• Home
  • National
  • Jinping avoids mentioning Kashmir, saying about Imran Khan's visit

चेन्नई कनेक्ट / जिनपिंगनी काश्मीरचा उल्लेख टाळत इम्रान खानच्या दौऱ्याबद्दल सांगितले

आता पुढील भेट चीनमध्ये, जिनपिंग नेपाळमध्ये दाखल

Oct 13,2019 08:38:00 AM IST

मामल्लापुरम - पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील दुसरी औपचारिक शिखर परिषद शनिवारी झाली. मामल्लापुरममध्ये ६ तास दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेत दहशतवाद व धार्मिक कट्टरवादाविरुद्ध लढा देण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली. चीनने या चर्चेत काश्मीर मुद्दा उपस्थित केला नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले, की जिनपिंग यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या चीन दौऱ्याबद्दल मात्र मोदी यांना सांगितले. काश्मीरबद्दल भारताची भूमिका चीनला चांगली माहीत आहे. गोखले यांच्यानुसार, या भारत दौऱ्यात नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेबद्दल जिनपिंग यांनी समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी तिसऱ्या शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांनी मोदींना निमंत्रण दिले. सुमारे २४ तासांचा भारत दौरा आटोपून जिनपिंग नेपाळला रवाना झाले.

व्यापार: सध्या दिशा निश्चित झाली, वाद मिटवण्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्था असेल

मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यापारातील असंतुलनाचा मुद्दा उपस्थित केला. व्यापार, सेवा व गुंतवणुकीत संतुलन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावर जिनपिंग यांनी ठोस हमी दिली. द्विपक्षीय व्यापार तोटा कमी करणे, व्यापार, गुंतवणूक व सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्था नेमण्याचा निर्णय झाला.

सीमावाद : करारासाठी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी सातत्याने भेटत राहतील

सीमावाद सोडवण्यावर दोन्ही नेते सहमत झाले. यासाठी दोनही बाजूंचे विशेष प्रतिनिधी सातत्याने भेटत राहतील. जिनपिंग यांनी अशा विशेष प्रतिनिधींच्या बैठका सुरू ठेवण्यावर भर दिला. पुढील बैठकीची तारीख लवकरच निश्चित होईल. भारताच्या वतीने या बैठकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल विशेष प्रतिनिधी आहेत.

दहशतवाद: एकत्र लढण्यावर चर्चा, पण पाक प्रायोजित दहशतवादाचा उल्लेख नाही

दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेविरोधात लढू, असे दोन्ही नेत्यांनी म्हटले. जिनपिंग म्हणाले की, समाजाला यापासून सुरक्षित राखण्यासाठी दोघे मिळून काम करू शकतो. परराष्ट्र सचिव विजय गोखलेंनुसार, आयएसच्या धोक्यावर चर्चा झाली. पाक प्रायोजित दहशतवादावर चर्चा झाली नाही.

लष्करी-नागरी संबंध: कैलास मानसरोवर यात्रेकरूंना जास्त सुविधा देण्याचे आश्वासन

जिनपिंग यांनी रणनीतिक संवाद, संपर्क मजबूत करण्यासाठी संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवणे यावर भर दिला. भारत-चीनच्या राजनयिक संबंधांच्या ७० व्या वर्धापनानिमित्त ७० कार्यक्रम होतील. ३५ कार्यक्रम चीनमध्ये, ३५ भारतात होतील. चीन मानसरोवर यात्रेकरूंना जास्त सुविधा देईल.

चेन्नई बैठकीनंतर नवे सहकार्याचे युग सुरू होईल. आम्ही मतभेदांचे वादात रूपांतर होऊ देणार नाही. हे नाते जागतिक शांततेचे प्रतीक आहे.
- नरेंद्र माेदी, पंतप्रधान

भारत-चीन हे अत्यंत महत्त्वाचे शेजारी देश आहेत. भारतात झालेले उत्स्फूर्त स्वागत पाहता चीनबद्दलची आपुलकी आम्ही समजू शकतो.
- शी जिनपिंग, राष्ट्रपती, चीन

X