आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जो जीता वही सिकंदर’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जितेंद्र घाटगे

आमिर खान ५५ वर्षांचा झालाय... त्याच्या चित्रपटांची संख्या बघितली तर अजून पन्नासचा आकडादेखील त्याने पार केलेला नाहीये. ‘राख’ पासून ‘दंगल’ पर्यंत अनेक क्लिष्ट व्यक्तिरेखा आणि त्याव्यतिरिक्त एक संवेदनशील माणूस म्हणून त्याची जडणघडण इतकी अफाट आहे की त्यातले सगळे पदर उलगडून दाखवले तरी शब्दात व्यक्त न करता येण्यासारखं अतुलनीय असं मागे राहील. ते जे मागे राहणार आहे त्याचंच नाव ‘मोहंमद आमिर हुसेन खान.’ 
गेल्या आठवड्यात जपानमधल्या ओसाका शहरातलं एक सिनेमागृह बंद पडलं. शेवटचा श्वास घेणाऱ्या या सिनेमागृहात शेवटचा शो दाखवण्यात आला तो होता आमिर खानच्या ‘३ इडियट्स’ चा. विशेष म्हणजे हा शो हाऊसफुल असल्याचं थिएटर व्यवस्थापनाने ट्विटरद्वारे कळवलं! ‘३ इडियट्स’ चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्याच्या लोकप्रियतेने भारतीय जनमानसात मिळवलेले अढळ स्थान निर्विवाद आहे. खरं तर चित्रपटाने मिळवलेले व्यावसायिक यश हे त्याच्या गुणवत्तेचे निकष असू शकत नाही. परंतु भारतीय उपखंडाच्या सीमा पार करून जपानच्या प्रेक्षकाला एखादा सिनेमा आपल्या मातीतली कहाणी वाटतो तेव्हा दोन्ही देशांतील सामाजिक-सांस्कृतिक विविधतेची बंधनं झुगारत नाळ जोडू बघणाऱ्या कलाकाराचा वेध घेणं अपरिहार्य ठरतं. आमिर खान ५५ वर्षांचा झालाय... त्याच्या चित्रपटांची संख्या बघितली तर अजून ५० चा आकडादेखील पार केलेला नाहीये. हा लेख लिहिताना त्यातले किमान ३० चित्रपट आणि आमिरने साकारलेल्या व्यक्तिरेखा त्यातल्या गुणदोषांसह डोळ्यासमोरून जात आहेत. त्याच्या सिनेमाने कमवलेल्या कोट्यवधींच्या आकड्यांना केवळ बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणून बघता येत नाही. प्रादेशिक अभिमान सोडून चीन, जपानसह भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रेक्षकांनी साजरा केलेला तो एक सोहळा असतो. त्याने वठवलेल्या भूमिकांचं विश्लेषण करणं हा ह्या लेखाचा हेतू नव्हे. किंवा त्याला मिळालेल्या अमाप लोकप्रियतेला डिकोड करणं हेदेखील तर्क-वितर्काच्या पलीकडे आहे. ‘राख’ पासून ‘दंगल’ पर्यंत अनेक क्लिष्ट व्यक्तिरेखा आणि त्याव्यतिरिक्त एक संवेदनशील माणूस म्हणून त्याची जडणघडण इतकी अफाट आहे की त्यातले सगळे पदर उलगडून दाखवले तरी शब्दात व्यक्त न करता येण्यासारखं अतुलनीय असं मागे राहील. ते जे मागे राहणार आहे त्याचंच नाव ‘मोहंमद आमिर हुसेन खान.’ 
  

Fakingnews.com नावाची अफलातून वेबसाइट खोट्या बातम्या उपरोधिकपणे दाखवते. गेल्या महिन्यात दिल्लीत चालू असलेल्या हिंसेच्या घटनांवर व्यक्तिपूजक प्रेक्षकांच्या व्यंगावर बोट ठेवणारी नेमकी बातमी दाखवली गेली. ती बातमी अशी होती, ‘दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सलमान खानचा सिनेमा त्वरित प्रदर्शित करण्याचे आदेश दिले.’ मजेशीरपणे केलेल्या या विधानात सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांच्या सुपरस्टारप्रति असलेल्या आकर्षणाचा लसावि आहे. मागच्या फळीतले जे मोजके अभिनेते आपलं सुपरस्टारपद अजून टिकवून आहेत, त्यात आमिर खानचं स्थान ‘क्वालिटी’ या संज्ञेसोबत जोडलं गेलं आहे. जर सलमान ‘बॉक्स ऑफिस’चा खान असेल आणि शाहरुख ‘समृद्धीचा’, तर आमिर हा नि:संशय ‘गुणवत्तेचा’ खान आहे. सगळ्या जाती-धर्माचे लोक हा विश्वासार्ह गुणवत्तेचा सोहळा अनुभवण्यासाठी एकाच छताखाली जमतात. त्यामुळे इतरत्र हिंसाचाराच्या घटना घडत असतानादेखील सगळ्या पंथांचा एकाच वेळी श्वास रोखून ठेवणं अन् हृदयाला हात घालण्याचं काम आमिरचा सिनेमा करू शकला असता का? माझं ठाम मत आहे की ‘हो’! आणि हे सगळं केलं जातं ते मनोरंजनाच्या चौकटीत हे उल्लेखनीय! ती चौकट दर सिनेमागणिक कशी रुंदावली गेली हे प्रेक्षक म्हणून बघणं हा अफाट अनुभव आहे. अभिनयात, सिनेमाच्या निवडीत वयाच्या किंबहुना प्रगल्भतेच्या एका टप्प्यानंतर जेव्हा तो जाणीवपूर्वक वेगळी वाट धुंडाळू लागला, तेव्हा त्याचा चाहतावर्गही कैकपटीने वाढला. या सगळ्यामागची कारणं शोधताना आणि आजवरच्या त्याच्या यशाचं महत्त्व जाणून घेताना त्याने ज्या वेळी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, ती तत्कालीन परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

"ऐंशी'चं दशक व्यावसायिक हिंदी सिनेमासाठी अत्यंत सुमार म्हणून ओळखलं जातं. त्यात तथ्य आहेसुद्धा. पण त्या दशकात घडलेल्या घडामोडींचं अपत्य म्हणून मी आजच्या सिनेमाकडे आणि त्यातील तरुणाईला बघतो. एका भारतात अनेक देश एकाच वेळी नांदत असतात याची साक्ष देणाऱ्या त्या घटना होत्या. भारतातील वर्गभेद अजून ठळक करणाऱ्या. इंदिरा गांधींच्या व्यावसायिकाभिमुख धोरणं राबवली जात होती. देशाची अर्थव्यवस्था ढवळून निघण्याची ती सुरुवात होती. राजीव गांधींचे आगमन हे दूरसंचार दुनियेत नांदी ठरू पाहत होते. STD/ISD बूथ दिसायला सुरुवात झाली होती अन् मध्यमवर्गीयांना त्यांच्या उंचीपासून वर उठायला प्रवृत्त करणारं एक नवं प्रॉडक्ट बाजारात आलं होतं. मारुती ८००. उच्चवर्गीयांसाठी परवडणाऱ्या कलर टीव्हीचं आगमन झालं होतं. आखाती देशात जाऊन पैसे कमावणाऱ्या कामगारांची संख्या वाढत होती. टीव्ही, फ्रकज, टेलिफोन, कार हे घेण्याइतका धनाढ्य वर्ग होऊ पाहत होता. टीव्हीने भारतीयांना एकत्र बसवून पाहायला लावलं अन् आपण 'एक' आहोत असा भास निर्माण केला होता. अंतराळात पहिलं पाऊल ठेवणाऱ्या राकेश शर्माला इंदिरा गांधींनी विचारलं की, 'अंतरिक्षातून आपला देश कसा दिसतो?' त्यावर त्याने दिलेलं उत्तरं अख्ख्या भारतीयांनी(टीव्ही समोर बसलेल्या!!) ऐकलं - ‘सारे जहाँ से अच्छा'. राजीव गांधी सरकारचं ‘मेरा भारत महान' हे घोषवाक्य जोर धरू पाहत होतं.  याउलट ग्रासरूट लेव्हलला परिस्थिती फार वेगळ्या टोकाची होती. ‘ऑल आसाम स्टुडंट्स असोसिएशन (AASU)' ने बांगलादेशहून आसाममध्ये स्थलांतरित झालेल्या विरोधात उभी केलेली चळवळ पेटलेली होती. त्यात २२०० पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांचे आसाममध्ये हत्याकांड झाले (१९८३). पंजाबमध्ये भिंद्रनवाले आणि काही जहाल संघटना स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत होते. ऑपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधींची हत्या आणि त्यानंतर झालेले शीख हत्याकांड ज्यात २००० पेक्षा अधिक जण मारले गेले, हरचंदसिंग लोंगोवालची हत्या, त्यानंतर तब्बल एक दशक धुमसत राहिलेलं पंजाब, भोपाळ गॅस दुर्घटना ज्यात १६,०००  लोक मृत्युमुखी आणि लाखो कुटुंबं होरपळून निघाली, महाराष्ट्रात गिरणी कामगारांचा संप, त्यात कायमचं घरी बसावं लागल्याने हजारो कुटुंबांची दैना, दक्षिणेकडे LTTE चा स्वतंत्र तामिळ राज्यासाठी लढा, त्यात भारतीय सैन्याच्या हजारो जवानांचं शहीद होणं आणि सरतेशेवटी बोफोर्स प्रकरणात काँग्रेस सरकारची भ्रष्टाचाराच्या आरोपात झालेली फरफट ज्यात महानायक अमिताभ बच्चन यांचेसुद्धा नाव अडकलेले होते. अमिताभ नावाची जादू दरम्यान ओसरू लागली होती. 

एवढ्या सगळ्या टोकाच्या घडामोडी भोवताली घडत असताना तत्कालीन कलाकृती त्यातून सुटणार तरी कशा! बॉलीवूड मात्र ‘वास्तविकतेला सामोरा जाणारा कलात्मक सिनेमा’ आणि ‘स्वप्नरंजन घडवून आणणारा व्यावसायिक सिनेमा’ यात विभागून राहिले. सिनेमातील आशयसूत्रे आणि नायकाची बौद्धिक, सैद्धांतिक मांडणी बदलू लागली होती पण तीदेखील अशाच दुभंगलेल्या अवस्थेत. केतन मेहता दिग्दर्शित ‘होली’(१९८४) मध्ये आमिर खानने केलेलं काम हे पहिल्या प्रकारातलं होतं. आमिरच्या पहिल्यावाहिल्या व्यावसायिक पदार्पणाला मात्र १९८८ साल उजाडावं लागलं. 
‘क़यामत से क़यामत तक’ प्रदर्शित झाला तोवर सलमान अणि शाहरुख़ यांचे बॉलीवूडमध्ये मुख्य भूमिकेत आगमन झाले नव्हते. सनी देओल, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ ह्या रांगड्या नायकांच्या अगदी उलट असलेल्या निरागस चेहऱ्याच्या आमिरला कुंपणाअलीकडच्या प्रेक्षकांनी उचलून धरले. ‘The boy next door’ अन् ‘चॉकलेट बॉय’ हे बिरूद जणू आमिरच्या पदार्पणासाठी राखून ठेवले असावे! सिनेमाचे शूटिंग संपल्यावर रात्री आमिर अन् त्याचा मित्र रिक्षाच्या मागे पोस्टर चिकटवून यायचे. कुठलाही फोटो नसलेल्या त्या पोस्टरवर लिहिलेलं असायचं ते असं – ‘Who is Aamir Khan? Ask the girl next door!’. सोशल मीडिया जन्माला येण्याआधी मुंबईकरांमध्ये त्या पोस्टरने बऱ्यापैकी उत्सुकता निर्माण झाली अन् त्याचा थेट फायदा सिनेमाला झाला. तेव्हापासून आजतागायत आमिर वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून त्याचा सिनेमा सर्वदूर प्रेक्षकांपर्यंत पोचवतोय. पण फक्त मार्केटिंग जीनियस असल्याने त्याचं स्थान निर्विवाद सर्वोच्च आहे का? अर्थातच नाही. मार्केटिंगचे प्रयोग लौकिकार्थाने दरवेळी यशस्वीच ठरले असं नाही, पण आमिरचे त्याच्या कामाप्रति वृत्तीगांभीर्य कधी ढळले नाही. 

अभिनेता कितीही महान असला तरी प्रत्येकाच्या अभिनयक्षमतेचा एक मर्यादित परीघ असतो. कुणाचं वर्तुळ मोठं तर कुणाचं छोटं एवढाच काय तो फरक. अमिताभ बच्चनसारख्या कलाकाराचं वर्तुळ एवढं मोठं असत की वाट्टेल तिकडे पाय टाकून प्रेक्षकांना आयुष्यभर अचंबित करत राहतात. आमिर खान मात्र हे गृहीतक दरवेळेस मोडीत काढत अचंबित करतो. चक्रीवादळ आल्यावर हवेत एक भोवरा तयार होतो. त्या आलेखात खाली आतवर गुंतलेला भाग घुमत वर येऊन वातावरण ढवळून टाकतो. जेवढी जास्त घुसळण होते तेवढा आधी छोटासा वाटणारा परीघ वर जाताना रुंदावत राहतो. स्वतःला सिद्ध करण्याची आक्रमक धडपड त्याच्या प्रत्येक सिनेमात दिसते. अफाट वाचन, सामाजिक भान अन पटकथेची उत्तम जाण असल्याने नैसर्गिक न वाटू शकणारी भूमिका मेथड अक्टिंगने अंगभूत केली की त्या पात्राच्या देहबोलीसह तो लीलया वावरतो. शब्द-शब्दोच्चार यावर आमिरने केलेले काम ठळकपणे जाणवून येते. "९०' मध्ये एका लयीत पटापट संवादफेक करणारा आमिर’ आणि ‘लगान मध्ये दोन्ही पायांवर वजनाचा जोर देऊन ठाम नजरेने ‘शरत मंज़ूर है’ म्हणणाऱ्या आमिर’मध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे तो प्रतिभावंत आहे की नाही यात समीक्षकांमध्ये दुमत असले तरी त्याच्या विचारात स्पष्टता आहे, जी अनेक प्रतिभावान लोकांकडे नसते. शारीरिक आणि अभिनयाच्या मर्यादांना ही स्पष्टता पुरून उरते. ‘Man of focus, commitment & sheer will’ हा ‘जॉन विक’ सिनेमातील नायकाचा गुण प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या अभिनेत्यामध्ये बघायला मिळणार असेल तर आमिर खान हून ठळक उदाहरण बॉलीवूडमध्ये सापडणार नाही. सिनेमाची निवड करताना, ‘जो मुझे अच्छा लगता है, मेरे मन को छू जाता है’ हा निकष त्याने स्वतःपुरता लावून घेतला आहे. आमिरचा दुसरा सगळ्यात दुर्मिळ गुण म्हणजे सिनेमा एखाद्या लेखकाने भूमिका समोर लिहून दिली तर त्यामुळाबरहुकुम कामाला सुरुवात न करता त्या कलाकृतीच्या निर्मितिप्रक्रियेत सहभागी राहून त्यातील बारकावे समजून घेणे आणि ‘परफेक्शन’कडे नेत सुधारणा करत राहणे. अतुल कुलकर्णी म्हणतात की, “आमिरच्या अभिनयाची पद्धत ही खूप साऱ्या तयारीवर अवलंबून आहे. आपल्या भूमिकेसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या हळूहळू जमा करण्यावर त्याचा भर असतो. एखाद्या दृश्याबद्दल त्याच्या डोक्यात असलेल्या कल्पनांबद्दल दिग्दर्शक, सहकलाकारांबरोबर चर्चा करणे त्याला महत्वाचे वाटते.” आमीरच्या ह्या वेगळ्या सवयीमुळे त्याचे अनेक आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत ९० च्या दशकात खटके उडाले आहे. नव्या शतकात आलेल्या त्याच्या सर्व सिनेमात आमीरने ‘catalyst’ चं काम केलं आहे, उत्प्रेरक बनून संपूर्ण निर्मितीप्रक्रियेत त्याचा सक्रीय सहभाग असल्याने फिल्म एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. त्यामुळे आमिरचा सिनेमा हा फक्त त्याने अभिनयापुरता मर्यादित न राहता त्याच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची छाप त्या कलाकृतीवर पडलेली असते.

२००१ पासून आमिरने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं तपशीलवार विश्लेषण केले तरी अभिनयाच्या साऱ्या भोज्यांना शिवूनसुद्धा तो दशांगुळे उरणार आहे. त्यामुळे आमिरने अजरामर केलेल्या भूमिकांची यादी इथे देणं गैरलागू आहे. माझं असं मत आहे नव्या दशकात आमिरला कलेचे प्रयोजन नव्याने कळले. ‘आयुष्य सुंदर आहे, जीवन अगाध आहे वगैरे...’ – आणि - ‘पूर्णतः वास्तववादी चित्रण दाखवून Nihilistic वृत्ती’ – ह्या दोन्ही टोकांना टाळून सुवर्णमध्य त्याने साधला आहे. ‘समांतर’ सिनेमापेक्षा ही वाट पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्या सिनेमात रूढार्थाने आशावाद नसला तरी भविष्यकाळाविषयी आणि माणसाविषयी आत्मीयता आहे. हे प्रयोजन घेऊन तो सिनेमे बनवतो असेही म्हणता येणार नाही. त्याने केलेलं काम कलाकृतीच्या पातळीवर पोचलं की अपोआप वैश्विक होतं. गेल्या २० वर्षात त्याने वठवलेल्या भूमिका परस्परविरोधी होत्या. लगान, मंगल पांडे, रंग दे बसंती, तारे ज़मीन पर, ३ इडियटस, पीके, दंगल यातलं वैविध्य चकित करणारं आहे. ‘पिपली लाइव्ह’, ‘धोबी घाट’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ यातून माणसाविषयीचा ‘कन्सर्न’ अधोरेखित होतो. दर सिनेमागणिक आमिर जेवढा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललाय, तितकेच प्रेक्षक म्हणून आपणसुद्धा समृद्ध होतोय. त्याने रुंदावलेल्या कक्षा फक्त बॉलीवूडपुरत्या मर्यादित राहत नाहीत, म्हणूनच तर त्याचे सिनेमे चीनमध्ये अमर्याद प्रेमाचे धनी होतात.    

व्यक्तिपूजा हा स्थायीभाव असलेल्या भारतीय प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाचा परतावा करणे कुठल्याही कलाकारासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. तो तसा केलाही जाऊ शकत नाही हे मान्य करून अनेक सुपरस्टार जनतेच्या ऋणात राहणे पसंत करतात. प्रेक्षकांनी आपल्यावर ओवाळून टाकलेल्या प्रेमाची, आपल्या ‘सेलिब्रिटी’ स्टेटसचा योग्य वापर करून कुवतीनुसार परतफेड केली जाऊ शकते यावर ज्यांचा विश्वास आहे अशा मोजक्या सुपरस्टारपैकी ‘आमिर खान’ आहे. जिथे बाकी सुपरस्टार गेम शोमध्ये अमाप पैसे कमवत होते तिथे आमिर गेमचेंजर होऊन टेलिव्हिज सेटला चिकटलेली ‘इडियट बॉक्स’ ही संज्ञा पुसून काढत होता. आमिर खान निर्मित ‘सत्यमेव जयते’ सामाजिक विषयाला वाहिलेला केवळ एक ‘टॉक शो’ नसून चळवळ होती, जी १३ आठवड्यांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली. समाजातील ज्या समस्यांकडे एरवी डोळेझाक केली जात होती तिथे आमिरने त्याची जबाबदारी स्वीकारायला लावून त्यांच्याविरोधात ठाम उभे राहायला भाग पाडले. ‘सत्यमेव जयते’ च्या होर्डिंगवर लिहिलेली टॅगलाइन अशी होती – ‘जब दिल पे लगेगी तो बात बनेगी’. सिनेमाच्या निवडीपासून -  ते - अभिनेत्यापेक्षा एक माणूस म्हणून ओळख तयार करण्यासाठी प्रयत्नशील असलेली प्रतिमा ह्या टॅगलाइनमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. 

रंग दे बसंती सिनेमात एक संवाद आहे, ‘कोई भी देश परफेक्ट नही होता, हमे उसे बनाना पड़ता है’. मीडियाने दिलेलं ‘मि. परफेक्शनिस्ट’ हे बिरूद मिरविण्यापेक्षा अभिनेता आणि माणूस म्हणून स्वतःला तर आहे त्यापेक्षा उन्नत देश करण्याचा संकल्प त्याच्या कृतीतून दिसून येतो. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेल्या आमिरने स्थापन केलेलं ‘पाणी फौंडेशन’ आणि त्यांची रूट लेव्हलला असलेली कामं बघताना लक्षात येते की आमिर खान हा भारतातील एकमेव सक्रियवादी सुपरस्टार आहे. ‘मौलाना अबुल कलाम आझाद यांचा पणतू असल्याचा तो कुठेही गवगवा करत नाही. ‘जिंदगी जीने के दो तरीके होते है... एक जो हो रह है होने दो, बर्दाश्त करते जाओ.. या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की!’ आमिरने दुसरा मार्ग निवडला आहे. ‘सत्यमेव जयते’ गाण्याच्या ओळी त्याने प्रत्यक्ष आयुष्यात अंगीकारल्या आहेत 
‘जैसा भी हूँ अपना मुझे

मुझे ये नहीं हैं बोलना

काबिल तेरे मैं बन सकू

मुझे द्वार ऐसा खोलना

मुझे खुद को भी है टटोलना

कहीं है कमी तो है बोलना

कहीं दाग हैं तो छुपायें क्यों

हम सच से नज़रें हटायें क्यों’आमिर खानमध्ये झालेला आमूलाग्र बदल हा अचानक झालेला नसला तरी त्याची सुरुवात २००६ च्या सुमारास झाली असावी. आमिर खान रसिक वाचक आहे अन् उत्तमोत्तम पुस्तकांचा भोक्ता. दिल्लीमध्ये किरण नगरकर यांच्या ‘गॉडस लिटल सोल्जर’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातून परतताना कॅनॉट प्लेसजवळ ट्राफिकमध्ये अडकला. त्या दिवशी रस्त्याच्या एका बाजूला नर्मदा बचाव आंदोलनात पुनर्वसनासाठी ठिय्या मांडून बसले  होते, तर दुसरीकडे भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडित सहायता निधीसाठी निदर्शने करत होते. आमिरने दोन्ही आंदोलनांचं महत्त्व समजून घेतलं अन् त्या समूहासोबत जंतर-मंतरच्या मैदानात जाऊन बसला. त्याच्या अशा कृतीमुळे ‘फना’ सिनेमाला भोगावे लागलेले परिणाम सर्वश्रुत आहेत. नर्मदा बचाव आंदोलन असो की लोकपाल बिलच्या समर्थनात अण्णा हजारेंसोबत उभं राहणं, आमिरने वेळोवेळी घेतलेल्या ठाम भूमिका एखाद्या अभिनेत्याची सामाजिक घुसळण करण्याची क्षमता दाखवून देतात. आज अामिर खानच्या ‘सत्यमेव जयते’चा प्रभाव इतका जोरदार आहे की, बाल लैगिक शोषण सुरक्षा संबंधी बिल लोकसभेत मंजूर होण्यासाठी त्याचा एका एपिसोडचा सिंहाचा वाटा आहे. स्त्री-भ्रूण हत्येचा मुद्दा पहिल्याच एपिसोडमध्ये उचलल्यानंतर जयपूरमधल्या ६ सोनोग्राफी सेंटर त्वरित बंद करण्यात आले. जेनेरिक औषधं असो की ऑनर किलिंगच्या घटना, ‘सत्यमेव जयते’ ने झालेल्या बदलांचे डॉक्युमेंटेशन कदाचित पूर्णपणे कधीच शक्य नाही. कोणत्याही विचारसरणीचे प्रयोजन समाजात इष्ट बदल घडवून आणणे असते. आमिर खान ही सुरुवात स्वतःपासून करतोय. Intolerance शब्दाभोवती झालेल्या टीकेला मागे सोडताना ‘सत्यमेव जयते’ हा माझा भारतीयांच्या किंबहुना स्वत:च्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. आता मी देशाला आणि स्वतःला अधिक चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतो.’ असे तो जाहीरपणे मान्य करतो. समाजाची पारंपरिक प्रमाणमूल्ये घुसळून काढणाऱ्या कलेची, अद्वितीय कलाकाराची चिकित्सा कशी करणार? अंडरडॉग माणूस भरारी घेतो तेव्हा ती गोष्ट कमाल असते. ‘गुड फोर नथिंग’ असणारा ‘जो जीता वही सिकंदर’चा नायक प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आवाक्याबाहेरचं काम करून जातो. ‘गुलाम’ मध्ये साडेपाच फूट उंचीचा इवलुसा नायक बलाढ्य ‘रॉनी सिंग’ला लोळवतो. स्वातंत्र्याची चाड असलेला ‘मंगल पांडे’ शक्तिशाली ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ कंपनीविरोधात शड्डू ठोकतो. आमिर खान प्रत्यक्षात याहून वेगळं काय करतोय? 
1 लगान, मंगल पांडे, रंग दे बसंती, तारे ज़मीन पर, ३ इडियटस, पीके, दंगल यातलं वैविध्य चकित करणारं आहे. ‘पिपली लाइव्ह’, ‘धोबी घाट’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ यातून माणसाविषयीचा ‘कन्सर्न’ अधोरेखित होतो. दर सिनेमागणिक आमिर जेवढा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललाय, तितकेच प्रेक्षक म्हणून आपणसुद्धा समृद्ध होतोय. 
2 कोणत्याही विचारसरणीचे प्रयोजन समाजात इष्ट बदल घडवून आणणे असते. आमिर खान ही सुरुवात स्वतःपासून करतोय. Intolerance शब्दाभोवती झालेल्या टीकेला मागे सोडताना ‘सत्यमेव जयते’ हा माझा भारतीयांच्या किंबहुना स्वत:च्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. आता मी देशाला आणि स्वतःला अधिक चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतो.’ असे तो जाहीरपणे मान्य करतो.

लेखकाचा संपर्क - ९६८९९४०११८

बातम्या आणखी आहेत...