आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लय भारी... संगीतबारी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या विमुक्तये, सा कला, अशी कला या संज्ञेची व्याख्या केली जाते. ‘जी मुक्त करते, ती कला होय’ असा याचा वाच्यार्थ आहे. अर्थातच, कलेसारख्या विस्तीर्ण आणि विलक्षण संवेदनशील क्षेत्राच्या संदर्भात, हा वाच्यार्थ पुरेसा नाही. त्याचा लक्ष्यार्थ आणि ध्वन्यार्थ इथे अभिप्रेत आहे. मग या ‘मुक्तते’चे अनेक पदर लक्षात येतात. विशेषत: तमाशा, लावणी या लोककलांच्या बाबतीत, ही मुक्तता अर्थांचे कित्येक पदर ओढून वावरते. ‘संगीतबारी’सारख्या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाच्या माध्यमातून या कला प्रकाराचा, परंपरेचा आणि ती जपणाऱ्या कलाकारांचा वेध घेणाऱ्या अभ्यासक, संशोधक भूषण कोरगावकर आणि प्रसिद्ध लावणी नृत्यांगना शकुंतला काळे नगरकर यांच्याशी साधलेला संवाद.

 

लोककलांचा इतिहास पाहिला, तर असं दिसतं की, लवचिकता आणि परिवर्तनशीलता, या दोन आधारांवर लोककला शतकानुशतके निरनिराळ्या जनसमूहांमध्ये वावरत आल्या आहेत. वेगवेगळ्या लोकमानसाचे मनोरंजन करत आल्या आहेत. केवळ घटकाभर करमणूक, यापलीकडे जाऊन लोककलांनी समाजमनात स्थान प्राप्त केले आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात, तमाशा आणि लावणी या लोककला प्रकारांचा प्रभाव दीर्घकाळ राहिलेला दिसतो. सोळाव्या शतकात या कलेचा उदय झाला असे मानले जाते आणि आज एकविसाव्या शतकातही हा कला प्रकार टिकून आहे. त्याच्या सादरीकरणात आज आमूलाग्र बदल झाला आहे. पण बदलत्या काळाशी, समाजाच्या आवडी-निवडीशी जुळवून घेण्याची लवचिकता आणि त्यानुसार परिवर्तनशील असे कलेचे रूप, यामुळेच तमाशा-लावणी आज अस्तित्वात आहे, असे निरीक्षण भूषण कोरगावकर यांनी मांडले.

 

तमाशा-लावणी ही एक रांगडी, शृंगारिक पण मनोरंजक बाब आहे. तमाशामध्ये नाटक आहेच, नृत्य आहे, गायन-वादन आहे, कथाकथन आहे. संदेश आहे. सौंदर्य तर आहेच, पण अन्य कलांमध्ये अभावाने दिसणारा मोकळेढाकळेपणा आहे. ही कला रसिकांच्या प्रतिसादानुसार बदलत जाते. लोकांना जे आणि जसे हवे, ते आणि तसे देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्यात एक प्रवाहीपणा आहे. ती वाहती राहिली आहे. वाटेत भेटेल, आवडेल त्याचा तमाशात स्वीकार आहे. त्यामुळे पारंपरिक गणगवळणी, स्तवन यानंतर तमाशामध्ये आजच्या चित्रपटातील एखादी लावणी सहज उपस्थिती लावून जाते..पण ती खटकत नाही. कुणी त्यावर आक्षेपही घेत नाही. या लवचिकतेचा फायदा म्हणजे तिचा टिकाऊपणा वाढतो. ती सतत लोकाभिरुचीचा विचार करते. या ओघात नवे कलाकार सातत्याने येत राहतात. आपापल्या वकुबानुसार कला सादर करतात आणि लोकभावनेचा आदर करत पेशकश करतात, असे भूषण म्हणाले.


अभ्यासाचा, संशोधनाचा भाग म्हणून तमाशा-लावणीचा विचार करत असताना, ‘संगीतबारी’च्या सादरीकरणाचा विचार सुचला. अभ्यासाच्या निमित्ताने अनेक संगीतबारी, पार्ट्या, कलाकारांना भेटलो. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचा कलाविष्कार अनुभवला. पारंपरिक रचना, सादरीकरणाच्या पद्धतींचा अभ्यास केला, शोध घेतला. हे सारे मग ‘संगीतबारी’ या पुस्तकाच्या रूपात ग्रथित केले. त्याचेच रंगमंचीय रूप ‘संगीतबारी’ च्या प्रयोगातून उभे राहिले. तमाशा हा कला प्रकार मूळ कसा होता, त्याचे सादरीकरण कसे होते, त्यात बदल कसे घडले, त्यानुसार सादरीकरण कसे बदलले..याचे दर्शन या प्रयोगातून घडवण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे भूषण म्हणाले.


संगीतबारीतील कलावती, नृत्यांगना शकुंतला नगरकर म्हणाल्या,‘मी जणू चाळ पायात बांधूनच जन्माला आले, घरची पार्टी होती त्यामुळे दिवसरात्र तमाशाच सुरू असायचा. मला सुरुवातीला आईकडूनच या कलेचे धडे मिळाले. पुढे गोविंदराव निकम आणि वसंतराव घाडगे यांनी मार्गदर्शन केले. तशी मी सेल्फ मेड कलाकार आहे. पाहून आणि ऐकून, निरीक्षणातून शिकत गेले. कथ्थक नृत्याचे धडे घेतले. गाणे मात्र ऐकून शिकले. जुन्या लावण्या आजही करायला आवडतात. माझे भाग्य मोठे म्हणून मला यमुनाबाई वाईकर, लक्ष्मीबाई कौलापूरकर यांना पाहता-ऐकता आले. यमुनाबाईंच्या अदाकारीला तोड नव्हती आणि लक्ष्मीबाई अप्रतिम नृत्य करत असत. इतरही अनेक कलावती आहेत. सगळ्यांकडून शिकण्यासारखे खूप होते. 


आपली ओंजळ थिटी पडते. पूर्वी आमची पार्टी वर्ष-वर्षभर एकेका शहरात खेळ करायची. कलेवर रोजचे पोट, असायचे. रोज तमाशाचा खेळ करायचा. रसिक पैसे देऊन येत. खेळाचा खर्च वजा जाऊन जे उरेल, त्यात  पार्टीतल्या सगळ्यांचे जेवणखाण भागवायचे, अशीच पद्धत होती. कंत्राटी खेळ नंतरच्या काळात आले. भूषण म्हणतात, संगीतबारीमधून आम्ही सर्व कलाकारांवर फोकस करतो. इतर ठिकाणी फक्त मुख्य कलाकारावर लक्ष केंद्रित केले जाते. संगीतबारीमध्ये  सुरुवातीला पेटीचा लेहरा धरणाऱ्या कलाकारालाही भरभरून दाद मिळते. गवळण होते. मुख्य नर्तिका येते. मग संवादातून, गाण्यातून, नृत्यातून, अभिवाचनातून तमाशाचा प्रवास उलगडत जातो. लावण्यांचे अनेक प्रकार सादर होतात. संगीतबारीचे प्रयोग आम्ही आता मराठीप्रमाणे हिंदी भाषेतही करतो आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


आधुनिक काळात जाणवणारा मुख्य फरक म्हणजे, पूर्वी तमाशा फक्त पुरुषांपुरताच होता. सर्व प्रेक्षक पुरुषच असायचे. आधुनिक काळात तमाशाला स्त्री प्रेक्षकांचा आश्रय मिळत आहे. शिवाय लावणीला कायम दुय्यम स्थान मिळत राहिले. प्रतिष्ठितांनी या कलेकडे नेहमी ‘वेगळ्या’ नजरेने पाहिले. आधुनिक काळात यात बदल घडले. तमाशा, लावणीचा सर्रास स्वीकार झाला. इतका की आता रिअॅलिटी शो साठी लावण्यांनाच अधिक मागणी असते. लावणी आता आधुनिक बनली आहे. खंत एकच वाटते, की तमाशा-लावणीचा स्वीकार झाला, पण ते पेश करणाऱ्या कलाकारांची स्थिती फारशी सुधारली नाही. आजही अनेक गुणी कलावंत अंधारातच आहेत, चाचपडत आहेत. संगीतबारीमधून याचाही उल्लेख होतो आणि तसे आवाहनही केले जाते.

 

लावणीतही ‘उपज’ असते….उमगावी लागते
शास्त्रीय संगीतात उपज नावाची संकल्पना आहे. गुरू तुम्हाला रागातली बंदिश शिकवतात, पण त्या बंदिशीचा विस्तार करायला कलाकारापाशी ‘उपज’ लागते. म्हणजे थोडक्यात गाणे सुचावे लागते. लावणीतही अशी उपज असते. ‘नेसली पितांबर जरी…’ ही लावणी करताना कलाकाराजवळ जर उपज असेल, तर तो कितीही वेळ ही लावणी रंगवू शकतो. ही बैठकीची लावणी, अदाकारीची लावणी म्हणून पेश करता येईल आणि खडी, नृत्याची लावणी म्हणूनही सादर करता येईल. आपण जसा जीव ओतू, तशी ती खुलत जाते. रंगत जाते. करता करता नव्या जागा सुचत जातात. बंधन कुठलेच नसते. तुम्ही ती खुलवू शकता, रंग भरू शकता. कलाकाराच्या प्रतिभेवर आणि क्षमतेवर तसेच संवेदनशीलतेवर हे अवलंबून असते. त्यासाठी समरस व्हावे लागते. परिश्रम करावे लागतात. ती साधनाच असते.
 

 

जयश्री बोकील
लेखिकेचा संपर्क : ९५११८६५३२८

बातम्या आणखी आहेत...