आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार खाशोगी हत्याकांड; कोर्टाने 5 दोषींना ठोठावली फाशीची शिक्षा, दोषींची नावे गुलदस्त्यातच

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

रियाध : अमेरिकेत राहणारे सौदी अरेबिया वंशाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात सौदी अरेबियाच्या एका न्यायालयाने सोमवारी ५ दोषींना फाशीची शिक्षा तर इतर तिघांना एकूण २४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सौदीच्या युवराजांचे कठोर टीकाकार असलेल्या खाशोगी यांची गेल्या वर्षी इस्तंबूलमध्ये (तुर्की) सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात हत्या करण्यात आली होती.

फिर्यादी पक्षाने सोमवारी एका वक्तव्यात म्हटले आहे की, खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात थेट सहभाग असलेल्या पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, पण दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण ११ जण सहभागी असल्याचे सांगण्यात आले होते.

५९ वर्षीय खाशोगी 'वाॅशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रात स्तंभलेखन करत होते. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यावर टीका केल्याने ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आले होते. खाशोगी यांच्या हत्येनंतर जगभरात सौदी अरेबियाच्या विरोधात निदर्शने झाली होती. युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा बचाव करत असल्याचा आरोप सौदी अरेबियावर झाला होता. खाशोगीच्या हत्येत युवराज मोहम्मद बिन सुलतान यांचा हात असल्याचा संशय परराष्ट्र प्रकरणांतील तज्ञांना होता.

व्हर्जिनियात राहणारे खाशोगी २ आॅक्टोबर २०१८ रोजी इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात गेले होते. तेथे ते तुर्कीच्या आपल्या वाग्दत्त वधूशी लग्न करण्यासाठी काही कागदपत्रे आणण्यासाठी गेले होते. तेथे सौदी अरेबियाच्या काही एजंटांनी त्यांची हत्या केली आणि पुरावे नष्ट केले. खाशोगी यांचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. अमेरिकेचे अधिकारी आणि इतर देशांनी सौदी अरेबियाला या प्रकरणाची चौकशी करण्यास आणि न्याय मिळवून देण्यास सांगितले होते, पण सौदी अरेबियाने संभ्रम निर्माण करणाऱ्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झाली. सुरक्षेच्या कारणावरून ही सुनावणी गोपनीय ठेवण्यात आली. सौदी अरेबियाने काही संशयितांची नावे उघड केली नव्हती. एवढेच नाही तर सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या विदेशी मुत्सद्द्यांनाही गोपनीयता कायम ठेवण्याची शपथ देण्यात आली होती.

पुरावेही जाहीर केले नाहीत; तपास संस्थेने केला होता युवराजांकडे इशारा

सौदी अरेबियाने दोषींच्या नावांचा खुलासा केलेला नाही, पण युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे वरिष्ठ सहकारी सऊद अल-काहतानी यांच्यावर पुराव्यांअभावी खटला चालवण्यात आला नाही. एवढेच नाही तर युवराज मोहम्मद बिन सुलतान यांचा खाशोगींच्या हत्याकांडात थेट हात असल्याचा कुठलाही पुरावा जाहीर करण्यात आला नाही. विशेष म्हणजे केंद्रीय तपास संस्थेने युवराज मोहम्मद बिन सुलतान यांच्याकडे थेट इशारा केला होता. त्यांनीच या हत्याकांडाचा आदेश दिला होता, असे संस्थेने म्हटले होते. या कारवाईसाठी दोन खासगी विमाने आणि १५ पेक्षा जास्त सरकारी एजंटांची नियुक्ती करण्यात आली होती, असेही सांगण्यात आले होते. मात्र, युवराज मोहम्मद यांनी म्हटले होते की, हत्याकांडात माझी कुठलीही भूमिका नव्हती, पण हा प्रकार आपल्या निगराणीत झाला होता असे म्हणत त्यांनी काही जबाबदारी घेतली होती.
 

बातम्या आणखी आहेत...