आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनयात्रा वृद्धाश्रमाकडे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक खेड्यातला पोरगा. आई-वडिलांनी खस्ता खाऊन शिकवला. पुढे तो मोठा बंडिंग खात्याचा साहेब झाला. शे-दीडशे कर्मचारी हाताखाली, मोठा थाट. मात्र, घरात नवरा-बायकोचे खटके उडू लागले. बायको नव-याला म्हणायची, म्हातारा-म्हातारीची कुठेतरी सोय लावा. मला काय मोलकरीण समजता का? मीही कमावतेय. बायकोची टुमणी सारखी सुरू झाली. आई-वडिलांचं काय करावं, या विचारात गडी गढून गेला. एवढा मोठा साहेब बायकोपुढे वळू झाला. आई-वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन घालावं, साहेबाच्या डोक्यात विचार आला. वृद्धाश्रमाचं नाव ऐकून म्हातारे आई-वडील धाय मोकलून रडू लागले. तुझ्या बायकोला आम्ही त्रास देणार नाही. आम्ही काम करू, तुझ्या सहा-याने राहू. मातर आम्हाला वृद्धाश्रमात नकू सोडू; परंतु या साहेबाचा नाइलाज होता. नाशिकहून आई-वडिलांना औरंगाबादच्या वृद्धाश्रमात आणून सोडलं. साहेब संचालकांना म्हणाला, ह्यांना जीव लावा, असल्या नसल्याला मी आहेच. अधूनमधून येत राहीन. असं म्हणून साहेब गेला. साहेबाच्या मनात अपराधाची भावना होती; परंतु नाइलाज होता. असं करता करता आई-वडिलांची दोन -तीन वर्षे वृद्धाश्रमात गेली. एकुलता एक मुलगा दिवाळीतही भेटायला आला नाही. अशातच आई-वडील धोसरले अन् आई आजारी पडली. सारखी मुलाची आठवण काढायची. वृद्धाश्रमातले लोक देखभाल करीत. तुमची आई आजारी, आहे, त्यांना भेटायला या, म्हणून साहेबांना अनेक वेळा निरोपही दिला. साहेब आज येतो, उद्या येतो, असं फोनवरून सांगायचा. एक दिवस बाळ बाळ म्हणून आईनं प्राण सोडला. वृद्धाश्रमात शोकाकुल वातावरण झालं. रात्रभर म्हातारा मढ्याजवळ रडत होता. तुमची आई गेली, सकाळी अंत्यविधीसाठी या म्हणून आश्रमचालकांनी साहेबाला फोन केला. सकाळ झाली. पुन्हा आश्रमचालकांनी मुलाला फोन केला. आज माझी मीटिंग आहे, मला येता येणार नाही. तुम्हीच अंत्यविधी उरकून टाका, शेवटी काळीज फाटणारं मुलाचं उत्तर आलं.