आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोर का झटका...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रेडिओवरून जाहिरातींचा अतिरेकी मारा करून आणि दर्जा, विश्वास वगैरे गोंडस शब्द वापरून भुलावा निर्माण करणार्‍या नाशिक रोड येथील अतिप्रसिद्ध (?) सराफी पेढीतून मुलीच्या विवाहासाठी बिनघटीचे काही दागिने खरेदी केले होते. दागिन्यांवर आमच्या पेढीचा शिक्का आहे, निश्चिंत राहा, असा सल्लाही देण्यात आला. काही महिन्यांनंतर त्यातील सोन्याची एक माळ खंडित झाल्याने बदलून किंवा भर टाकून नवीन करण्यासाठी त्याच पेढीत गेलो होतो. त्यांनी बिलाची मागणी केली. दुर्दैवाने त्या दागिन्याचे बिल गडबडीत गहाळ झाले होते. म्हणून सेल्समनने सरळ 15 %घट लावून रकमेची आकडेमोड केली. आम्ही मालकांना भेटून घट न लावण्याची विनंती केली, दागिन्यांवरील शिक्का त्यांच्या पेढीचाच असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावरही बिल नसल्यामुळे घट लागेलच अशी रोखठोक भाषा त्यांनीही केली. याआधीही अनेकदा सोने खरेदी त्यांच्याच पेढीतून केली असल्यामुळे आमची मालकांची तोंडओळख होती, ती आठवणही करून दिली. एखादा आवश्यक कागद हरवल्यास सरकारी कार्यालयातही प्रतिज्ञापत्र करून मार्ग काढता येतो, तसा काही पर्याय सुचवला, पण काही उपयोग झाला नाही. दागिना मोठा आणि घटीमुळे होणारे नुकसान जास्त असल्यामुळे त्या पेढीची पायरी परत कधीही न चढण्याचा निश्चय करून घरी परतलो. ग्राहकांचा असाच पैसा वसूल करून या पेढ्या मोठमोठे बॅनर्स लावून जाहिरातींचा भडिमार करतात. दिव्यांचा झगमगाट करून ग्राहकांना खरेदी ही जणुकाही जीवनावश्यक बाब आहे, असे वाटायला लावतात. जितके मोठे तितके खोटे,’असा सारा मामला असतो. एसी शोरूम, मोठ्या प्रमाणात असलेला नोकरवर्ग, हजारो दागिन्यांची डिझाईन्स, असे असले तरी या लोकांमध्ये माणुसकी नावाची चीज मेलेली असते. दागिन्यावर मजूरीही सर्वात जास्त असते. तरीही विश्वास,सचोटी या नावाला आपण भुलतो. मला आलेला हा अनुभव इतरांनाही मार्गदर्शक ठरावा.