Home | Magazine | Rasik | Jitendra Ghatage writes about vivek reason movie

ही साद तुमच्या विवेकाला!

जितेंद्र घाटगे | Update - Apr 21, 2019, 12:20 AM IST

आनंद पटवर्धन यांचा नवा माहितीपट ‘विवेक reason' पाहताना  भीती, असहायता, चीड, संताप या भावना उफाळून येत असतात

 • Jitendra Ghatage writes about vivek reason movie

  आनंद पटवर्धन यांचा यूट्यूबवर प्रदर्शित झालेला नवा माहितीपट ‘विवेक reason' पाहताना भीती, असहायता, चीड, संताप या सगळ्या भावना उफाळून येत असतात. अभिनिवेश गळून पडतात आणि राष्ट्रवादाची नव्याने होऊ पाहत असलेली व्याख्या सुन्न करते. निर्णायक उत्तर न देता प्रश्न विचारून अस्वस्थ करणे हे कलाकृतीचे फलित मानावे लागेल. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेण्यापूर्वी विवेकाला जागं राहून मला स्वतःला आणि धर्मव्यवस्थेला, शासनयंत्रणेला प्रश्न विचारायची हिंमत हवी.

  दादरीमध्ये गायीचं मांस खाल्ल्याच्या संशयावरून ज्या अखलाकची जमावाकडून उन्मादाने ओढत नेऊन हत्या झाली त्याचाच तरुण मुलगा - जो भारतीय हवाई दलात सेवा करतोय - म्हणतोय की, ‘मैं भाग्यशाली हूँ की यहाँ जन्मा हूँ. इस जैसा देश मिलना मुश्किल है, सिर्फ कुछ चंद लोग है जो यहाँ की आबोहवा बिगाड़ना चाहते है.' केवढा तो आशावाद!

  -पण सिनेमा म्हणजे केवळ पडद्यावर तरलपणे मांडलेली कविता नसते आणि दोन घटकांचं मनोरंजनही नसतं. सिनेमा असा तसा कसाही असू शकतो हे ज्यांना उमगलं आहे ते या माध्यमाचा उपयोग वास्तव दर्शनासाठी किंवा आपली भूमिका मांडण्यासाठी प्रभावीपणे करू शकतात. कलाविषयक आणि जीवनविषयक जाणिवा त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी गेल्या ४५ वर्षांहून जास्त काळ वेळोवेळी आपल्या माहितीपटाच्या माध्यमातून धार्मिक-राजकीय स्थित्यंतरे आणि त्या संलग्न परिवर्तने यांचं हादरवून टाकणारं दस्तऐवजीकरण केलं आहे. तत्कालीन राजकीय घडामोडींचा संदर्भ घेत व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनात व जाणिवेत होत गेलेले सूक्ष्म बदल टिपण्याचा वसा त्यांनी अनेक माहितीपटांतून अविरत चालू ठेवला आहे. सेन्सॉरशिप आणि राजकीय दबाव यांना न जुमानता ‘विवेक Reason' हा माहितीपट त्यांनी नुकताच यूट्यूबवर प्रदर्शित केला. एकीकडे उदार आर्थिक धोरणं राबवणारे शासन, तर दुसरीकडे टोकाचे भाषिक-सांप्रदायिक अस्मितेचे राजकारण आहे. भारतातील बदलत्या आणि बिघडत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थिती-गतीचे दर्शन आणि त्या परिस्थितीचा विस्तृत आढावा दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी ‘विवेक Reason'च्या निमित्ताने घेतला आहे.

  तटस्थ माहितीपट आणि प्रॉपगेंडा फिल्म या दोघांमध्ये एक मूलभूत फरक असतो तो म्हणजे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ सत्यदर्शनाचा. अर्थात माहितीपटातील वस्तुनिष्ठता हीसुद्धा व्यक्तिनिरपेक्ष असते, मात्र इथे निर्माता सर्जनशीलता, सामाजिक बांधिलकी, नैतिकता, विवेकवादाशी नाते सांगणारा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सिरीज आणि आगामी बायोपिक सिनेमा, लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूमागील कारणे शोधू पाहणारा “ताश्कंद फाइल्स', राहुल गांधींचा बायोपिक असलेला ‘माय नेम इज रागा' हे सगळे निवडणुकीच्या धामधुमीत येऊ घातल्याने, त्यांचे उद्देश अगदीच स्पष्ट असतात. मात्र, हे सिनेमे आपल्या नकळतपणे त्यांचे विचार थोपवू पाहत असताना ‘विवेक Reason'सारखा माहितीपटदेखील याचदरम्यान ऑनलाइन का असेना प्रदर्शित होणे याला संवैधानिक महत्त्व आहे. असा माहितीपट ज्याला हे पक्कं माहितीये की सत्य हे नेहमीच अप्राय असेल. त्यांचा कॅमेरा ते सत्य फोर्ज करू शकत नाही की तसला आवदेखील त्यांना आणायचा नाहीये. त्यांना फक्त अशा गोष्टी समोर आणायच्या आहेत ज्याने प्रेक्षक विवेकाचा आवाज बुलंद करून प्रश्न विचारायला शिकेल आणि स्वतःपुरत्या सत्यशोधनाच्या प्रवासाला लागेल. अर्थात त्याचे फलित यशापयश हा वेगळा चर्चेचा मुद्दा असला तरी कुठलाही निर्णय घेण्याअगोदर विवेकबुद्धी गहाण ना ठेवता चिंतनाचे बीज पेरले जाईल हे नक्की. त्यातून प्रेक्षकांनी कुठला निर्णय घ्यायचा किंवा कुठली राजकीय भूमिका स्वीकारायची याचे स्वातंत्र्य तो आपल्याला देतो.

  असे काय आहे ‘विवेक Reason'मध्ये?
  भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे परस्परविरोधी अनेक राजकीय मतप्रवाह समोरासमोर येऊन उभे राहणेे अपरिहार्य आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत राजकरण झपाट्याने बदलतंय. राजकीय विचारांमागे धार्मिक-जातीय अस्मितेचा पगडा दिसून येतो. कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटना भारताच्या लोकशाही विचारधारेला कसा सुरुंग लावत आहे याचं विस्तृत चित्रण ‘विवेक'मध्ये आहे. तटस्थपणे फक्त चित्रण करण्याचं काम न करता गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांना एकसंध जोडून बघितल्यावर काही वेगळं दिसतंय का ते आपल्याला आपल्या नजरेने शोधायला लावतो. ‘विवेक'मध्ये दाखवलेल्या घटना खरं तर फक्त न्यूज म्हणून आपण कधीच विसरून चाललो आहोत. मात्र, एखाद्या कॅलिडोस्कोपमधून त्याच घटना वेगळ्या पद्धतीने सुसंगतपणे बघितल्या तर दिसून येणाऱ्या प्रतिमा धक्कादायक आहेत. बुद्धिप्रामाण्यवादी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या आणि त्यामागचा कार्यकारणभाव शोधताना फॅसिस्ट विचारधारेच्या उत्पत्तीपर्यंत पोहोचत पटवर्धन यांनी जोडलेले धागेदोरे हे शोधपत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. श्रद्धा आणि विवेकाची लढाई प्राचीन काळापासून चालू असल्याचे आधीच नमूद करत सद्य:स्थितीत ह्या लढाईत हिंदू राष्ट्रवादाच्या नव्या संज्ञेचा पीळ कसा वाढत चालला आहे हे पाहणे विदारक ठरते. आनंद पटवर्धन यांचा कॅमेरा भारतात गेल्या काही वर्षांत झालेल्या हिंसेच्या घटनांचा पद्धतशीरपणे मागोवा घेतो. दादरीमध्ये बीफ खाल्ल्याच्या अफवेतून अखलाकची हत्या झाल्यानंतर, गो रक्षणाच्या निमित्ताने मांडलेला हैदोस, व्हॉट्सअॅपच्या अफवेवरून मुस्लिम तरुणाची झालेली हत्या, उनामध्ये दलित आंदोलनानंतर झालेल्या घटना, हैदराबाद युनिव्हर्सिटीत रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयू कॅम्पस, गोव्यात रामनाथी गावात असलेले सनातनचे हेडक्वार्टर, तिथल्या गावकऱ्यांचा त्याला असलेला विरोध आणि आंदोलने, मालेगाव बॉम्बस्फोट आणि त्यातले आरोपी, हेमंत करकरेंचा मृत्यू कसा झाला असावा याची कारणमीमांसा, महापुरुषांच्या नावाखाली चाललेला उन्माद, शाहीर शीतल साठे, आंबेडकरी जलसे आणि त्यांचे महत्त्व - यांसारख्या अनेक घटनांना बेधडकपणे प्रत्यक्ष जाऊन भिडतो.


  जगप्रसिद्ध फिल्ममेकर ‘जॉन ग्रीयर्सन' हे माहितीपटाला “Creative treatment to actuality' क्रिएटिव्ह ट्रीटमेंट टू अॅक्चुअलिटी' मानतात. वास्तवाची तर्कसंगत विचारसरणीने केलेली सैद्धांतिक पुनर्मांडणी. त्या अनुषंगाने ‘विवेक Reason'ला स्वतःची विचारधारा असली तरी ते विचार आपल्यावर थोपवले जात नाहीत. कार्ल मार्क्स धर्मासंबंधी परिवर्तनवाद्यांची भूमिका काय असावी हे सांगताना लिहितात की, ‘सुखाचा केवळ आभास असणारा धर्म नाहीसा करण्याची मागणी करणे म्हणजेच लोकांच्या खऱ्या सुखाची मागणी करणे होय. ज्या हतबलतेमुळे शोषणाचे साधन असलेल्या धर्माची गरज भासते ती हतबलता नाहीशी करावी.' अच्छे दिनच्या भ्रामक सुखाची गरज ज्या परिस्थितीमुळे निर्माण होते ती परिस्थिती आणि समाजरचना बदलणे किती गरजेचे आहे याचं दस्तऐवजीकरण पटवर्धन आपल्यासमोर ठेवतात. सिनेमा किंवा माहितीपट हे केवळ घटनेचे दस्तऐवजीकरण नसते. वेळीच सावध करणारा तो एक इशारा असतो. कठड्यावर बसून संभ्रमात असणाऱ्या प्रवृत्तींना मागे खेचणारा तो हात असतो. सिनेमा पाहून लगेच कुणाचे मतपरिवर्तन होत नाही. तसे व्हायलाही नको. मात्र, विवेकबुद्धी जागृत ठेवल्याने जे सीमारेषेवर लोंबकळत आहेत त्या व्यक्ती भिंतीपलीकडे जाण्याअगोदर विचार करतील, माणसाला संकुचित, हिंसक बनवणारी विचारधारा दूर सारतील हे नक्की.

  दादरीमध्ये गायीचं मांस खाल्ल्याच्या संशयावरून ज्या अखलाकची जमावाकडून उन्मादाने ओढत नेऊन हत्या झाली त्याचाच तरुण मुलगा - जो भारतीय हवाई दलात सेवा करतोय - म्हणतोय की, ‘मैं भाग्यशाली हूँ की यहाँ जन्मा हूँ. इस जैसा देश मिलना मुश्किल है, सिर्फ कुछ चंद लोग है जो यहाँ की आबोहवा बिगाड़ना चाहते है.' केवढा तो आशावाद! “विवेक reason'चं चित्रीकरण लिटमस टेस्ट समजून विवेकाला जागून निर्णय घेण्याचा दिवस येऊन ठेपलाय. पुढे काय होईल माहीत नाही, पण त्याचे बरे-वाईट दूरगामी परिणाम आपण सगळे भोगणार आहोत. मला स्वस्थ बसायचं नाहीये, प्रश्न विचारत राहायला हवेत. फक्त अखलाकच्या मुलात आहे तसा आशावाद माझ्यात टिकून राहायला हवा. माझ्या स्वप्नात असलेल्या अंतिम समाजरचनेत धर्माचे स्थान कसे असावे? सांप्रदायिक अपप्रवृत्ती नाकारण्याचा अधिकार मला असावा की नसावा? माझ्या स्वयंपाकघरात काय शिजतंय यावरून मी समाजातल्या कुठल्या उतरंडीत असावं हे ठरवलं जातंय, धर्म आणि माझ्या ताटात असलेला घास या दोन्ही बाबी मला अत्यंत खासगी वाटत असतील तर त्यावरून मला कुणी ‘जज’ करू नये, अशा समाजाची मी अपेक्षा करावी की नाही? संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थेला न अंगीकारता कुणी तरी कौटिल्याचे पुरातन राज्यशास्त्र माझ्यावर नकळतपणे थोपवू बघतंय का हे तपासण्याचा, तसं असल्यास विरोध करण्याचा अधिकार असावा की नसावा? शोषणविरहित समाजाची अपेक्षा करताना माझ्या मताने जो निवडून येणार त्याची धर्मविषयक भूमिका आणि विचार काय असेल? धर्म, जात, देश यापलीकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची मुभा ही यंत्रणा मला देऊ शकेल काय? या सर्व प्रश्नांची भाऊगर्दी फिल्म संपल्यानंतर आपला पिच्छा सोडत नाही.

  गोविंद पानसरेंची गोळ्या झाडून हत्या झाली त्या दिवशी सकाळी ते मॉर्निंग वॉक घेऊन घरी परतत होते. साडेचार तासांचा ‘विवेक Reason' माहितीपट संपतो तो याच्या अगदी उलट आशावादी नोटवर! पानसरे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना दाखवले आहेत. आणि पार्श्वभूमीवर जुन्या रेकॉर्डिंगमधला त्यांचा आवाज - ‘मी जे तत्त्वज्ञान स्वीकारलेलं आहे त्यामध्ये अंगभूत गोष्ट अशी आहे की जी यशस्वी होणारच. हा माझ्या, तुमच्या, कुणाच्या इच्छेचा प्रश्न नाही. जगामध्ये याच्यापूर्वीच्या कोणत्याही काळामध्ये एवढी विषमता नव्हती, तेवढी विषमता आज जगभर आहे, ही विषमता माणसाला स्वस्थ बसू देणार नाही. त्या विषमतेच्या विरुद्ध मनुष्य उभा राहणारच. संघर्ष करणारच... आणि त्या संघर्षामधून तो एका टप्प्याटप्प्याने यशावर जाणारच. माझ्या मते ते होणारच. स्वप्न बिप्न तर बिलकुल नाही... आणि स्वप्नं वाईट नसतात!'

  भीती, असहायता, चीड, संताप या सगळ्या भावना ‘विवेक reason' पाहताना उफाळून येत असतात. अभिनिवेश गळून पडतात आणि राष्ट्रवादाची नव्याने होऊ पाहत असलेली व्याख्या सुन्न करते. निर्णायक उत्तर न देता प्रश्न विचारून अस्वस्थ करणे हे कलाकृतीचे फलित मानावे लागेल. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेण्यापूर्वी विवेकाला जागं राहून मला स्वतःला आणि धर्मव्यवस्थेला, शासनयंत्रणेला प्रश्न विचारायची हिंमत हवी. सिनेमाच्या शेवटी पानसरेंच्या ओळी वेगळं काय करतात?


  ‘मी इथेच आहे, काय करायचं ते करा’
  कट्टर हिंदुत्ववादी, मूलतत्त्ववादी संघटनांना प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद करताना त्यांना मिळालेलं फुटेज बघितल्यावर कळतं की ‘विवेक Reason’सारखे माहितीपट तयार होऊ शकणे आणि आपल्याला ते पाहता येणे ही वाटते तितकी साधी गोष्ट अजिबात नाही. सिनेमात एके ठिकाणी सनातनच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचा वकील कार्यकर्ता उघड उघड सगळ्या पत्रकारांसमोर बोलतो की ‘कलबुर्गीच्या हत्येच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात आनंद पटवर्धन सहभागी होते. पोलिसांनी त्यांचे हात-पाय का नाही तोडले? उस वक्त गुस्सा आता है.’ समोर पत्रकारांमध्ये उभे असलेले आनंद पटवर्धन हात वर करून म्हणतात की, ‘मी इथेच आहे, काय करायचं ते करा.’ त्यांनी हेच फुटेज ‘विवेक’ बनवताना वापरलं आहे! जिवाला असलेला धोका पत्करून कुणी तरी उघडंनागडं सत्य आमच्यासमोर ठेवतोय तेव्हा शिक्षण, विवेकबुद्धी आणि अविरत संघर्षाची त्यांनी परिसीमा गाठलेली असते. विवेकमध्ये आपल्याला नको असलेलं किंबहुना आपल्यापासून लपवून ठेवलेलं विद्रूप जग समोर आणून ठेवलंय. हे चित्र बदलण्यासाठी समोर येऊन उभे ठाकणे ही त्यातील पहिली पायरी असते.


  जितेंद्र घाटगे
  [email protected]
  लेखकाचा संपर्क - ९६८९९४०११८

Trending