आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत तेलाचे महत्त्व

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयदेव डोळे

तेलाचे विविध प्रकार असतात. खाद्यतेल, इंधनतेल, वंगणतेल, मर्दनतेल, केशतेल, कीटकनाशक तेल इत्यादी. प्राणी कधीही तेल वापरत नसतात. माणसाने तेल शोधले आणि वापरण्यास सुरुवात केली. माणूस तेल शरीरातही घेतो व शरीरालाही लावतो. शरीरात खूप तेल गेल्यास मेदवृद्धी होते. म्हणजे चरबी वाढते. शरीराबाहेर लावावयाचे तेल प्रामुख्याने पहिलवान वापरतात. अशी वाच्यता मुख्यमंत्र्यांनी वारंवार गेल्या महिन्यात केली. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला तेलाचा एक हिंसक, आक्रमक आणि वर्चस्ववादी वापर कळला. मुख्यमंत्री निवडणुकीत कुस्ती, पहिलवान, तेल, तयारी असे शब्दोच्चार करत सुटल्याने मराठी तरुण पिढीस निवडणूक म्हणजे झटापट करणे, अंगाला अंग भिडवणे, कान पिळणे, मानेला हिसडा देणे, जोरात ढकलणे, पायात पाय घालणे, कंबर धरून ठेवणे, पाठ जमिनीला टेकवण्यासाठी ताकद लावणे असे ज्ञान झाले. टीव्हीवर कुस्त्यांच्या स्पर्धा बघत बघत मोठ्या झालेल्या या पिढीने मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीला कुस्त्यांची चिकटवलेली प्रतिमा फार मनावर घेतली. ‘आम्ही अंगाला तेल लावून पहिलवान तयार केले अन् समोर कुणीच कुस्तीला तयार नाही, हे कसले प्रतिस्पर्धी,’ असा शड्डू ठोकून मुख्यमंत्री बोलत राहिले. त्यामुळे तरुण पिढी आणखीच जिज्ञासू झाली. अंगाला तेल लावणे हा तेलाचा गैरवापर का नाही मानायचा? असा नतद्रष्ट विचार काहींच्या मनात आला. तर काहींनी सध्याच्या बेकारीवर उपाय म्हणून तेल विकणे सुरू केले तर कसे, असाही विचार मनात आणला! अंगाला लावण्याचे तेल जमिनीतून काढतात की जमिनीवरून, याची माहिती नसलेल्यांनी गुगल सर्चवर जाऊन शोध सुरू केला.

अशा प्रकारे पाहता पाहता महाराष्ट्राची २०१९ ची विधानसभा निवडणूक तेलकट झाली. इतकी तेलकट की भलेभले घसरून पडले. सारी निवडणूक निसरडी झालेली. दिवाळीचे स्नान करण्यापूर्वी तेल व उटणे लावण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कित्येक उमेदवारांना प्रचंड घाई झाली, मतांच्या वर्षावात न्हाऊन जाण्याची. त्यांनी अंगाला तेल चोपडून घेतले. वाटले ऊन ऊन पाण्याची अंघोळ होईल. पण सारा ठंडा मामला. पाणी धड तापलेच नाही. कोमट पाण्याचीच अंघोळ करावी लागली. दिवाळीच्या तोंडावर केलेली सारी तयारी वाया गेली. अनेकांनी या फजितीला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले. म्हणे, त्यांनी उगाचच तेलाचा विषय काढला. समोर जमलेले लोक पाहून त्यांना दुप्पट स्फुरण चढले अन् म्हणत सुटले की आमचे पैलवान अंगाला तेल लावून तय्यार आहेत; पण समोर कुस्ती लढायला कोणीच नाही! म्हणजे फडणवीसांचे म्हणणे असे पडले की, इतके तेल वाया गेले. व्यायाम, खुराक आणि फडाचा खर्चही वाया गेला. फड सांभाळणारे नवीसच ते. फड कुस्त्यांचाही असतो. हिशेबाचा म्हणजे कचेरीचाच नसतो, हे त्यांना उशिरा कळले. बस्स! हायवेवर सांडलेल्या तेलावरून जाणारी दुचाकी जशी घसरून पडते तशी देवेंद्रांची स्थिती झाली. (उरला तमाशाचा फड. तो सध्या जोरात सुरू आहे.)

समोर कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष मुकाबल्यास उभा असल्याचे मुख्यमंत्री विसरले. तो तर दोन्ही अर्थांनी फड सांभाळणारा! उसाचा फड त्यांचाच, कुस्त्यांचाही त्यांचाच!! हा असा फडकरी माणूस! आपल्या उसाच्या फडात लबाड केशरी कोल्हा शिरल्याचे तो जाणून होता. अलीकडे कोल्ह्यांपेक्षा बिबटे जास्तच उसात लपतात याचाही पत्ता त्याला होता. बिबटा हा वाघाच्या जातीतील एक हिंस्र प्राणी. तो उसाच्या फडात काही भानगडी करण्यास जात नसतो. तिथे त्याला पुढाऱ्यांप्रमाणे खूप आश्रय आढळतो. बिबट्या वाघाला घाबरतो हे फडकरी साहेबांना ठाऊक असल्याने त्यांनी दादर, मुंबई येथून वाघास आवतान दिले. फडकरीसाहेब मूळचे कुस्तीचे चाहते आणि डावपेचांत तरबेज. त्यांनी वाघाला अंगास तेल लावून जाण्याचे संकेत दिले तसा कोल्हा घाबरला. उसाचा फड आपलाच या त्याच्या मनसुब्यावर तेल सांडले. बिबट्यालाही पळ काढावा लागला.

खूप तेल खाणाऱ्याला मेद म्हणजे चरबी चढते आणि ती पहिलवान पार्टीला झेपली नाही असे बोलले जात आहे. असभ्य भाषेत या तेलवाहू चरबीला माज, मद, उन्माद असे प्रतिशब्द असल्याचीही चर्चा आहे. तसे पाहू जाता निवडणुकीत चारचाकीचे, बाराचाकीचे, विमानाचे, हेलिकॉप्टरचे तेल खूप जळते. ते तेल जाळायचे अन् दुसरे अंगाला फासून दंड थोपटत राहायचे, यांत काही तरी गफलत झाल्याचेही कळते.

जे सर्वांपेक्षा खूप तेल जाळतात त्यांचा विजय असतो; मतदारांचे ‘ऑइलिंग’ जे सर्वात जास्त करतात, त्यांनाही जय प्राप्त होतो, असे म्हणतात. कुस्तीची उपमा उगाच बोलली गेली. तीऐवजी गुगली, बाउन्सर, हिट विकेट, दुसरा अशी क्रिकेटची वापरली असती तर? पण कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तिकडेही अध्यक्ष होऊन गेल्याचे वेळीच आठवले व मोह आवरण्यात आला.

बाय द वे, अंगाला तेल लावून कुस्ती खेळणे बाद होऊन जमाना झाला. मुख्यमंत्र्यांना खेळाचे नवे नियम माहीत नसल्याची कुजबुज सुरू झाली. आपला हा मल्ल इतका कसा विसराळू यावरही कयास व्यक्त केले जात आहेत. ‘ईडी’च्या पकडीतून निसटलेल्या प्रतिस्पर्ध्याने साताऱ्याच्या पावसातील जाहीर सभेत अंगाला तेल चोपडून भाषण केले; म्हणून गडी पुन्हा कोरडा सहीसलामत निसटला अशी तडजोड करावी, असा ‘फोन’ दिल्लीहून आल्याचे समजते. खरे खोटे ते(ल)च जाणे...

जयदेव डोळे, ज्येष्ठ विचारवंत

बातम्या आणखी आहेत...