आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युनियर भुजबळ हॅट‌्ट्रिक साधणार की सेना मिळवणार ‘बालेकिल्ला’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव (जिल्हा नाशिक) - सलग दोन वेळा निवडून न येण्याची नांदगाव मतदारसंघांची ‘परंपरा’ माेडून माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ मागील दहा वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर भुजबळांची घट्ट पकड होती. केंद्रात आणि राज्यात बदलेले सरकार, भुजबळ त्रिकुटाच्या मागे लागलेले ईडीचे शुक्लकाष्ठ यामुळे मधल्या काळात आमदार पंकज भुजबळ यांचा जनसंपर्क तुटला. त्याचाच फायदा घेत शिवसेनेचे सुहास कांदे यांनी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंकज हॅट‌्ट्रिक साधतात की राष्ट्रवादीकडील हा मतदारसंघ शिवसेेना खेचून आणते, हे पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे.
 
 
१९९९ मध्ये काँग्रेसचे अॅड. अनिल आहेर येथून निवडून आले होते. त्यानंतर २००४ मध्ये शिवसेनेचे संजय पवार यांनी आहेर यांचा पराभव केला. पवार यांनी मतदार संघात दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता. पक्षाची संघटनात्मक बांधणी करून तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडल्याने २००९ च्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वार्थाने सक्षम उमेदवाराची चणचण काँग्रेसला जाणवू लागली. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शेजारच्या येवला मतदारसंघातील छगन भुजबळ यांना उमेदवारीसाठी साकडे घातले गेले. थोरल्या भुजबळांनी मुलगा पंकज यांचे नाव पुढे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पंकज यांनी २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे पवार यांचा पराभव केला. २०१४ मध्ये चाैरंगी लढतीत पंकज यांचाच विजय झाला, मात्र शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी प्रत्येकी ५० हजारांवर मते घेतली हाेती. यंदा युती झाल्यामुळेे शिवसेना- भाजपचे भुजबळांसमाेर आव्हान असेल.

 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
युती आणि आघाडी झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार पंकज भुजबळ, शिवसेना-भाजपकडून सुहास कांदे, स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास काँग्रेसकडून माजी आमदार अनिल आहेर किंवा त्यांच्या कन्या अश्विनी, भाजपकडून माजी आमदार संजय पवार, सभापती मनीषा पवार इच्छुक आहेत.

 

हे ठरू शकतात प्रचारातील संभाव्य मुद्दे 
२०१३ नंतर पावसाने येथे सातत्याने हुलकावणी दिल्याने धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नांदगावात शेती सिंचनाचा प्रश्न पुढे आला आहे. नारपार योजनेत नांदगावचा समावेश व्हावा ही मागणी येथे जोर धरत आहे. मतदारसंघातील मोठे शहर असणाऱ्या नांदगाव येथील पाण्याच्या प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी करंजवण धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी मिळावे, अशी मागणी आहे. सध्या या शहरात आठ ते दहा दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते. हे मुद्दे या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचे ठरू शकतील.

बातम्या आणखी आहेत...