आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी हवीच...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयश्री पुराणिक

मुलगी सर्वांनाच नकोशी असते असं नाही. मुलगी नाही म्हणून खंत वाटणाऱ्या एका आईची ही आंतरिक तळमळ...


माझं बालपण एका सर्वसाधारण कुटुंबातलं. आम्ही तिघी बहिणी. आमचं एकमेकींशिवाय पानही हलत नसे. मोठी बहीण आणि आईंचं तर वेगळंच नातं होतं मैत्रीचं. हे बघतच मी मोठी झाले. माझी अक्का जेव्हा बोहल्यावर चढली तेव्हा आईच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं. तेव्हाच माझ्या बालमनावर हे कोरलं गेलं की मीही अशीच लग्न होऊन जाईन, मलाही माझ्या अक्कासारखीच जीव लावणारी मुलगी असेल. कोवळं मनच ते. शालेय जीवनातही आमचा मुलींचा ग्रुप मुलांपेक्षाही सगळ्यात पुढे असायचा.

कालांतराने माझे लग्न झाले. पहिल्यांदा दिवस राहिले व मुलीसाठीची भावना उफाळून येऊ लागली, आपल्याला मुलगीच हवी. पण हाय रे दैवा मुलगाच झाला. पहिल्या वेळेसच नाही तर दुसऱ्याही वेळेस. मुलींमध्ये येणारी समज, मुलींचं आपल्या आईबाबांशी असलेलं नातं, मुलींना असणारी कपड्यांची हौस, त्यांचं ते नटणं-मुरडणं या सगळ्या आनंदाला मी कायमची मुकले. त्या समाधानापासून अनभिज्ञच राहिले. 

आपल्याकडे  एक म्हण प्रचलित आहे, ‘पहिली बेटी धनाची पेटी.’ किती गहन अर्थ आहे या म्हणीमध्ये. मुलगी ही खरंच आईवडिलांची धनाची पेटी आहे.  प्रेमरूपी धनाची. कारण मुलीच्या लग्नानंतर मुलीच्या आईवडिलांना दुप्पट प्रेम मिळते, मुलीचं व जावयाचंसुद्धा. त्यामुळेच असं वाटतं की,  खरंच प्रत्येकाच्या घरात एक मुलगी हवीच. चिऊ चिऊ करणारी चिमणी, भावाबरोबर मस्ती करणारी बहीण, आईची खास मैत्रीण, बाबांची लाडो. म्हणून सांगते मैत्रिणींनो, माता-भगिनींनो गर्भलिंगनिदान करू नका, गर्भपात करू नका. 

‘कन्या नाही जिच्या कुळी, त्या माउलीची रीती झोळी’
 
 
लेखिकेचा संपर्क : ९६३७८३५२६०
 

बातम्या आणखी आहेत...