आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग संवर्धनातल्या ‘धारिणी’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण रक्षणात योगदान देणाऱ्या, स्वत:सह इतरांनाही वृक्षसंवर्धनाची गोडी लावत सामाजिक कर्तव्याला जागणाऱ्या ‘धारिणीं’च्या कामाची ही ओळख...

 

साहित्य, राजकारण उद्योग, कला, क्रीडा आदींसह विविध क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. देशाच्या विकासात पुरुषांसह महिलांचे याेगदानही मोलाचे आहे. घर व बाहेर दोन्हींची जबाबदारी त्या उत्तमपणे सांभाळत आहेत. पुरुषांच्या क्षेत्रातही त्या आपली छाप सोडत आहेत. मेळघाटातील सामाजिक वनीकरणामध्ये दोन रणरागिणी कार्यरत असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची धुरा त्या आपल्या खांद्यावर लीलया पेलत आहेत.
भाग्यश्री ठाकूर. धारणी सामाजिक वनीकरणामध्ये आरएफओ म्हणून मागील दीड वर्षापासून कार्यरत आहेत. मूळच्या बीडच्या असलेल्या भाग्यश्री दीड वर्षाचे दार्जिलिंग येथे प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर मेळघाटातच त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. मागील दीड वर्षापासून त्या धारणी येथे कार्यरत आहेत, तर दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील पूनम चव्हाण या मागील तेरा वर्षांपासून गार्ड म्हणून कर्तव्य बजावत आहेत. पूर्वी जवळपास सहा ते सात वर्षे त्या चौराकुंड परिक्षेत्रात कार्यरत होत्या. सहा वर्षांपूर्वी त्या धारणीत बदलून आल्यात. त्यांना परिसराची एकूण एक माहिती आहे. एकूण पाच जणांचा स्टाफ असून त्यामध्ये भाग्यश्री व पूनम या दोन महिला आहेत, परंतु महिला असूनही त्या आपल्या कामात कसूर ठेवत नाहीत हेही विशेष. 


शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत त्यांचाही सहभाग असून त्यासाठी १ लाख ४० हजार रोपे लावण्याचे त्यांचे नियोजन असून ते अर्ध्यापेक्षा अधिक पूर्णही झाले आहे. वृक्ष संवर्धनात स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढावा व मेळघाटातील निसर्गसौंदर्यात भर पडावी म्हणून त्या मजुरांच्या मदतीने काम करत आहेत. त्यासाठी रात्रीचा दिवसही करत आहेत. फिल्डवर काम करत असताना ग्रामस्थांचे मिळणारे योगदान काम करण्याचा हुरूप वाढवतो, असे मत दोघींनीही व्यक्त केले. त्यांच्या हाताखाली एकूण ३७ मजूर असून त्यापैकी २० महिला आहेत. आदिवासी महिला व  पुरुष मजूर हे कामात कोणतीही कसर ठेवत नसल्याचेही त्यांनी सांिगतले. शासनाच्या याेजनेला बळकटी यावी म्हणून त्या विविध माध्यमांतून आदिवासी जनतेमध्ये जनजागृती करून त्यांचा सहभाग वाढवून घेण्यावर भर देत आहेत.

 
वृक्ष लागवडीसाठी त्यांनी ४० विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड केली असून यामध्ये औषधीयुक्त झाडे, जंगली व फळझाडे असून रस्त्याच्या कडेने तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर झाडे लावणार असून शेताच्या बांधावर लावण्यासाठी जांभूळ, शेवगा आदी प्रकारची फळझाडे लावण्याला प्राधान्य देत आहेत. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना फळझाडांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न घेता यावे हा आहे. मेळघाट वगळता अन्य कुठेही नोकरी केली, तर इथे जो कामाचा आनंद मिळतो, तो अन्य मिळेलच असे नाही, असे मत भाग्यश्री ठाकूर व पूनम चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याने मजूरही प्रभावित होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...