आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देण्याचे सुख!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी एका माध्यमिक शाळेत अधिकारी म्हणून काम करतो. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून आम्ही शाळेत निरनिराळ्या गोष्टी करत असतो. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत गणवेशातच यावे, असा आमचा आग्रह असतो. त्यासाठी त्यांना वारंवार सूचना देतो, प्रसंगी थोडी शिक्षाही करतो, पण एवढे सगळे करूनही काही विद्यार्थी गणवेशात येत नसल्याचे आम्हाला आढळले. त्यांना आम्ही बोलावून घेतले आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. त्यात असे तीन विद्यार्थी आढळले की, ज्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. आई भांडी-धुणी करणारी तर वडील कोठेतरी मोलमजुरी किंवा हमाली करणारे होते. शाळेचा गणवेश घेण्याची त्यांची ऐपत नव्हती. अशा वेळी त्या मुलांना गणवेशाची सक्ती आम्ही कसे करणार होतो ? मी शाळा सुटल्यावर त्या मुलांना एका दुकानावर येण्यास सांगितले. त्या दुकानात आमच्या शाळेचे गणवेश विक्रीसाठी ठेवले होते. ती मुले तेथे आल्यावर मी दुकानदाराला त्या मुलांच्या मापाचे गणवेश देण्यास सांगितले. दुकानदाराने दिलेले ड्रेस त्या मुलांनी घालून पाहिले. नंतर मी दुकानदाराला ते ड्रेस मुलांजवळ पिशवीत घालून देण्यास सांगितले. हे सर्व पाहून ती मुले आश्चर्यचकित झाली. त्यांना हे काय चालले आहे हे कळेना. मी त्यांना म्हटले,‘बाळांनो, हे ड्रेस मी तुम्हाला घेऊन दिले आहेत. उद्यापासून सगळ्यांनी गणवेशात शाळेत या. चांगला अभ्यास करा. शिका आणि मोठे व्हा’ हे ऐकल्यावर त्या मुलांचे चेहरे आनंदाने उजळले. त्यांचा आनंद अवर्णनीय होता. ती मुले मोठ्या आनंदाने ही गोष्ट आपल्या पालकांना सांगण्यासाठी घरी पळाली. त्या मुलांच्या चेह-यावरील आनंद पाहून मलाही काही चांगले केल्याचे समाधान लाभले. हा आनंद पैशात विकत घेता येणारा नव्हता. देण्याच्या सुखातील आनंद मला मिळाला. अशा काही गोष्टीत माणसाला समाधान लाभते. त्या करण्यात कोणताही स्वार्थ अथवा दानशूरपणाचा आव नसतो.