आर्थिक संकटामुळे ‘जेट’ची उड्डाणे बंद; दिवाळखोरीमुळे प्रवाशांना द्यावयाच्या सेवा, इंधन भरण्याचेही वांदे

दिव्य मराठी

Apr 18,2019 10:52:00 AM IST

मुंबई - आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेजने आपली विमानसेवा बुधवारपासून बंद केली आहे. या कंपनीची आंतरराष्ट्रीय उड्डाणे ११ एप्रिल राेजी रात्रीपासूनच बंद करण्यात आली आहेत. निधी उपलब्ध नसल्याने इंधनासह इतर सेवांसाठी कंपनी रक्कम देऊ शकत नसल्याने ही विमाने रद्द करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.


भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली आठ बँकांच्या गटाने कर्जपुरवठ्याच्या दृष्टीने ताेडगा काढण्याच्या दृष्टीने कंपनीची ७५% मालकी विकण्यासाठी बाेली प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया १० मे राेजी पू्र्ण हाेणार असल्याने किमान एक महिना जेटची सर्व उड्डाणे रद्द राहतील, हे स्पष्ट झाले आहे. स्टेट बँकेसह इतर बँकांच्या भूमिकेनंतरच जेटचे भवितव्य ठरणार आहे.


पुढे काय?... आता जेटच्या शेअर्सचा होईल लिलाव
आता जेटच्या ७५ टक्के शेअर्सचा बँकांच्या वतीने लिलाव करण्यात येईल. यासाठी बोली मागवण्यात आल्या आहेत. १० मेपर्यंत अंतिम बोली लावली जाईल. यानंतर जेटला किती पैसे देता येतील हे बँका जाहीर करतील. या लिलावात जी कंपनी सर्वाधिक बोली लावेल ती कंपनी नंतर जेटसाठी पैसा लावेल आणि मगच उड्डाणे पुन्हा सुरू होऊ शकतील.

आता पर्यायच नाही...
जेट एअरवेजने उड्डाणे रद्द करण्याच्या निर्णयाबाबत म्हटले आहे की, सर्व पर्यायांवर विचार केल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळास हा कठाेर निर्णय घ्यावा लागत आहे. याची माहिती नागरी उड्डयणा संचालनालय, मंत्रालय तसेच अर्थ मंत्रालयासह सर्व विभागांना देण्यात आली आहे. आता एसबीआयसह इतर बँकांनी सुरू केलेल्या बाेली प्रक्रियेची कंपनी वाट पाहत असल्याचे जेटने म्हटले आहे.

X