आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरे मन की उडी पतंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 जयश्री दाणी

मकरसंक्रांत आणि पतंग यांचे अतूट नाते आहे.  भोगी, संक्रांत, किंक्रांत या दिवशी आकाशभर रंगीत रंगीत पतंग आढळतात. लहानांपासून तर थोरामोठ्यांपर्यंत सगळे पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद घेतात


मकरसंक्रांत आणि पतंग यांचे अतूट नाते आहे.  भोगी, संक्रांत, किंक्रांत या दिवशी आकाशभर  रंगीत पतंग आढळतात. लहानांपासून तर थोरामोठ्यांपर्यंत सगळे पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद घेतात. सगळ्यात आधी पतंग उडविण्याची प्रथा चीनमध्ये होती असे मानले जायचे  रामचरीत मानसच्या बालकांड  प्रकरणात प्रभू श्रीरामाने बाल्यावस्थेत बाल हनुमानासोबत पतंग उडविल्याचा उल्लेख आहे.


“राम इक दिन चंग उड़ाई।
इंद्रलोक में पहुंची जाई
।।” 

या ओळींमधून तो संदर्भ स्पष्ट होतो. अयोध्येत उत्तरायण महोत्सव सुरू असताना छोट्या रघुरायाने पतंग उडवली. दोऱ्याला ढिल दिली असता पतंग थेट देवलोक-इंद्रलोकांत गेली. इंद्रपुत्र जयंतच्या वधूला अचानक दारी आलेली सुंदर पतंग खूप आवडली. इतकी आकर्षक पतंग उडविणाऱ्या चित्ताकर्षक व्यक्तीला पहायला तिचे मन उत्सुक झाले. तिने पतंग धरून ठेवली. बराच वेळ उलटून गेल्यानंतरही पतंग दृष्टीक्षेपात येत नाही असे पाहून श्रीरामाने हनुमंताला पतंग आणायला नभी पाठविले. तिथे इंद्र स्नुषेने प्रभू रामाचे दर्शन घेण्याची इच्छा प्रकट केली. हनुमानाने हा निरोप रामाला दिल्यानंतर श्रीरामाने चित्रकूट येथे इंद्र स्नुषेस भेटण्याचे वचन दिले. त्या वचनाने आनंदित होऊन तिने त्वरित पतंग सोडून दिली.


“तिन तब सुनत तुरंत ही, दीन्ही छोड़ पतंग।
खेंच लइ प्रभु बेग ही, खेलत बालक सं
ग।” 

अशातऱ्हेने पतंग उडविण्याची सुरुवातही भारतात झाल्याचे व प्रभू श्रीरामाने पहिली पतंग उडविल्याचे ज्ञात होते. 


“मेरे मन की उडी पतंग 
पकड़ लो श्याम पतंग की डोर,
अटके न भटके कही 
उड़े ये ब्रजमंडल
की और”

कृष्णभजनातील या ओळींमधूनही आपले, आपल्या देशाचे पतंग उत्सवाशी असलेले पुरातन नाते अधोरेखित होते. 

पतंग उडविण्याच्या या परंपरेला धार्मिक तसेच वैज्ञानिक परिमाणेही आहेत. सकाळच्या थंडगार वातावरणात कोवळ्या उन्हात पतंग उडवितांना अंगाखांद्याला सूर्याची किरणे स्पर्शून आरोग्य अधिक निरामय रहायला फायदा होतो तसेच त्वचासबंधी रोग नष्ट होतात. बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून ढगांमध्ये विद्युत ऊर्जा असल्याचे सिद्ध केले आहे. पतंगाचे दोन समान भाग पतंगाचा समतोल राखून पंखासारखे कार्य करतात. पतंगाचे निमुळते टोक पतंगाला हवेत जाण्यास मदत करते.
पूर्वीच्या काळात संदेश पाठविणे व हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठीही पतंगाचा उपयोग झालेला आहे. युद्धकाळात शत्रुसैन्याला घाबरविण्यासाठी, टेहळणीसाठीही पतंगबाजी वापरण्यात आलेली आहे. अजूनही मोठ्या पतंगांवर सामाजिक हितोपयोगी संदेश, घोषणा छापून दूर दूरवर पसरविल्या जातात. पतंगीला लंगोटदार, टोकदार, सब्बलदार, पटलेदार, मुछाकडा, सिंगदार, चिल, चिन्नाकडी, धड्डा अशा आगळ्या वेगळ्या नावानेही संबोधतात. 
भारतात जसा जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव असतो तसाच विविध देशांतही त्या त्या देशातील ऋतुमानानुसार पतंगोत्सव साजरा केल्या जातो. ऑस्ट्रेलियात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सिडनी येथे “फेस्टिव्हल ऑफ विन्ड्स” , चीनमध्ये एप्रिल महिन्यात “काईट फेस्टिव्हल” तर जपानमध्ये मे च्या पहिल्या आठवड्यात शिजुका प्रांतात पतंग उत्सव साजरा करतात. पतंग उडविल्याने देवी देवता प्रसन्न होतात अशी जापनीज नागरिकांची श्रद्धा आहे. ब्रिटनमध्ये ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात “पोर्टसमाऊथ इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलचे” आयोजन केल्या जाते. त्यात भव्य दिव्य पतंगीसोबतच थ्री डी डिझाईनच्या पतंग पतंगबाज उडवितात. इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका, अमेरिका, इटली या देशातही पतंगबाजीची धूम असते. 
ऑस्ट्रेलियातील रॉबर्ट मूर यांनी सन २०१४मध्ये सर्वात उंच (४९००मीटर) पतंग उडविण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. २००५ मध्ये कुवैत येथील काईट फेस्टिव्हलमध्ये अब्दुल रहमान आणि फारीस यांनी जगातील सगळ्यात मोठी पतंग (२५ मीटर लांब ४०मीटर रुंद) उडविण्याचा रेकॉर्ड केला आहे.  २००६मध्ये चीन येथील मा क्विंगहुवासेट यांनी एका दोरीला ४३पतंग अडकवून उडविण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. २०११मध्ये युनायटेड नॅशनल रिलीफ अँड वर्क एजेंसीतर्फे फिलीपाईन्सच्या बालकांसाठी गाजा समुद्रकिनाऱ्यावर १२३३५ पतंग उडविल्याची नोंद आहे. 
पतंग उडवताना जसा आनंद होतो तसेच मांज्यात अडकून कुणी पक्षी , मनुष्यप्राणी जखमी होऊ नये याची काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले जाते. कारण हा सण आंनदाचा आहे, एकोप्याचा आहे.

संपर्क - 8275487114
 

बातम्या आणखी आहेत...