आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकागोमध्ये साजरी होणार राजमाता जिजाऊ जयंती, नेव्हलविल्हे शहरात आयोजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा (डावीकडे) मीनाक्षी इंगोले आपल्या मुलीसह. - Divya Marathi
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा (डावीकडे) मीनाक्षी इंगोले आपल्या मुलीसह.

नाशिक : राज्यच नव्हे, तर थेट देशाच्या सीमा पार करून महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ ब्रिगेडने राजमाता जिजाऊंचा विचार थेट शिकागोत पोहोचवला आहे. देगलूरच्या (नांदेड) जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी इंगोले यंदाची जिजाऊ जयंती शिकागोमधील नेव्हलविल्हे या ठिकाणी साजरी करत असून त्यांनी इंग्रजीत जिजाऊ वंदनाही तयार केली आहे. त्याच वेळी राज्यातील ब्रिगेडच्या कार्यकर्त्याही संक्रांतीच्या वाणासाठी सिंदखेडराजा येथून लाखो रुपयांची चरित्रे आणि वैचारिक ग्रंथ खरेदी करीत आहेत.

जिजाऊ ब्रिगेडने ३ जानेवारी ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ते १२ जानेवारी ही राजमाता जिजाऊंची जयंती या कालावधीत 'दश दिन महोत्सव' साजरा केला. महापुरुषांचे विचार महिलांपर्यंत पोहोचावेत, इतिहासातील कर्तबगार महिलांची कामगिरी अधोरेखित व्हावी, समतेची-सक्षमतेची मूल्ये महिलांमध्ये रुजावी या उद्देशाने विविध कार्यक्रम घेतले गेले. ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा मीनाक्षी इंगोले यांनी नांदेडपासून सुरू केलेला जिजाऊ जयंतीचा उत्सव मराठवाड्यात विस्तारला. कर्नाटकातही त्यांनी जिजाऊ जयंती सुरू केली. सध्या त्या शिकागो येथे आपल्या मुलींच्या घरी वास्तव्यास आहेत. त्यांनी तेथेही जिजाऊ जयंतीचे आयोजन केले आहे. त्यासाठी परिसरातील महिलांशी संपर्क साधून नियोजन केले आहे. यासाठी स्वत:च जिजाऊ वंदनेचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.

वैचारिक हळदी-कुंकू हीच जिजाऊंची शिकवण

अनेक जागी हळदी-कुंकवाच्या सोहळ्यात विधवा, परित्यक्तांना वगळले जाते. जिजाऊ ब्रिगेड मात्र विधवा, परित्यक्ता व प्रौढ कुमारिकांना प्राधान्याने हळदी-कुंकवासाठी निमंत्रित करते. गेल्या २ वर्षांपासून हा उपक्रम सुरू करणाऱ्या मालेगावमधील शिल्पा देशमुख म्हणाल्या, 'आम्ही विधवा, परित्यक्त्यांना आधी निमंत्रित करतो. गेल्या वर्षी आमच्या शेजारील एका भगिनी या सोहळ्यासाठी कित्येक वर्षांनी रंगीत साडी नेसल्या. किती लहानसहान गोष्टीतील आनंदही आपण हिरावून घेतला आहे याची या वेळी जाणीव झाली.'

गेल्या वर्षी दिले ३० हजारांच्या पुस्तकांचे वाण

महापुरुषांचे विचार आणि कर्तृत्व समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत उद्देशाने दरवर्षी आम्ही पुस्तकांचे वाण आणि पुस्तकांच्या भेटी देतो. गेल्या वर्षी मी सिंदखेडराजा येथून ३० हजारांच्या पुस्तकांची खरेदी केली. संक्रांतीचे वाण, हळदी-कुंकू समारंभ, शहरात नवीन येणारे अधिकारी, सार्वजनिक कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत आणि अगदी विवाह सोहळ्यातही आम्ही ही पुस्तकेच भेटीच्या रूपाने देत आहोत. - माधुरी भदाणे, अध्यक्ष, नाशिक जिजाऊ ब्रिगेड

बातम्या आणखी आहेत...