आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन वाचणारा माणूस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयदेव डोळे
 
सध्या एक माणूस सदासर्वकाळ फोन वाचत असतो. काय करणार, रिटायर्ड झालेलाय तो; कोणी फोनवर बोलत नाही की कोणाला फोन करण्याचे कारण. एकदा काम सुटले की कारण-अकारण येणारे फोन थांबून जातात. मग काय करायचेॽ फोनवरच्या त्या बारक्या वर्तुळातल्या रिसीव्हरच्या चिन्हावर बोट काही जात नाही. त्या माणसाला मोठी गंमत वाटते; इतके तंत्र बदलले पण ऐकायच्या-बोलायच्या फोनची खूण मात्र ती ४० वर्षांपूर्वीच्या टेलिफोन रिसीव्हरचीच! ना तिथे ओठांचे, ना कानांचे चित्र. त्या व्हॉट॰सअॅप कंपनीलाही रिसीव्हरच दिसावा ना! जणू पूर्वीसारखे कोणी क्रेडलवरून डाव्या हाताने रिसीव्हर उचलून तो कानाला लावत उजव्या हाताने नंबरची बटणे दाबायची वाट पाहतेय...

हां, तर त्या माणसाच्या हातात पुस्तकाप्रमाणे फोनसुद्धा उघडा. त्याच्या काचेवर शब्दच शब्द. कित्तीही वाचा, हाताला कळच येत नाही. शिवाय अक्षरेही मोठी करता येतात. फोन आडवा केला की अजून सोप्पे. अंधारात बसून वाचा की सावलीखाली. इतके स्वयंप्रकाशित वाचन कधी करता येत नसे बुवा. खिडकी पकडून बसायची अट नाही, ना भक्क प्रकाशाचा बल्ब लावायची. एखादा लेख आवडला की हा माणूस त्याच फोनवरून स्वतःच्या ई-मेलवर साठवून ठेवायला पाठवून देतो. त्यासाठी त्याने आपल्याच नावात थोडा बदल करून दोन वेगवेगळी खाती उघडली आहेत. ही खातीदेखील बऱ्याचदा रिकामी रिकामी असतात. रिटायर्ड माणसाला त्याच्या ऑफिशियल कामापासून केवढी मोकळीक मिळालीय! रोजची मेल उघडून ती वाचत राहण्याची सक्ती गेली ती गेलीच. आता आपणच आपणाला आरामात वाचता यायला फोनचा वापर करायचा. म्हणजे फोन एकच. फिरत्या रंगमंचासारखा याऐवजी तो मंच. फोनची चक्क लायब्ररी करून टाकलीय या माणसाने. वाचनालयच जणू!

खरेच आहे हे. फोन म्हणजे केवढे मोठे वाचनालय असते. लंडन, न्यूयॉर्क, मुंबई, कोलकाता इथल्या वाचनालयांपेक्षा केवढी तरी प्रशस्त जागा अन् सदासर्वकाळ उघडी. तिकडे वर्गणी भरायला लागते, इकडे रिचार्ज म्हणतात वर्गणीला. प्रीपेड वा पोस्टपेड. म्हणजे पुस्तक, पेपर वाचायला आधी पैसे भरा अथवा नंतर. आपण वर्गणी भरून वाचन करतो याचा केवढा अभिमान या माणसाला. शिवाय फायदा असा की एक पेपर, एकच जर्नल अथवा एकच लेख कित्येकांना वाचता येतो. रांगेत उभे राहा असे कोणी सांगत नाही, ना कोणी वाट पाहा म्हणते. फोनवर बोलायला रांगेत उभे राहिलेले दिवस आठवतात. त्या माणसाला. फोनवर तेव्हा पीसीओत बोलता बोलता लोकांनी तिथल्या कागदावर लिहून ठेवलेले नंबर, नावे, तारखा वाचायला लागत. चला, फोनमुळे वाचन वाढवायची अप्रत्यक्ष तयारी तेव्हापासून झाली, नाही काॽ

माणूस आता फोनवरचे वाचन ठिकठिकाणी करत सुटलाय. जेवताना, टीव्हीसमोर बातम्या ऐकताना, जिना चढताना, प्रवास करताना, दवाखान्यात डॉक्टरने बोलावणे पाठवेपर्यंत, संडासात, पलंगावर झोपताना, झोपेतून सकाळी उठल्या उठल्या... इतका कसा काय अधाशी हाॽ हावरटच म्हणा ना. फक्त ऐकून होता तो ती सारी पेपरे, मासिके, साप्ताहिके. आता हा माणूस वचावचा ती वाचून काढतो. डॉलर्सच्या तुलनेत शेकडो रुपये कधी त्यांना मोजता आले नव्हते. आता जेवढा मजकूर खुला केलेलाय तेवढा तो वाचत राहतो. जाऊ दे, दुधाची तहान ताकावर. प्रत्यक्षाची भूक व्हर्च्युअलवर. कागदाची काचेवर...
भारतात कुठे काय चाललेय ते हा माणूस जाणून घ्यायला सदा उत्सुक. फार पूर्वी त्याने ऑनलाइनला निरंतर असा शब्द योजून एका पुस्तकात धडाही लिहिला होता. आता खरोखर मजकुराचे निरंतर उत्पादन, प्रसारण अन् वाचन चालूय. दोन डोळे अपुरे पडतील एवढा अमाप, अपरंपार मजकूर इथे वाचायला हजर. 

भारताबाहेरसुद्धा काय घडतेय याचे कुतूहल शमवते ही लायब्ररी. पण आयते मिळते तेवढेच वाचत नसतो हा माणूस. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे तऱ्हेतऱ्हेचे लेख हा हुडकत जातो अन् मूळचे काय वाचत होतो ते विसरतो. त्यामुळे एकाच विषयाची हाताळणी हे लेखक केवढ्या विविधतेने करतात ते वाचून तो थक्क होतो. माणूस किती अपूर्ण आहे हे त्याला कळून चुकते. मग आणखी चेव येऊन तो अजून काहीबाही वाचू लागतो. जिथे इंग्रजी बोलली जात नाही तिथले इंग्रजीतले नेमके शोधून हा पठ्ठ्या वाचायला सुरुवात करतो. नऊ भाषा जाणणारे बाळशास्त्री जांभेकर आताच्या काळी नुसते वाचतच बसले असते इतका मस्त मजकूर या फोनमधून स्रवत असतो. दर्पणबिर्पण काढणे त्यांनी कधीच टाकून दिले असते. फार तर भाषांतरे करीत राहिले असते. काय देऊ, काय नको, असे झाले असते त्यांचे !

अलीकडे फोनवर बोलणे जडच वाटते या माणसाला. माणसे विनाकारण फार बोलतात. तशा वाचाळांची पार्टी सत्तेवर आल्याचे निमित्तच पावले की काय साऱ्यांनाॽ हो, नाही, बरेय, नंतर असे जुजबी बोलून या माणसाने इतरांनाही कमी बोलायला भाग पाडलेय. इतके छान साधन वाचायला हातात असताना माणसे ते तोंडाला-कानाला काय म्हणून लावतातॽ वाचून शहाणपण येते हो. बडबडीने नव्हे! इंटरनॅशनल अन् नॅशनल रोमिंगऐवजी रीडिंगने जोडले पाहिजे या फोनला. मोबाइल लायब्ररीच खरीखुरी.

आता मधेच कुणाचा हा फोन...ॽ लायब्ररीत शांतता पाळतात हो...! हॅलो...!!

जयदेव डोळे - ज्येष्ठ विचारवंत

बातम्या आणखी आहेत...