आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेचा मुख्यमंत्री हवा असेल तर आता भाजपला साथ द्या, प्रशांत किशाेर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लाेकसभा निवडणुकीत युती करायची की नाही, याविषयी शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण असतानाच राजकीय रणनीतिकार अशी अाेळख असलेले व 'जदयू'चे उपाध्यक्ष प्रशांत किशाेर यांनी मंगळवारी 'माताेश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. 'महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर लाेकसभा निवडणुकीत भाजपशी युती करून दाेन्ही पक्षांचे जास्तीत जास्त खासदार निवडून अाणा व युतीची ताकद वाढवा,' असा सल्ला प्रशांत किशाेर यांनी ठाकरेंना दिला. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन, अशी ग्वाहीही दिल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. 

 

विभागनिहाय पदाधिकारी, नेत्यांच्या बैठका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मंगळवारी राज्यातील सर्व खासदारांची माताेश्रीवर बैठक घेतली. भाजपशी युती करायची की नाही, हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा हाेता. काही खासदार युतीसाठी अाग्रही असताना, फक्त युतीवरच विसंबून न राहता राज्यातील सर्व मतदारसंघांत स्वबळाचीही तयारी सुरू ठेवा, असे अादेश ठाकरेंनी दिल्याची माहिती या बैठकीस उपस्थित एका खासदाराने 'दिव्य मराठी'शी बाेलताना दिली. भाजपने शिवसेनेला एक जागा वाढवून म्हणजे २३ जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याची माध्यमांतून दिवसभर चर्चा हाेती, मात्र असा काही प्रस्ताव पक्षाकडे अाला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी बैठकीत स्पष्ट केल्याचे हा खासदार म्हणाला. 


शिवसेनेला हव्यात भाजपकडील तीन जागा : भाजपकडून लाेकसभेसाठी २३- २५ फाॅर्म्युलाच प्रस्तावाची चर्चा असली तरी शिवसेना २४- २४ जागांवर ठाम अाहे. त्यातही भाजपकडील पालघर, भिवंडी व उत्तर- पूर्व मुंबईची जागा शिवसेनेला हवी अाहे. मात्र, भिवंडीचे खासदार नरेंद्र पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्याने या जागेबाबत शिवसेना तडजाेड करू शकते. मात्र, इतर दाेन लाेकसभा मतदारसंघ काेणत्याही परिस्थितीत शिवसेनेला हवेच अाहेत. भाजपने या जागा देण्याची तयारी दाखवली तरच शिवसेना युतीसाठी सकारात्मक काैल देऊ शकेल, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. 


ऊठसूट पंतप्रधान माेदींवर टीका करणे टाळाच : उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या सभेत 'चाैकीदार चाेर है' अशी टीका केली हाेती, त्या वक्तव्यामुळे मोदी नाराज झाल्याचे प्रशांत किशाेर यांनी ठाकरेंना या भेटीत सांगितले. तसेच युती करायची असल्याने यापुढे तुम्ही अशी वक्तव्ये टाळावीत, असा सल्लाही प्रशांत यांनी ठाकरेंना दिला. प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा सर्व्हे केला अाहे. त्याअाधारे स्वबळावर लढल्यास शिवसेनेला किती जागा मिळू शकतील, याबाबतही त्यांनी सांगितले. या परिस्थितीत स्वबळापेक्षा युतीच हिताची, असा निष्कर्ष काढणारा अहवालही त्यांनी ठाकरेंना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 
शिवसेना खासदारांनाही मार्गदर्शन 
'माताेश्री'वर अालेल्या प्रशांत किशाेर यांची उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांशीही चर्चा घडवून अाणली. या वेळी किशोर म्हणाले, 'भाजप- शिवसेना युतीसाठी मी प्रयत्न करत अाहे. एक-दोन जागांसाठी युती तुटू नये असे मला वाटते. भाजपकडून आपण जास्तीत जास्त जागा घेऊ आणि मागील वेळेपेक्षा जास्त खासदार निवडून आले तर युतीची ताकद वाढेल अाणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकेल. त्यासाठी मी प्रयत्न करीन.' मला शिवसेनेसोबतही काम करायचे असल्याचे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

माेदी-अमित शहांचे 'दूत' ठरतील प्रशांत 
भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून मनधरणी करूनही उद्धव ठाकरे युतीसाठी तयार हाेत नसल्याने अखेर प्रशांत भूषण यांना नरेंद्र माेदी व अमित शहा यांनी एनडीएचा 'दूत' म्हणून माताेश्रीवर पाठवल्याची चर्चा अाहे. इतकेच नव्हे, तर स्वबळावर लढणे शिवसेनेला कसे महागात पडू शकते, हे अापण स्वत: महाराष्ट्रात केलेल्या सर्वेक्षणाचा अाधार देत प्रशांत यांनी ठाकरेंना पटवून दिल्याचे सांगितले जाते. 
 

 

बातम्या आणखी आहेत...