना तसेच तरुणांना उपायांमध्ये सामील करून घेतले जाते. शासन, व्यवसाय आणि समाज यामध्ये उत्तम सहकार्य घडवून आणले जाते तसेच परिणामकारक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे, कृती आणि यशस्वी अंमलबजावणी आणि महत्त्वाच्या घटकांसोबत भागीदारी घडवून आणली जाण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

 

रेप फ्री इंडिया चळवळीच्या प्रमुख मागण्या
१) बलात्कारमुक्त भारतासाठी राष्ट्रीय कृती योजना आखण्यात यावी 
२) यासाठी स्वतंत्र बजेट असावे
३)  राष्ट्रीय अर्थसंकल्पात १० टक्के निधी या समस्येच्या निराकरणासाठीच्या प्रयत्नांसाठी राखून ठेवावा.