आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्पृश्यता पाळणार नाही याचे हमीपत्र सवर्णांनी द्यावे,आर्थिक आरक्षणावर जोगेंद्र कवाडे यांचे मत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सहा जागांचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. यामध्ये विदर्भ ३, मराठवाडा २ आणि उत्तर महाराष्ट्र १ जागेचा प्रस्ताव दिला आहे, असे सांगून गरीब सवर्णांना दिलेले आरक्षण ही चिंताजनक बाब आहे. यापुढे आरक्षण घेतले त्या सवर्णांनी जातीयता, अस्पृश्यता पाळणार नाही, जातीय भेदभाव मानणार नाही, असे हमीपत्र देण्याची गरज असल्याचे मत जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले आहे. 


नामांतर दिनानिमित्त औरंगाबादला आले असता आल्यानंतर 'दिव्य मराठी'ने त्यांच्याशी सुभेदारी विश्रामगृहावर संवाद साधला. त्या वेळी त्यांनी नामांतर ते आगामी लोकसभा निवडणूक यासंदर्भात सविस्तर मते मांडली. नामांतराचा लढा हा कोणत्याही अार्थिक-भौतिक सुखासाठी झाला नाही. केवळ अस्मितेसाठी लढला गेलेला हा देशातील एकमेव लढा आहे. नामांतराचा रौप्यमहोत्सव हा समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, लोकशाहीचा सन्मान आणि धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे. 


...तर पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत 

औैरंगाबादची निवडणूक लढवावी यासाठी पक्षाकडे कार्यकर्त्याकडून मोठ्या प्रमाणात आग्रह करण्यात येत आहे. सध्या आमचे लक्ष्य भाजपला हरवणे हे आहे. भाजपची सध्याची वाटचाल हुकूमशाहीकडे जाणारी असून आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत, अशी स्थिती आहे. 


महाआघाडीत यायचे किंवा नाही ते आंबेडकरांनी ठरवावे 
प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना सध्या चांगली गर्दी होत आहे, याबद्दल छेडले असता नवीन विचार ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे, असे सांगून कवाडे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. 


सवर्णांना आरक्षण चिंताजनक 
लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सवर्णांना आरक्षण देण्यात आले आहे. विद्यमान आरक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे. सवर्णांना आरक्षण ही चिंताजनक बाब आहे. आयकराची मर्यादा अडीच लाख असताना या आरक्षणात आठ लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. घटनेमध्ये आरक्षण सामाजिक तत्त्वावर देण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षण घेणाऱ्यांनी यापुढे कोणताही जातिभेद, अस्पृश्यता पाळणार नाही, कोणावरही अत्याचार करणार नाही, असे हमीपत्र देण्याची गरज अाहे. 

बातम्या आणखी आहेत...