आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक बार ‘जान’ कहो...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बू काय करते तर खूप मेहनतीने पत्त्यांचा बंगला उभा करते. मी भारावून तो बघायला जातो आणि ती माझ्याकडे बघून गूढ हसते... मी ज्या पत्त्यांच्या इमल्यावर स्वप्न रचत असतो त्यावर फुंकर मारून ढासळून टाकते. दरवेळेस भोवळ आणणारे अभिनयाचे इमले बांधणं ती सोडत नाही... मी आता तरी तिला समजून घेऊ शकतो असा समज करून स्वप्न बघणं मी ही सोडत नाही... अन डाव रंगात आलेला असताना फुंकर मारणं ती ही सोडत नाही!

 

असं म्हणतात की लिखित शब्दांनी माणसाचे जेवढे नुकसान केले तेवढे कशानेच केले नसेल. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात, "कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी.' माझ्या आवडत्या "तब्बू' बद्दल कितीतरी अंगाने लिहावं हा विचार मनात येतो आणि शब्दांने, भाषेने माझे वैयक्तिक किती मोठे नुकसान केले ते लक्षात येते. मला तब्बू बद्दल भरभरून लिहायचं असतं... बोलायचं असतं... तासनतास! मात्र तिच्याबद्दल मला काय वाटतं ही भावना कागदावर उतरवायला पुरेसे पडतील असे शब्द कुठल्याही भाषेत नाहीत... हे विधान मी अत्यंत जबाबदारीपूर्वक करत आहे. 


आपल्याला स्वप्न पडतात ना? स्वप्नात असताना एकदम उत्कट अनुभव असतो तो. तेव्हा ती घटना किती रोमांचक वाटते. साधी घटना असते, पण जीवन-मरणाचा प्रश्न वाटतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना "ल्युसिड ड्रीम' हा प्रकार असेल. ल्युसिड ड्रीम म्हणजे अशी स्वप्ने ज्यात आपण स्वप्न पाहत असतो ही जाणीव असते. स्वप्नात घडणाऱ्या घटनांवर आपल्याला कंट्रोल पण करता येतं. अशी स्वप्ने कमी अधिक प्रमाणात बहुतेक लोकांना पडतात. अशा स्वप्नांची सुद्धा एक खासियत अशी की बऱ्याच प्रतिमांचा बिलकुल उलगडा लागत नाही. एकदम कसोशीने त्यात ऍक्टिव्ह असूनसुद्धा समोर दिसणाऱ्या घटना अनाकलनीय असतात. तरी आपण प्रयत्न करणे सोडत नाही हे विशेष. उलट स्वप्नातून परत जाग आल्यावर परत झोपून त्याच ठिकाणी जायला धडपडतो. 
"तब्बू' माझ्यासाठी असंच एक स्वप्न आहे. बऱ्याच प्रतिमा गूढ.. मला तिच्याबद्दल असणाऱ्या घनघोर आकर्षणाचा पाठपुरावा करताना हाती लागतं तेही काहीतरी मोघम.. पण ते प्रचंड आकर्षित करणारं आहे. प्रत्येकाला या स्वप्नात काहीतरी वेगळं मिळेल. 


तब्बू हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने तिच्याबद्दल बोलताना कुठलेही पुस्तकी नियम नकोसे वाटतात. तटस्थता दूर सारून "तब्बू'नामक महाकाव्याचे पापुद्रे उलगडावे वाटतात. अर्थात ती अजूनही एवढी गूढ आणि अनाकलनीय आहे की ते करतानाही हाती काही लागतं ते अगदीच सापेक्ष आणि निरर्थक असू शकतं. मी माझ्या बुद्धीप्रमाणे, कुवतीप्रमाणे मला तिच्याबद्दल असलेल्या आकर्षणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते पूर्णतः वैयक्तिक असतं. स्वतःपुरतं. खोटं मात्र अजिबात नव्हे! तब्बू आवडणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला वेगळंच काहीतरी हाताला लागू शकेल. त्याचा शोध त्याने घ्यावा... निरर्थक शोध... तुम्ही ग्रेसच्या कविता, जीएंच्या दृष्टांतकथा वाचलेल्या असतील तर एखाद्याच्या शोधत हे असं भरकटत जाण्याची अवस्था काय असू शकते याचा अंदाज येऊ शकतो. बुद्धीला कळत नसलं तरी ग्रेस, जीए आणि तब्बू मला स्वतःसोबत फरफटत नेतात... प्रचंड अस्वस्थता आणि अखंड घालमेल मागे ठेवत... एवढा त्रास सहन करून सुध्दा तिच्याबद्दल असणारं जीवघेणं आकर्षण अजिबात कमी झालेलं नसतं हे विशेष. त्या आकर्षणाची मीमांसा केली जाऊ शकत नाही. करू सुद्धा नये. मात्र माझ्यात रुजलेली तिची पाळंमुळं शोधणं गरजेचं वाटतं.


तबस्सुम फ़ातिमा हाशमी उर्फ तब्बू. नकळत्या वयात नको त्या भावना चाळवल्या जाण्याआधी हृदयात नाही तर शरीरात घर करून बसलेली हिरोईन. आमच्या घरात वडीलांना माधुरी दीक्षित आवडते म्हणून "हम आपके है कौन'मधल्या गोल उघडया गळ्याचं पाठमोऱ्या माधुरीचं पोस्टर भिंतीवर चिटकवलेलं होतं. आईने खुन्नस म्हणून त्याच शेजारी "बोल राधा बोल'च्या जुही चं पोस्टर चिटकवलं. मी त्यांच्यावर खार खाऊन भेळच्या गाड्याला आतून लागलेलं असतं तसं पोस्टकार्ड साईज "विजयपथ'च्या तब्बूचं पोस्टर आणलं अन् शाळेच्या कंपासपेटीत ठेवायला लागलो. सौंदर्याचे परिमाण एकाच घरातसुद्धा वेगवेगळे असू शकतात हे तेव्हा नकळत बिंबले जात होते. मात्र हेच परिमाण संपूर्ण देशात सुद्धा कसे बदलत जातात ते लक्षात येईपर्यंत मुख्य प्रवाहातील भारतीय अभिनेत्री अपवाद वगळत्या कचकड्याच्या बाहुल्या म्हणून मिरवत होत्या. प्रत्येक वयाचं एक सौंदर्य असतं आणि त्या वयात दुसऱ्या वयाचं सौंदर्य थोपवले जाऊ नये असं माझं मत. दुर्दैवाने बॉलीवूड ह्या बाबतीत गोऱ्यागोमट्या चित्रात अडकला तो आजतागायत. 


तब्बूने सिनेसृष्टीत आगमन केले तेव्हा शारीरिक सौंदर्याचे मापदंड बॉलिवूडमध्ये पक्के होत चालले होते. मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस एशिया पेसिफिक यातील विजेत्या मॉडेल्सची चलती होती. तब्बूचा गव्हाळ अन सावळेपणाकडे झुकत चाललेला आपलासा वाटणारा चेहरा कलात्मक सिनेमात न रुळता व्यावसायिक आणि समांतर सिनेमात ज्या पध्दतीने मिसळून गेला या घटनेचे सामाजिक आयाम महत्त्वाचे ठरतात. विशेषतः तिने ज्या पद्धतीच्या परस्परविरोधी भूमिका निभावल्या त्या पाहता स्त्रीची विविध रुपं डोळे दिपवून टाकणारी आहेत. क्लासेस आणि मासेस अशी वर्गवारी न करता दोन्ही ठिकाणी पाय घट्ट रोवून उभं राहणं ज्यांना जमतं अशा अभिनेत्री दुर्मिळ... तब्बू त्यापैकी एक. 


तब्बूबद्दल मला "पजेसिव्ह' व्हायला आवडतं. तब्बू आता पन्नाशीकडे झुकत चाललीये, अन् ह्या वयात सुद्धा तिचं लग्न न करता राहणं मला चोरटं सुख देतं. ती जोवर सिंगल राहणार तोवर ही "सेन्स ऑफ पजेशन'ची भावना मी स्वतःपुरती कायम कुरवाळत राहणार. त्यामुळेच सिनेमापुरतं का असेना तिच्या वाटेला आलेल्या दुःखाची नैतिक जबाबदारी मला घ्यायला आवडतं. "जीत' मध्ये सनी देओलने झिडकारून सुद्धा एकतर्फी मनात घुटमळत राहणारी तब्बू पाहिली की वाटतं, त्या क्षणी पडद्यात घुसून शेकडो करिष्मा कपूर तिच्यावरून ओवाळून टाकाव्यात. 'चांदणी बार' मध्ये तिला कामाला लावणाऱ्या मामाच्या टपल्या झोडाव्या वाटतात. अगदी खरं सांगायचं तर 'साथिया' मध्ये तिच्या चुकीमुळे कारचा एक्सीडेंट होऊन राणी मुखर्जी गंभीर जखमी होते. तब्बू एका सिन मध्ये शाहरुखकडे झालेल्या चुकीची माफी मागून रडायला लागते. तिचं रडणं ओरडून सांगावं वाटतं की 'जाऊ दे ना राणी, तिचा जीव तुझ्या अश्रूंपेक्षा जास्त मोलाचा आहे का!' परफेक्ट बायको कशी असावी याबद्दल माझ्या व्याख्येमध्ये एकेकाळी 'विरासत' ची 'गेहना' तब्बू होती. काही वर्षांनंतर 'हम साथ साथ है' पाहून असं वाटायला लागलेलं की साला बायको असावी तर अशी. 'तलवार' सिनेमा ज्या आरुषी हत्याकांडवर आधारित आहे, त्या सिनेमात प्रत्यक्ष गुन्हेगार कुणीही असो, तब्बू निर्दोष सुटली पाहिजे असं फार आतून वाटायचं. 'जय हो' मध्ये तब्बू सलमानच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. तिच्यावर गुंड हात उचलायला बघतात तेव्हा ऐन वेळी सलमान पोचतो अन सगळ्या गुंडांची एकसाथ लोळवतो. सलमानचे असंख्य टुकार सिनेमे आणि त्याला अभिनय येत नाही ह्या सगळ्याना मी तेवढया सिन साठी माफ करू शकतो. आपल्या तब्बूला वाचवलं आहे. विषय आहे का! 


'दिल का करे साहेब'असं म्हणणाऱ्या तब्बूला सोडून "जीत' मध्ये सनी देओल करिष्माच्या मागे लागतो तेव्हा ढाई किलोचा हात असलेल्या माणसात ढाई ग्राम हृदय तरी आहे का - हा प्रश्न पडद्यात घुसून विचारावा वाटतो. 'दृष्यम' सिनेमात कडक पोलीस युनिफॉर्ममध्ये असलेल्या तब्बूला शेवटी अजय देवगण रडवतो. कुठून जन्माला येतात अशी दगड काळजाची माणसं! 'मकबूल' मध्ये आहे तशी 'निम्मी' मिळाली तर शंभर अब्बाजीचे खून करायला तयार होतो मी...  गेल्या वर्षी आलेल्या 'अंधाधून'मधलं तिचं जानलेवा सौंदर्य पाहून थक्क झालो. मुळात या सिनेमात प्रत्येक फ्रेम मध्ये इतकं ठासून सगळ्या गोष्टींचं इंस्टोलेशन केलय की पडद्यावरून थोडं जरी लक्ष विचलित झालं तरी खूप काही महत्वाचं मिस होऊ शकतं. तब्बूला बघावं की बाकी ठिकाणी लक्ष द्यावं ही सर्वात मोठी कसरत आहे. तिचा अभिनय वैगरे नंतर. एवढी खतरनाक, भयंकर, जहर सुंदर दिसते की जगभरचं सगळं सौंदर्य एका पारड्यात आणि  तुळशीपत्राइतकी अमूल्य तब्बू दुसऱ्या पारड्यात. नेहमीच जड... तब्बूच्या डोळ्यात आपल्याबद्दल शून्य प्रेम दिसतं. ही एकदम आतल्या गाठीची बाई आहे, अन हिच्यामागे लागणं म्हणजे उध्वस्त होण्यासारखं आहे, हे माहीत असून सुद्धा ती जीवघेणी नजर पाहून सगळं स्टेक वर लावावं वाटतं. 


भारतीय समाजात एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे जो स्त्री ला एकतर देवी मानतो किंवा चरित्रहीन व्यभिचारिणी! एखादी स्त्री व्यभिचारिणी असेल तर तिचं माणूसपण नाकारत देवपण ते चरित्रहीन यातल्या अत्यंत गुंतागुंतीच्या आलेखात कुठेच बसवू इच्छित नाही. आणि ह्याच मधल्या असंख्य स्त्री पात्रांना बॉलीवूड कुठे दाखवतो हे बघणं रंजक आहे. भारतीय सिनेमाबद्दल बोलायचं ठरल्यास स्त्री कलाकारांना दुहेरी लढाई लढावी लागली आहे. वैयक्तिक आयुष्यात पुरुषप्रधान संस्कृतीत आपलं अस्तित्व जपणे एकीकडे तर नायककेंद्रित हिंदी सिनेमात स्त्री ही फक्त भोगवस्तू अन कचकड्याची बाहुली असल्याचं नाकारत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं दुसरीकडे. त्यामुळे १०० वर्षांपूर्वी भारतात कनिष्ठ कला समजलं गेल्याने स्त्रियांनी सिनेमात काम करण्यास दिलेला नकार ते पडद्यावर नैतिकतेची बंधनं मोडीस काढत साकारलेली विविधरंगी स्त्री पात्रे... हे स्थित्यंतर अभ्यासणे महत्वपूर्ण ठरते. एखाद्या परदेशी प्रेक्षकाने कुठलाही व्यावसायिक हिंदी सिनेमा सहजपणे बघायला घेतला तर त्याचं आपल्या स्त्रियांबद्दल काय मत तयार होईल हा विचार केल्यावर मात्र मती गुंग होते. 


मला नेहमी असं वाटत आलय की, कुठल्याही अनोळखी माणसाला सर्वांगीण भारतीय स्त्रीचं चित्रण दाखवायचं असेल तर तब्बूचे सिनेमे दाखवावे. पूर्ण स्त्री ही पुरुषाला कधीच झेपत नाही. आपल्याला ज्या स्त्रिया भेटतात तो त्यांचा तुकड्यातुकड्यात बघत असलेला एक पैलू असावा. तब्बूने साकारलेल्या भूमिका एकसंधपणे प्रत्येक पैलूवर मांडून बघितल्या तर समोर दिसणारा हिरा मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. ह्या वयात सुद्धा तब्बू ज्या भूमिका करते त्या चक्रावून टाकणाऱ्या आहेत. त्या एकेक पैलूवर काय नाही म्हणून विचारता - शीख विद्रोह आणि खलिस्तान चळवळीच्या पार्श्वभूमीवर निरागसपणा हरवून गलेली माचीसची 'विरा' आहे... नागरिक म्हणून हक्क नाकारणाऱ्या देशाबद्दल उदासीन असलेली हूतुतू मधली 'पन्ना' आहे... विचित्र परिस्थितीत बावरलेली विरासत ची नववधू 'गहना' आहे...  विवाहसंसंस्थेच्या बाहेर जाऊन स्वतःचं 'अस्तित्व' शोधणारी 'अदिती' आहे...  आख्खं आयुष्य डान्सबार मध्ये होरपळून निघाल्यानंतर उतारवयात जेव्हा आपल्या मुलांच्या नशिबात सुद्धा याहून वेगळं जगणं नाहीये हे लक्षात आल्यावर टाहो फोडणारी 'चांदणी बार' ची 'मुमताज' आहे... 'एक बार जान कहो' हे म्हणत आपल्या प्रियकरावर बंदूक उगारणारी 'मकबुल' ची 'निम्मी' आहे... नेमसेक मध्ये इरफानच्या मृत्यूची बातमी समजल्यावर आभाळाकडे बघत रस्त्यावर अनवाणी धावणारी 'अशीमा' आहे... आपला वयोवृद्ध पार्टनर सेक्ससाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी गार्डनमध्ये दूरवर एका झाडापर्यंत बच्चनला धावायला लावणारी 'चीनी कम' ची 'नीना' आहे... आणि हैदर मधली 'ग़ज़ाला' आहे, जी इतकी कमाल सुंदर आहे तिच्या मुलात सुद्धा 'इडीपस कॉम्प्लेक्स' देऊ शकते. इच्छा नसतानाही! तिच्या सगळ्या भूमिकांचा चुरा करून Kaleidoscopes टाकल्यास जे काही दिसतं ते केवळ अद्भुत आहे. 


तब्बू काय करते तर खूप मेहनतीने पत्त्यांचा बंगला उभा करते. मी भारावून तो बघायला जातो आणि ती माझ्याकडे बघून गूढ हसते... मी ज्या पत्त्यांच्या इमल्यावर स्वप्न रचत असतो त्यावर फुंकर मारून ढासळून टाकते. दरवेळेस भोवळ आणणारे अभिनयाचे इमले बांधणं ती सोडत नाही... मी आता तरी तिला समजून घेऊ शकतो असा समज करून स्वप्न बघणं मी ही सोडत नाही... अन डाव रंगात आलेला असताना फुंकर मारणं ती ही सोडत नाही! तब्बू बद्दल माझ्या नशिबात असं झुरणं किती दिवस असेल याचा विचार करणं मी सोडून दिलय. वयाच्या ४९व्या वर्षी ती माझ्यासाठीच सिंगल आहे हा माझ्यापुरता मी समज करून घेतलाय. कुणी नावं का ठेवेना. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ते अजिबात खोटं नाही! 

 

जितेंद्र घाटगे
jitendraghatge54@gmail.com

लेखकाचा संपर्क - ९६८९९४०११८

 

बातम्या आणखी आहेत...