आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये खेल आपसे, मुझसे, हम सबसे बड़ा है’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन राजकीय विचारवंत सॅम्युअल हंटिंग्टन यांनी The clash of civilization and remaking of the world order ह्या पुस्तकात काही गृहितके मांडली. त्यानुसार येणाऱ्या काळात होणारे युद्ध आणि संघर्ष हे फक्त धर्मकेंद्रित असतील. लोकांची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख ही संघर्षाचे प्रमुख कारण असेल. हे युद्ध दोन देशात नाही, तर दोन संस्कृतींत, दोन सभ्यतांत (Civilizations) असेल. या थिअरीवरून जगभर उलटसुलट चर्चा, वादविवाद झाले. हंटिंग्टन यांची गृहितकं काही प्रमाणात का होईना चुकीची ठरत असल्याचे पाहून बेगडी समाधान वाटायचं. "सेक्रेड गेम्स २'मध्ये गायतोंडे आणि इतर अनुयायांना त्यांचे गुरुजी (पंकज त्रिपाठी) सांगतात की, "७० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये चाललेलं भांडण हे केवळ दोन देशांचं नाही, तर दोन "सिव्हिलायझेशन'चं युद्ध आहे.' एका झटक्यात कलयुग नष्ट करून सतयुग आणण्याची मिथ्या स्वप्ने दाखवणे, सात्त्विक लोक गोळा करून बलिदान देण्याची भाषा करणारे गुरुजी, आपले नेते यांच्यात तसं बघितलं तर फारसा फरक नाही. "तमस ही तमस को ख़त्म करेगा. ग्लोबल वॉर्मिंगपासून इंटरनेट, धार्मिक प्रोपोगंडा सगळं काही जग संपवण्याच्या मार्गावर आहे. हजारो फटाक्यांच्या लडी पसरलेल्या आहेत. फक्त काडी लावण्याचा उशीर. एक ट्रिगर दाबला की नवीन जग तयार... सतयुग.' भ्रामक जगाची ही स्वप्ने गुरुजी त्याच्या अनुयायांना अक्षरशः अफूच्या गोळीसह विकतात. फोफावत चाललेल्या मुजोर आक्रमक वृत्ती आणि अतिरेकी संस्कृतीची वाढ आर्थिक-राजकीय यंत्रणेच्या पाठबळाशिवाय होऊच शकत नाही.  गायतोंडे-परुळकर-भोसले फक्त ती पूर्ण करण्यासाठीचे निमित्त... त्यात तुम्ही आम्ही सगळेच विचित्र पद्धतीने गुंतलेलो आहोत. धार्मिक पुनरुज्जीवनवाद डोके वर काढत असताना "सेक्रेड गेम्स'ने तीच क्लिष्ट गुंतागुंत आपल्यासमोर मांडली आहे. हादरवून सोडणारा तो आरसा जितका बीभत्स आहे, तितकाच गरजेचा. कुठलीही आयती उत्तरे न देता डोक्यात किडा वळवळत सोडणारा "सेक्रेड गेम्स' हा "धर्म' या शब्दाच्या अजून मुळापर्यंत जाण्याची निकड प्रत्येकासमोर ठेवतो. तिथून पुढे तुम्ही आत शिरावं की नाही हे आपल्या जबाबदारीवर. कारण "सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं' किंवा "Truth prevails' यांसारख्या गुडीगुडी वाक्यांवर स्वतःला नेऊन थांबवायचं हे आधीच ठरलेलं असेल तर "सेक्रेड गेम्स'ला केवळ थरारपट म्हणून सोडून देणे उचित ठरेल. एकदा का तुम्ही "गणेश गायतोंडे' ते "गुरुजी' यांच्या धर्म संकल्पनेचा पृष्ठभाग खरवडून बघायला सुरुवात केली की तो तुम्हाला फरपटत घेऊन जाईल तिथपर्यंत जाण्याची तयारी हवी. समोर दिसेल ते स्वीकारायची तयारी. जी तयारी मालिकेत सरताज सिंगने ठेवली अगदी तशीच.  "अपुन आज़ाद हो गया है, अपने को नया धर्म मांगता है' असं म्हणणाऱ्या गायतोंडेला नवा धर्म तर मिळाला, पण त्याला, सरताज सिंगला आणि प्रेक्षकांना तो धर्म कुठवर नेऊन सोडतो याची कहाणी म्हणजे "सेक्रेड गेम्स' मालिकेचं दुसरं पर्व. पहिल्या सिझनमध्ये केवळ आजची मुंबई कशी घडली याची कहाणी असेल असं वाटणारी ही सिरीज या वेळी अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून नजीक येऊन ठेपलेल्या काल्पनिक (?) विनाशवेळेचा परस्परसंबंध यांचा पट मांडतो. त्याला फिक्शन म्हणावे की धोक्याची घंटा हे ज्याने- त्याने ठरवावे. फक्त घडून गेलेल्या घटना, त्यांच्या तारखा, नोंदी याचं दस्तऐवजीकरण नाही, तर एखाद्या व्यक्तीची, समूहाची, मानवी समाजाची नियती कशी बदलत गेली, राजकीय-धार्मिक मन्वंतरे त्याच्या व्यक्तिमत्त्वात नकळत शिरकाव कसे करत गेले याचं चित्रण हादेखील एक इतिहास असतो. त्या अर्थाने सेक्रेड गेम्स माझ्यासाठी आजच्या भारताचा विस्तृत पट आहे, जो समकालीन घटना मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक दोन्ही भिंगे लावून आळीपाळीने दाखवत असतो. आपलं व्यक्तिमत्त्व असल्या सिरीजच्या नावाने Sadist किंवा negativist (नकारवादी) होत चाललंय हा विचारदेखील मनात येतो. पण मग डोळे मिटणारी मांजर व्हायचं नाकारतो तेव्हा लक्षात येतं की माझ्या आजूबाजूला अनेक जण फोर्ज केलेला आशावाद माझ्यावर चिकटवू बघत आहे... जबरदस्तीने...!  ७०-८० च्या दशकात भारतात आणि जगभरात पाय पसरत गेलेला एका विवादित गुरू आणि "सेक्रेड गेम्स'मध्ये पंकज त्रिपाठी ने साकारलेल्या "गुरू'च्या भूमिकेत बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. कलयुग घालवून सतयुग कसे आणायचे याबद्दल त्यांच्याकडे एक "प्रोजेक्ट' आहे. स्वतःच्या पंथासाठी लिहिलेला धर्मग्रंथ(कालग्रंथ) आहे. धर्माची नशा पुरेशी नाही की काय म्हणून प्रत्यक्ष ड्रग्जपासून सेक्सपर्यंत वेगवेगळ्या नशा आणि त्यांचे मिथ्या समर्थन करणे गुरुजींना आपल्या संमोहक वाणीने उत्तम जमते. कार्ल मार्क्सचं "धर्म ही अफूची गोळी आहे' हे वाक्य वेळोवेळी अभ्यासकांनी नको त्यासंदर्भात वापरून एवढं मिळमिळीत करून टाकलं आहे की सोपी उत्तरे हवं असणाऱ्यांनी मार्क्सवादालाही परमेश्वर करून टाकलं आहे. "क्रिटिक ऑफ हेगेल्स फिलॉसॉफी ऑफ राइट' पुस्तकात मार्क्स लिहितात - "The abolition of religion as the illusory happiness of the people is required for their real happiness. The demand to give up the illusion about its condition is the demand to give up a condition which needs illusions.' सुखाचा केवळ मायावी भ्रम निर्माण करणारा धर्म नाहीसा करण्याची मागणी म्हणजे लोकांच्या खऱ्या सुखाची मागणी करणे होय. ज्या परिस्थितीमुळे अशा भ्रामक सुखाची गरज भासते, ती परिस्थिती नाहीशी करण्याची मागणी. गुरुजींनी गायतोंडेला दिलेला धर्म हा असाच भ्रामक कल्पना कुरवाळणारा होता. मालिकेत तो धर्म खासगी बाब न राहता संपूर्ण मानवजातीला गिळंकृत करू पाहतो.  दोन वेगवेगळ्या टाइमलाइनमध्ये चालणाऱ्या सेक्रेड गेम्समध्ये एकीकडे गायतोंडे हा धर्म आणि त्याच्या नावाखाली दिली जाणारी अफूची गोळी (गोची)च्या आहारी गेला आहे, तर दुसरीकडे सरताजसिंग मुंबईला वाचवताना प्रामाणिक राहूनसुद्धा एका भुलवून टाकणाऱ्या गर्तेत अडकला आहे. गायतोंडेने स्वतःला अमर अश्वत्थामा समजण्याच्या नादात एका मोठ्या खेळाचा छोटासा तुकडा झाल्याने अविरत तडफड मागे लावून घेतली आहे. त्याच्यावर नकळत बिंबवले गेलेल्या धार्मिक संस्कृतीचा पाईक झाल्याने तो धर्मप्रसार आणि त्यापाठोपाठ बळी घेत सुटलाय. सांप्रदायिक आणि राजकीय उलथापालथ एकीकडे होतेय तर दुसऱ्या टाइमलाइनमध्ये चांगल्या आणि वाईटचे डायनॅमिक्स बदलत चालल्याने दोन वृत्तींमध्ये द्विभक्तीकरण करता येऊ नये इतकं सगळं हाताबाहेर चाललयं. नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होत चाललेली पात्रं, नव्या देवतांनी जुन्या देवतांची घेतलेली जागा, राजकीय नेते, गँगस्टर, धार्मिक गुरूंचे तयार होऊ पाहणारे पंथ, दुर्लक्षित राहण्याच्या भीतीने येणारी असुरक्षिततेची भावना ह्या सगळ्यांचं बेमालूम मिश्रण सिरीजमध्ये ठासून भरलय. अनुराग कश्यप - नीरज घ्यावन आणि लेखक वरुण ग्रोव्हर यांनी सेक्रेड गेम्ससाठी वेगळं प्रतिमाशास्त्र(Iconography) विकसित केल्याने तुम्हाला ते बिंदू जोडून बघावे लागतात. ते जोडल्यावर दिसतात दहशतवादाची अनेक रूपे. वैयक्तिक पातळीवरील दहशतवादापासून भांडवलीशाहीने, वंशवादाने, वसाहतवादाने येणारा दहशतवादापर्यंत. त्या सगळ्यांच्या मुळाशी असते सत्तेची अमर्याद लालसा किंवा व्यक्ती, समाज, देश यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना. मालिकेत दाखवलेला आण्विक दहशतवाद हे त्याचच पुढचं विद्रूप.  "सेक्रेड गेम्स २'मध्ये एक महत्त्वाचा प्रसंग आहे. क्रिकेट खेळताना साद नावाचा मुस्लिम मुलगा चांगली बॉलिंग करून बॅट्समनला आऊट करतो म्हणून पुढे काही किरकोळ भांडणं झालेली असतात. त्या मुलाला नंतर काही दिवसांनी ठरवून जमावाद्वारे बॅटने ठेचून मारलं जातं. उन्मादाने टाळ्या पिटणारा कॉन्स्टेबल काटेकरचा १०-१२ वर्षांचा मुलगा यात पुढे असतो. तडफडत जीव घेणारा "सिक्सर' कसा असतो हे बघायचं असतं तेव्हा जखमी अवस्थेत लोळत पडलेल्या सादच्या तोंडात तो क्रिकेटचा बॉल सारतो. तिकडे तरुण राजकीय नेता त्या बॉलवर सिक्सर मारावा इतक्या ताकतीने बॅट मारतो आणि खेळ खल्लास... बाकी मुलांनी जबरदस्ती धरून ठेवलेला सरताज सिंग त्या छोट्या मुलाला टाळ्या पिटताना असहायपणे पाहत राहतो. असंच जर असेल तर हे बीभत्स जग वाचवण्यालायक आहे का, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. दुसऱ्या टाइमलाइनमध्ये गुरुजींकडून तर पहिल्या टाइमलाइनमध्ये अशा घटनांतून "जग उद्या संपणार आहे ते आज का संपेना, हे जग वाचवण्यालायक आहे का?' अशी अराजकता निर्माण झालेली असताना देखील आहे ती परिस्थिती मान्य करून लढत राहणे, हा मला माझा धर्म वाटतो.  धर्म आणि रिलिजनमध्ये एक मूलभूत फरक आहे. भारतीय समाजात धर्म हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. धर्म हा शब्द जीवनशैलीशी निगडित, कर्माशी निगडित आहे. रिलीजन शब्दाला परमेश्वराचे अधिष्ठान असते. माझ्या धर्मात विवेकवादामध्ये श्रद्धेला स्थान नाही. असेल तर फक्त हा विश्वास की परिस्थिती बदलली जाऊ शकते. सेक्रेड गेम्समध्ये त्या मुलाचे मॉब लिंचिंग आणि पहलू खानची हत्या, गाडीला बांधून सार्वजनिकरीत्या सोलून काढलेल्या पाठी यात तसा अजिबात फरक नाही. सरताज सिंगला जबरदस्ती पायाखाली दाबून ठेवलं गेलं. सिनेमाद्वारे काही बोलू पाहणाऱ्या अनुराग कश्यपच्या मुलीला, बायकोला ट्विटरवर शिव्या देत गप्प बसायला भाग पाडलं. त्या अर्थाने १५ ऑगस्टला "सेक्रेड गेम्स २' नेटफ्लिक्स प्रदर्शित होणे याला विशेष  महत्व आहे.  आपल्याला आपली मूलभूत तत्त्वे, मूल्ये न गमावता, सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून अतिरेकी वृत्तीवर ताबा मिळवता येऊ शकतो? गायतोंडेसारखेच आपल्यालाही कधी नवीन धर्माची गरज पडेल तेव्हा आपली धर्मविषयक भूमिका काय असेल? साऱ्या प्रश्नांची उत्तर असलेल्या कालग्रंथात आपण ते शोधणार की आपल्या जीवनशैलीशी, वागणुकीशी निगडित असेल की नाही हे तपासून बघणार? गायतोंडे म्हणतो की "ये खेल इन सबसे, आपसे, मुझसे बड़ा है.' मला ह्या प्रश्नांची उत्तरं देणं तुमच्या आमच्या धार्मिक-राजकीय विचाराहून मोठं वाटतं.  लेखकाचा संपर्क - ९६८९९४०११८