आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जेजे’त कॅन्सर विभाग सुरू करणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथे कॅन्सर विभाग सुरू करण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. तसेच वैद्यकीय शिक्षणाला अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारकडून मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच काढला जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

पीआरपीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मुंबईतील जे. जे. सह काही रुग्णालयातील केमिस्टची बि‍ले थकली आहे. त्यामुळे रुग्णालयात होणारा औषध पुरवठा बंद झाला असून, त्यामुळे काही शस्त्रक्रिया बंद असल्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री देशमुख म्हणाले की, जे जे रूग्णालयाची २९ कोटी रुपयांची थकबाकी होती, ती पूर्ण अदा करण्यात आली आहे. तसेच आता औषध पुरवठा सुरळीत सुरू आहे. जे जे समुहातील रूग्णालयात हाफकिन महामंडळातर्फे औषधे व सर्जिकल बाबींचा पुरवठा करण्यात येणार होता. मात्र काही अडचणीमुळे त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक औषध पुरवठादारांकडून खरेदी करण्यात आलेली आहे. औषधे खरेदीबाबत काही बदल करण्याचा विचार सरकार करत आहे असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. 

आमदार विक्रम काळे यांनी जे. जे. रूग्णालय हे नामांकित असल्याने राज्यभरातून रुग्ण येतात. त्यामुळे सरकारने येथे कॅन्सर रूग्णालय सुरु करावे अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना मंत्री देशमुख म्हणाले की, कॅन्सरसारखा आजार भयंकर आहे. कॅन्सरवर संशोधन करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार निश्चित पावले उचलणार आहे. जे. जे. रुग्णालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. १५० वे वर्षे साजरा करत असताना तेथे कॅन्सर संशोधन विभाग सुरू करू, अशी घोषणा केली.