आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी - औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीत काम करताना मिळत असलेल्या तोकड्या रकमेतून वेश्यावृत्तीसाठी तसेच दारूसाठी पैसे पुरत नसल्याने तीन तरुण सहज पैसे मिळवण्याच्या हव्यासातून गुन्हेगारीकडे वळले. पिंप्री देशमुख येथे जेसीबी चालकाला लुटताना मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आणि कंपनी कामगार ते चोरटे असा प्रवास करणारे दोन तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले. त्यांचा एक साथीदार फरार आहे.
पिंप्री देशमुख (ता.परभणी) येथे मंगळवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री तिघा जणांनी एका जेसीबी चालकाला लूटमार करताना जबर मारहाण केली. यात जेसीबी चालकाचा मृत्यू झाला होता. हा खून करण्यापूर्वी औरंगाबादहून निघालेल्या या टोळीने औरंगाबाद व जालन्यातही लुटमारीचे प्रकार केले. खुनाच्या घटनेनंतर चोरलेल्या मोटारसायकलवर प्रवास करताना पुन्हा जालन्यात व औरंगाबादेत त्यांनी असेच प्रकार केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रवीण मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
असा केला खून : पिंप्री देशमुख शिवारात जेसीबीद्वारे शेतीचे कामे करणारा ऑपरेटर संतोष लिंबाजी सांगळे व हेल्पर उमेश रावत हे दोघे २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास शिवारात काम करून तेथेच झोपले होते. अजिंक्य जगताप (रा.पुंगळा, ता.जिंतूर), रामेश्वर सुभाष देवणाळे (रा.परभणी) व वैभव नंदू मानवतकर(ता.मेहकर) या तिघांनी संतोषचा गळा दाबून खून केला. तत्पूर्वी त्यांनी या दोघांकडे पैशाची मागणी करून एटीएम कार्ड व ७०० रुपये काढून घेतले होते. एटीएमचा पिन नंबर देत नसल्याच्या कारणावरून त्यांनी संतोषचा खून केला तर हेल्पर रावतला जबर जखमी केले होते.
याप्रकरणी रावतने दिलेल्या फिर्यादीवरून दि.२२ रोजी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे फौजदार प्रकाश कापुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या संदर्भातील धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार अजिंक्य जगताप हा नातेवाइकांना भेटण्याच्या निमित्ताने सातत्याने या भागात येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने त्याचा शोध सुरू केल्यानंतर रामेश्वर व वैभव या दोघांनाही पोलिसांनी आठवडाभरात ताब्यात घेतले. अजिंक्य जगताप हा फरार आहे.
लूटमारीचा प्रवास खुनापर्यंत
औरंगाबादेतून निघालेल्या या तिघांनी चित्तेगावमध्ये एकाला चाकूचा धाक दाखवून लुटले होते. तेथून एक मोटारसायकल चोरून त्यांनी पुढचा प्रवास करीत जालन्यातही एकाला लुटले. विशेषतः एटीएम कार्ड हिसकावून त्याचा पिन नंबर ते घेत. पिंप्री देशमुखमध्येही त्यांनी रोख रकमेबरोबरच एटीएम कार्ड घेऊन त्याचा पिन नंबर मिळवण्याच्या प्रयत्नात चालक संतोष सांगळेला मारहाण करीत त्याचा गळा दाबून खून केला होता. जाताना या दोघांनी चोरलेली मोटारसायकल जालन्यात सोडून तेथे एकाला मारहाण करीत लुटले. औरंगाबाद येथेही याच पद्धतीने एकाला लुटले.
सर्वच प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग
पैशाच्या हव्यासापोटी गुन्हेगारी जगतात शिरलेले हे तिघेही अवघ्या २१ ते २२ वर्षाचे व शिक्षित आहेत. अजिंक्य जगतापने तर जनावरे, मोटारसायकली चोरण्यापासून लुटमारीचे प्रकार केले आहेत. त्यातूनच त्याने या दोघांना सोबत घेऊन सातत्याने गुन्हेगारी कृत्य करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच तो पुंगळा येथे न जाता पिंप्री देशमुख शिवारात नातेवाइकांकडे येत असे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.