आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कट प्रतिमेची हौस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हर्च्युअल जगात वावरणे आता आपल्या अंगवळणी पडले आहे. आपण सतत ऑनलाइन असतो. क्षणभरासाठी  नेटवर्क बंद झाले, तरी आपण कासावीस होतो. प्रत्यक्षात आपण उपस्थित भले नसू, पण आपली व्हर्चुअल हजेरी सगळ्या (म्हणजे फेसबुक, ट्विटर, इन्ट्राग्राम, मेल, व्हाॅट्सअॅप वगैरे आभासी) व्यासपीठांवर असणे आपल्याला अनिवार्य वाटते. अलीकडे असाच एक नवा ट्रेंड हॉट फेव्हरिट आहे आणि तो म्हणजे वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित (थीम ओरिएंटेड) प्री वेडिंग शूट. खरं तर विवाहानंतर ते एकमेकांचे होणार असतातच, पण एकमेकांचे असे होणे, विवाहविधींच्याही आधी सोशल मिडियात शेअर करणे अगत्याचे झाले आहे.

 

त्यासाठी लग्नसोहळ्यापूर्वीच विशिष्ट थीम्सवर आधारित चित्रीकरण आणि छायाचित्रे शेअर करण्याचा नैमित्तिक विधि लोकप्रिय झाला आहे. प्री वेडिंग शूट करणाऱ्या काही फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्सशी संवाद साधताना या ट्रेंडमधील अनेक गोष्टी समजल्या.
थीम्समध्ये बॉलिवुड हवेहवेसे : बॉलिवुडच्या तारेतारका, त्यांनी साकारलेल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे पेहराव, आभूषणे, त्यांचा वावर, त्यांचे प्रेम करणे... हे सारे प्री वेडिंग शूटसाठी हवेहवेसे आहे, असे निरीक्षण प्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर अमित पटवर्धन यांनी नोंदवले. आवडत्या नायक-नायिकांवर चित्रित झालेली गाणी, त्याच पद्धतीने स्वत:वर चित्रित करून त्याचा व्हिडिओ अपलोड करणे, हा ट्रेंड अतिशय लोकप्रिय असल्याचे ते म्हणाले. सैराटमधली गाणी सर्रास अशी चित्रित केली जातात. त्यासाठी गाण्यांची निवड, पोषाख, मेकअप, केशरचना, आभूषणे... हे सारे मॅच केले जाते आणि त्यासाठी सढळ हाताने खर्च केला जातो, असेही पटवर्धन म्हणाले. 


पेशवाई थीम : बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पेशवाई ही थीम प्री वेडिंग शूटसाठी हॉट ठरली होती. भरजरी नऊवारी, नथ, साज, अंबाडा किंवा खोपा, वेल, कंबरपट्टा आणि चंद्रकोर... असा साजशृंगार करण्याचा ट्रेंड होता. काही प्रमाणात आजही आहे, अशी माहिती फोटोग्राफर सागर दाणी यांनी दिली. काही जोडपी दिलवाले दुल्हनिया...च्या काळात रमणारीदेखील भेटतात. त्यांना राहुल-अंजली-सिमरन यांचे गेटअप हवे असतात. काहींना छोट्या पडद्यावरील मालिकांमधील व्यक्तिरेखा आवडतात. त्यांच्या आवडीनुसार आम्ही त्यांना काही गोष्टी सुचवतो आणि व्यवस्थित चर्चा होऊन शूट फायनल होते, असे सागर यांनी सांगितले.


रंगांची थीम : काही जोडप्यांना प्री वेडिंग शूटसाठी रंग हीच थीम वापरण्याची इच्छा असते. मग लाल किंवा गुलाबी रंगांची निरनिराळी डिझाईन्स वापरून शूट पार पडते. काहींना पारंपरिक पोषाख आवडतात तर काहींना आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे कपडे हवेसे वाटतात. काही मंडळींना दोन्ही पद्धतींचा संगम अपेक्षित असतो. त्यांच्या मागणीनुसार आम्ही पॅकेज देऊ शकतो, असे फोटोग्राफर नीलेश कुलकर्णी म्हणाले. 


लोकेशन्सचे वैविध्य : प्री वेडिंग शूटसाठी समुद्रकिनारे आणि बागा ही हॉट डेस्टिनेशन्स आहेत. त्यामुळे अनेक जोडपी फोटो आणि शूटसाठी कोकणचा पर्याय निवडतात. बागांमध्येही अनेक शूट केली जातात. शहराच्या बाहेर शूट असेल तर खर्चात वाढ होते. काही जोडपी गडांवरही शूट करतात. काही जण हिल स्टेशनचा पर्याय निवडतात. पुण्याजवळ ताम्हिणी घाट, मुळशी, गिरीवन, धरणांचे बॅकवॉटर, खासगी रिसॉर्ट, जाधवगड (हेरीटेज हॉटेल), ढेपेवाडा, मेणवली, वाई, भोर, आदि ठिकाणे प्री वेडिंग शूटसाठी लोकप्रिय आहेत.


पॅकेजनुसार बजेट : विवाह ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असल्याने सढळपणे खर्च केला जातो. त्यामुळे प्री वेडिंग शूटसाठीही आता वेगळे बजेट ठरवले जाते. साधारणपणे शहर आणि आसपासची ठिकाणे, हे लक्षात घेता प्री वेडिंग शूटचे बजेट १५ हजार ते ५० हजार या दरम्यान असते. त्यात थीम, लोकेशन, ड्रेस डिझाइनर, ब्यूटिशियन, सहायक असे खर्च अंतर्भूत असतात. काही ठिकाणी प्रवासखर्चासह पॅकेज दिले जाते. हे सारे चित्रीकरण व्यवस्थित संपादित करून शक्य तितक्या लवकर सोशल मिडियावर शेअर करणे, हा या ट्रेंडमागचा उद्देश असतो. पूर्वीच्या काळी विवाहाचा पुरावा म्हणून आणि त्या मंगलक्षणांची आयुष्यभराची आठवण म्हणून छायाचित्रे, पत्रिका असायच्या. आता आधुनिक काळात व्हर्च्युअल प्रेझेंन्समधील अप टू डेट असणे, असा नवा आयाम मिळाला आहे. थोडक्यात 
म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असली पाहिजे, असा ट्रेंड दिसतो.

 

- जयश्री बोकील, पुणे

jayashree.bokil@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...