आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट नावाची भाषा शिकण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चित्रपटाकडे शास्त्र आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहणारे फार कमी असतात. चित्रपट म्हणजे मनोरंजन इतकंच गणित अनेकांच्या डोक्यात पक्कं असतं. मात्र चित्रपट यापलिकडे खूप काही असतो. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऊर्फ एफटीआयआयमधला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या कलेकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी मिळाली त्याविषयीचं टिपण.


मला चित्रपट बघायचं अत्यंत आकर्षण आहे. मोठ्या स्क्रीनवर, संपूर्ण अंधारात, संपूर्ण एकाग्र होऊन जगापासून तुटून तुम्ही काही तास एका वेगळ्या जगात जाता. तो थिएटरमधला अंधार आईच्या गर्भात असल्यासारखा अतिशय उबदार सुरक्षित वाटतो. चित्रपट ही गोष्ट माझ्या आयुष्यात कधी आली ही सांगणं अवघड आहे इतका चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लहानपणी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये पाहिलेले चित्रपट, दूरदर्शनवर पाहिलेले जुने चित्रपट, नंतर केबलवर लागणारे चित्रपट ते आता इंटरनेटतर्फे लॅपटॉपवर आणि अॅमेझाॅन प्राईम/नेटफ्लिक्सने मोबाईलमधेच आलेला सिनेमा असा हा प्रवास आहे. या सगळ्यात एक महत्त्वाचा टप्पा लागला तो नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडियाचा. जागतिक चित्रपट नावाची एक जादू आयुष्यात आली आणि चित्रपटाकडे बघायची नजर बदलली. नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडियाने एक चित्रपटसंस्कार केला. तिथलं ते शांत वातावरण, गंभीर प्रेक्षक, बाहेर पादत्राणं काढून जाण्याची शिस्त या सगळ्याचा परिणाम चित्रपट ही एक पवित्र आणि गंभीर कला आहे याची जाणीव करून देण्यात झाला. एन.एफ.ए.आय.सोबतच त्याच्या जवळच असणाऱ्या पुण्यातील एका जुन्या संस्थेचं आकर्षण निर्माण झालं. ती सामान्य माणसाला प्रवेशबंदी असणारी आणि त्यामुळे गूढ वाटणारी जागा आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऊर्फ एफटीआयआय. सामान्य प्रेक्षक म्हणून गेल्या दहा वर्षांत मी केवळ दोनदाच तिथे जाऊ शकले होते. 


गेली दहा वर्षे जागतिक चित्रपट बघतेय. आशय फिल्म क्लबची मेंबर होते. सोशल मीडियावर आणि नंतर प्रिंट मिडियातून चित्रपट विषयक लिखाण करायला लागले तेव्हा जाणवलं की आपल्याला चित्रपट या माध्यमाविषयी अधिक काही शिकायला हवं आहे. एफटीआयआयमध्ये अनेक वर्षे तीन आठवड्यांचा पूर्णवेळ आणि निवासी फिल्म अॅप्रिसिएशन कोर्स घेतला जातो. या कोर्सच्या स्वरूपामुळे हा कोर्स करणं सगळ्यांनाच जमणारं नाही. पण २०१७पासून एफटीआयआयने विविध शॉर्ट कोर्सेस सुरू केले आहेत. त्या अंतर्गत पाच वीकेंड्सचा हा छोटा फिल्म अॅप्रिसिएशन कोर्स जाहीर झाला आणि चटकन तो करण्याचा निर्णय घेऊन टाकला. पाच वीकेंड्स दररोज चारपाच तास एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून घालवायला मिळणार होते. प्रोफेसर अमित त्यागी एफटीआयआयचे डीन आहेत. ते या कोर्सचे मुख्य प्रवर्तक होते. त्यांच्या पहिल्याच व्याख्यानाने याची जाणीव करून दिली की चित्रपट ही एक भाषा आहे आणि ही भाषा अतिशय सजगपणाने जाणीवपूर्वक शिकायला हवी. प्रोफेसर अमित त्यागी हे साठीच्या वयाचे, प्रभावी व्यक्तिमत्त्व असणारे शिक्षक आहेत. ते अतिशय परखड आणि सुंदर इंग्रजी बोलतात. त्यांचा जागतिक सिनेमाचा अभ्यास उत्तम आहेच पण मुख्य प्रवाहातील हिंदी सिनेमा आणि हिंदी चित्रपट संगीत याविषयी त्यांची नजर अपवादात्मक खुली आणि सकारात्मक आहे. त्यांच्या सकारात्मकतेचा प्रभाव संपूर्ण कोर्सवर आणि आम्हा विद्यार्थ्यांच्या मनोभूमिकेवर पडला. 

चित्रपट नावाची ही भाषा शिकवण्याचा प्रयास चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या पैलूंमधून सुरु झाला. अवघ्या पाच वीकेंड्समध्ये सिनेमाचा इतिहास, ध्वनी, संगीत - भारतीय सिनेमातील संगीत वारसा, कॅमेरा-सिनेमॅटोग्राफी, संकलन, एका क्लासिक चित्रपटाचे अॅप्रिसिएशन करणे, यशस्वी पटकथा लिखाणाचे पैलू समजून घेणे, एका चित्रपट दिग्दर्शकासोबत त्याचा चित्रपट बघणे आणि त्याच्याशी संवाद साधणे, भारतीय सिनेमातील रससिद्धांत इतक्या विषयांवर व्याख्यानं आणि सेमिनार होते. अमित त्यागी, मधू अप्सरा, करण बाली, संकल्प मेश्राम, देवकमल गांगुली, ललित तिवारी,अमलान चक्रवर्ती आणि समर नखाते या सगळ्यांनी ही व्याख्यानं घेतली. समर नखाते एफटीआयआयचे डीन होते. भारतीय चित्रपटातील रस सिद्धांत हे व्याख्यान त्यांनी घेतलं. यात त्यांनी मुख्यत्वे चित्रपट नावाच्या गोष्टीला सहजतेने घेण्याच्या समाजाच्या प्रवृत्तीवर आणि पॉपकॉर्नपेप्सी कल्चरवर कडाडून टीका केली. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून माणसाने निर्माण केलेला एक सर्वात महत्त्वाचा कलाप्रकार आहे. जो जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करतो. भारतीय चित्रपटाच्या रससिद्धांताचे मूळ भारतीय नाट्यशास्त्रात आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट जगात वेगळा ठरतो. भारतीय चित्रपट भारतीय भोजनाच्या थाळीसारखा आहे; सर्व रसांनी परिपूर्ण आणि एकत्रित. ते परदेशी जेवण नाही, जे कोर्समध्ये वाढले जाते. 

बिमल रॉय यांचे सहकारी आणि बंदिनी, सुजाता, देवदास, अभिमान अशा काही वेगळ्या, अत्यंत यशस्वी चित्रपटांचे पटकथा लेखक असणारे नबेंदू घोष यांच्या कामाविषयी एक दिवसीय सेमिनार झाला. तेव्हा हे जाणवलं की इतके आवडते आणि इतके जवळचे हे चित्रपट आपण लहानपणापासून अनेकदा पाहिले पण यांचे पटकथा लेखक कोण याचा कधीही विचार केला नाही. 

हिंदी चित्रपट संगीतावर पोसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला अतिशय सुखद वाटेल असं लेक्चर करण बाली यांनी दिलं. भारतीय चित्रपटसंगीत हा एक सुंदर वारसा असून त्याची लाज वाटायचं काही कारण नाही. 


सत्यजित रे हे माझे अतिशय आवडते दिग्दर्शक. जगाने भारतीय सिनेमाकडे आदराने पाहिलं ते सत्यजित रे यांच्या चित्रपटांमुळे. त्यांच्या ‘अपराजितो’ या चित्रपटाचे रसग्रहण करणे फार आनंददायी लेक्चर होते. प्रोफेसर देवकमल गांगुली स्वतः एक बंगाली असल्याने कदाचित हे लेक्चर अजूनच खुलले. 


शेवटच्या दिवशी एफटीआयआयचे माजी विद्यार्थी असलेले तरुण दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट दाखवला गेला. कोर्समधल्या बहुतांशी अमराठी लोकांनी पहिल्यांदाच एखादा मराठी चित्रपट पहिला होता आणि तो चित्रपट बघून ते भारावून गेले होते. ते पाहून फार आनंद झाला. 

प्रत्येक शनिवाररविवार वेळेच्या आधीच क्लासला पोचण्याचा माझा प्रयत्न असायचा कारण एफटीआयआयमधले हे मोजके क्षण होता होतील तितके संपूर्ण उपभोगून घेण्याचा माझा प्रयत्न असे. एक मध्यमवर्गी घरातील गृहिणीसाठी सुट्टीच्या दिवशी हा वेळ कोरून काढणं हा जणू एक संघर्षच होता. एफटीआयआय कॅम्पसमध्ये गेल्या गेल्या स्वागत करणारी सुंदर झाडं आणि ग्राफिटीने रंगवलेल्या इमारती आहेत. आकिरा कुरोसावांचा राशोमान आणि सत्यजित रेंच्या अपू ट्रिओलॉजी, ऋत्विक घटक आणि मेघे ढाका तारामधल्या दृश्यांची चित्रं इमारतींवर आहेत. ते बघून आवडते जिवलग भेटल्याचा आनंद होत असे. विस्तीर्ण वड आणि शांततेने वेढलेलं शांताराम पाँड आहे. विस्डम ट्री म्हणून ओळखलं जाणारं डेरेदार आंब्याचं झाड आहे. दर शनिवारी विस्डम ट्रीखाली बसून रियाज करणारा एक चेलोवादक दिसे. हा चेलोवादक असणारा विनोद साउंड विभागाचा विद्यार्थी आहे. चंडीगढहून आलेला आहे. आर्किटेक्ट झालेला हा मुलगा सगळं करिअर सोडून इथं आलाय. त्याच्यासारख्याच चौकटी मोडणाऱ्या अनेक पॅशनेट विद्यार्थ्यांनी हा कँपस भरला आहे. दर वर्षी हजारो प्रवेशअर्ज येतात. फक्त शंभर अर्ज निवडून इथं विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळतो. यातच कुणीतरी नसिरुद्दीन शाह, ओम पुरी विधुविनोद चोपड़ा, राजू हिरानी, संजय लीला भन्साली, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, टॉम अल्टर, मिथुन चक्रवर्ती, सुभाष घई आणि राजकुमार राव असतात, जे आजही या संस्थेत येतात तेव्हा स्टारपणाचं ओझं उतरवून येतात आणि कँटीनमधला चहा मारतात. ही जागा म्हणजे चित्रपटकलेचं गुरुकुल आहे. 

चित्रपट नावाची भाषा शिकायचा माझा हा प्रयत्न फार सुखद आणि समृद्ध करणारा होता. या कोर्समुळे चित्रपट बघायची माझी नजर नक्कीच अधिक प्रगल्भ झाली आहे आणि मी एफटीआयआयच्या प्रेमात पडले आहे.

जुई कुलकर्णी, पुणे
juijoglekar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...