आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी सोडून व्यवसायात उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयश्री देशमुख

आयटीसारख्या क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून व्यवसायाचा विचार करणाऱ्यांची आपण मूर्खात गणना करू. नोकरी सोडण्याच्या निर्णयाचा परत विचार करण्याचा फुकटचा सल्लाही देऊ. मात्र ‘लोक काय म्हणतील’याकडे कानाडोळा करून आवडत्या कलेतून उद्योगाची वाट चोखाळण्याची हिंमत दाखवणारे अगदीच मोजके असतात. असं धाडस दाखवणाऱ्या मृण्मयीची ही गोष्ट...  
पुण्यात एम. टेक. करताना तिला नोकरीची संधी चालून आली. मात्र आयटी क्षेत्रातल्या नोकरीत तिचं मन रमलं नाही. ४-५ वर्षे नोकरी करून तिने राजीनामा देत गावाची वाट पकडली. आईवडिलांनी पाठिंबा दिला तरी नातेवाईक, शेजाऱ्यांनी तिला मूर्खात काढले. तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. बालपणापासून अंगी असलेल्या चित्रकलेच्या वेडानं डोके वर काढलं. तिच्या याच चित्रकला वेडानं फॅशन जगतासह देशविदेशात तिला ओळख मिळवून दिलीय. 

मृण्मयी चांदूरकर मूळ अमरावतीच्या दर्यापूरची. आईवडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक. चौकोनी कुटुंबातील मृण्मयीला  चित्रकलेची आवड बालपणापासूनच होती. परंतु समवयस्कांसोबत तिने  केमिकल इंजिनिअरिंग केले. द्वितीय वर्षालाच  नोकरीची संधी मिळाली. मात्र नोकरीत मन न रमल्यानं तिने राजीनामा देऊन गावातलं घर गाठलं. कलेला वेळ देता यावा म्हणून नोकरी सोडल्याचे कळताच आईवडील वगळता सर्वांनीच तिला मूर्खात काढले. मात्र बिहार राज्यातली पारंपरिक मधुबनी तिला खुणावत होती. मधुबनी आर्टिस्ट भारती दयाल यांचं मार्गदर्शन तिनं घेतलं. त्यातले बारकावे तिने अवगत केले. अनेक नवे प्रयोग केले. मधुबनीच्या पारंपरिक पेंटिंगमधील रंगांत बदल करून त्यांना मॉर्डन टच दिला. शिवाय प्रत्येक राज्यातील पारंपारिक कलेचा अभ्यास करून त्यांचा मधुबनी कलेसोबत मेळ साधला. तिच्या याच प्रयोगशिलतेमुळे तिच्या मधुबनी डिझाईन्सने मुंबई, दिल्ली व दुबई येथे झालेल्या फॅशन शो मध्ये स्थान मिळवत उपस्थितांची वाह वाह मिळवली आहे. कपडा, लाकूड, काच, पेपर अशा विविध वस्तुंवर मृण्मयी करत असलेल्या पेंटिंग्जला मुंबई, दिल्ली, केरळ, कर्नाटक, चेन्नई, हैद्राबाद येथे जास्त मागणी अाहे. याशिवाय दुबई, सिंगापूरसह युकेमधील डलास, फ्रान्समध्येही तिच्या पेंटिंग्जने तिला महिला उद्योजक म्हणून ओळख मिळवून दिलीय.खच्चीकरण करणारेच थोपटताहेत पाठ 
 
केवळ कलेची आवड जोपासण्यासाठी हातातली गलेलठ्ठ पगाराची पुण्यातली नोकरी सोडून मृण्मयी  घरी आली होती. सुरुवातीच्या काळात अनेकांनी फुकटचे सल्ले देऊन तिचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याकडे लक्ष न देता तिने आपली कलेची आवड जोपासत त्यात विविध प्रयोग केले. कलेला व्यवसायाचं रूप देत उत्पन्नाचा मार्ग शोधला. मृण्मयीनं स्वत:ला सिद्ध केल्याने पूर्वी तिला वेड्यात काढणारे लोक आज तिची पाठ थोपटून कौतुक करीत आहेत.डिझाइन्ससाठी वापरते टाक 


पूर्वीच्या काळी पेन नव्हते. तेव्हा पक्षाचे पंख िकंवा टोकदार आणि नक्षीकाम केलेल्या मध्यम आकाराच्या बारीक काडीचा उपयोग लिखाणासाठी केला जायचा. त्याला टाक म्हणत. शाईच्या दौतीमध्ये बुडवून या टाकानं लिहिले जायचं. आज टाक कालबाह्य झाले आहेत.परंतु मृण्मयी डिझाइन्स व फिनिशिंगसाठी याच टाकाचा उपयोग करते.

लेखिकेचा संपर्क : ९३४००६१८३५