Home | Editorial | Columns | jayprakash pawar article in marathi

पाच जिल्ह्यात युतीची कसरत

जयप्रकाश पवार | Update - Mar 12, 2019, 10:08 AM IST

सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच नाशिकसह अवघ्या उत्तर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या यंत्रणा अन् निवडणूक इच्छुक उमेद

 • jayprakash pawar article in marathi

  सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच नाशिकसह अवघ्या उत्तर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या यंत्रणा अन् निवडणूक इच्छुक उमेदवार कामाला जुंपले गेले आहेत. या एकूण धावपळीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक कसरत केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीला तसेच त्यांचा सत्तेतील सहभागी साथीदार शिवसेनेला करावी लागणार आहे. याचे प्रमुख कारण असे की, शतकी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला वा द्विदशकी वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला गमवण्यासारखे काहीच नाही. जे काही गमवायचे होते, नुकसान व्हायचे होते ते सर्व काही २०१४ च्या निवडणुकीतच झाले. त्यामुळे फायदा झालाच तर तो बोनस म्हणून समजला जाईल.


  गेल्या निवडणुकीच्या हंगामात देशभर उठलेल्या मोदी लाटेने परंपरा असलेले वा नसलेले अशा सर्वच पक्षांची धूळधाण उडवली होती. उत्तर महाराष्ट्राच्या परिप्रेक्षाचा विचार करता नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील लोकसभेच्या आठही जागांवर भाजपचे सहा, तर शिवसेनेचे दोन उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले. काँग्रेस वा राष्ट्रवादी यांना एकही जागा वाचवता आली नव्हती. नंदुरबार या आदिवासीबहुल मतदारसंघाची जागा तब्बल चार दशके काँग्रेसच्या वरचष्म्याखाली होती. किती वादळे आली, लाटा आल्या, राजकीय उलथापालथी झाल्या; पण नंदुरबारची जागा काँग्रेसपासून कुणीही हिसकावून घेऊ शकले नव्हते. ती जादू गेल्या निवडणुकीत झाली. थोडक्यात काय, तर उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकीचा पूर्वेतिहास लक्षात घेता ज्या मतदारसंघांमध्ये याअगोदर कधीकाळी भाजपचे कमळ फुलले असेल तेवढा अपवाद वगळला तर काँग्रेस या एकमेव पक्षाचा प्रभाव सर्वाधिक काळ राहिला आहे. परंतु २०१४ च्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेने सर्वच आठही मतदारसंघांमध्ये मुसंडी मारत काँग्रेसला भुईसपाट केले होते. त्यामुळेच येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे उमेदवार विजयी झालेच तर ही त्यांची कमाई म्हणा वा त्यांचे पुनरुज्जीवन झाले असे म्हणा. पण भाजप वा शिवसेनेच्या जागा हातच्या गेल्या तर त्यांच्यासाठी ही मोठी नामुष्की ठरू शकते. त्यातही भाजपच्या जागा घटल्याच तर त्याचा फटका पुढच्या काळातील विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  भारतीय राजकारणात काँग्रेसच्या गाय वासरू - नका विसरू, गरिबी हटाव यासारख्या घोषणांचे सामान्य मतदारांवर गारूड होते. नंदुरबारचा संदर्भ द्यायचा तर हा जिल्हा अन् त्यातील बहुसंख्य आदिवासी मतदारांनी आजवर काँग्रेसची साथ केली. गांधी परिवारातील इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल या सर्वांचेच या मतदारसंघावर निस्सीम प्रेम राहिले. त्यामुळेच गांधी परिवारातील नवीन पिढीतील सदस्याचा राजकारण प्रवेश निश्चित झाला की त्याची पहिली जाहीर सभा ही नंदुरबारच्या पंचक्रोशीत ठरलेली असते. राहुल गांधी यांची सभा असो की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्या हस्ते आधार कार्डचा शुभारंभदेखील याच जिल्ह्याच्या एका पाड्यावर करण्यात आला. तीच स्थिती नंतरच्या काळात नंदुरबारपासून वेगळ्या झालेल्या धुळे मतदारसंघाची होती.


  नाशिक लोकसभा मतदारसंघावर जवळपास चार दशके काँग्रेसचाच प्रभाव होता. सुरुवातीपासून काँग्रेसचेच उमेदवार विजयी होत आले. ही परंपरा खंडित केली शिवसेनेने. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचेही उमेदवार येथून विजयी झाले. तेव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटला तो आजतागायत त्यांच्यापासून लांबच राहिला आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची जमवाजमव करता येऊ शकते, त्यातून त्यांना पक्षकार्यात गुंतवून ठेवता येते, पक्षाच्या विचाराचे शिंपण सुरू राहू शकते, हे सर्व काही खंडित झाले. परिणामी नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच दिसेनासे झाले. काँग्रेसची जागा राष्ट्रवादीने घेतली. छगन भुजबळ यांच्या रूपाने या पक्षाला एक मातब्बर नेता मिळाल्यामुळे तसेच खुद्द शरद पवारांचे लक्ष यामुळे राष्ट्रवादीचे बस्तान बसले. अहमदनगरदेखील काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे याच पक्षाचे उमेदवार विजयी होत. तेथे शिवसेना व भाजपने काँग्रेसची परंपरा खंडित केली.


  काँग्रेसचेच एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेना प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा नातू आता भाजपचे बोट धरू पाहतोय. एकुणात, लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिकला सरळ की तिरंगी लढत होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नंदुरबारचा बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा खेचून आणते का, धुळ्यातील राजकीय गुद्दागुद्दी कोणाच्या पथ्यावर पडते अन् जळगाव जिल्ह्यातील जागा भाजप टिकवते की नाही याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


  जयप्रकाश पवार
  -निवासी संपादक, नाशिक

Trending