Home | Maharashtra | Mumbai | Just because of double price im with UPA

माझ्या मिशीला कुणाचं खरकटं नाही; दीडपट हमीभावासाठीच यूपीएसोबत

अशोक अडसूळ | Update - Apr 16, 2019, 08:38 AM IST

' देशाच्या शेतकऱ्यांत मोठी अस्वस्थता आहे. तुम्हाला २३ मे रोजी दिसेल.  '

 • Just because of double price im with UPA

  मुंबई - प्रश्न : हातकणंगलेत या वेळी दोन ‘शेट्टी’ उभे आहेत ?
  शेट्टी : होय. संभ्रम पसरवण्यासाठी माझ्या नावाशी साम्य असलेला मुंबईचा माणूस इथे उभा केलाय. २०१४ च्या निवडणुकीत मला दिलेले ‘शिट्टी’ चिन्ह त्यांना मिळालंय. मात्र मतदार शहाणे आहेत. या वेळी माझ्याकडे शिट्टी नसली तरी ‘बॅट’ हॅट््ट्रिक करणारच. राज्यात महाआघाडी ४० जागा जिंकेल.  प्रश्न : तुमच्या ‘एक नोट, एक व्होट’ ची टिंगल होतेय?
  शेट्टी : करू द्यात. मतदारांकडून निधी घेण्याची मला लाज वाटत नाही. २००२ पासून मी अशाच निवडणुका लढवल्यात. लोकवर्गणी हे मला मिळालेलं प्रमाणपत्र आहे.


  प्रश्न : तुम्ही कारखानदारांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढताय, असा आरोप आहे?
  शेट्टी : भाजपकडे निम्मे साखरसम्राट आहेत. विचारा त्यांना? माझ्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. ऊस आंदोलनामुळे २००४ पासून शेतकऱ्यांना ६५०० कोटींची अधिक एफआरपी (दर) मिळाली. सत्ता असून भाजपला कारखान्यांकडून ती मिळवून देता आलेली नाही. मग साखरसम्राटांच्या जवळचे कोण?  प्रश्न : वसंतदादांचे घर फोडल्याचा तुमच्यावर आरोप आहे ?
  शेट्टी : ‘तुमच्यातला वाद पहिले मिटवा, मग स्वाभिमानीला मतदारसंघ द्या,’ असा आमचा काँग्रेसला आग्रह होता. फक्त सांगलीसाठीच आग्रह नव्हता. बुलडाणा, वर्धा, माढासुद्धा चालला असता. तो प्रश्न काँग्रेसचा होता. वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक अन् माझे मित्रत्वाचे संबंध आहेत.

  प्रश्न : ‘एनडीए’बाहेर पडण्याचे कारण?
  शेट्टी : मी गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे ‘एनडीए’मध्ये गेलो होतो. ते पण दीडपट हमीभाव अन् कर्जमाफीच्या अटीवर. मोदींशीही थेट बोलणं झालं होतं. पुरेसा अवधी देऊनही त्यांनी या अटी पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे मी तीन वर्षांतच मी ‘एनडीए’ सोडली.


  प्रश्न : तुम्हाला लोकांनी तिसऱ्या वेळी का निवडून द्यावे?
  शेट्टी : लोकसभेत मी ४४२ प्रश्न विचारले. ७८ टक्के उपस्थिती राहिली. पाच खासगी विधेयके मांडली. निवडणुकीपूर्वी माझ्या कामांचा लेखाजोखा मतदारांना देतो. या वेळी पण दिलाय. पाच वर्षांत हातकणंगले मतदारसंघात मी ३ हजार कोटी रुपयांहून अधिक विकासकामे केली आहेत.


  प्रश्न : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन आहे?
  शेट्टी : शेतकरी कर्जमुक्ती अन् दीडपट हमीभाव, अशी दोन खासगी विधेयके २०१८ मी संसदेत मांडलीत. ती प्रलंबित आहेत. त्याला विरोधी बाकावरच्या २३ पक्षांचे समर्थन आहे. आमचे सरकार ती मंजूर करेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न सुटतील.


  प्रश्न : शेतीची दयनीय स्थिती आहे, मग राष्ट्रीय आंदोलन का उभे राहत नाही?
  शेट्टी : २०१७ मध्ये देशातल्या २०३ शेतकरी संघटना मोदी सरकारविरोधात एकत्र आल्या. त्यांचे फेडरेशन बनले. या संघटनांनी देशात १० हजार किमीची किसान मुक्ती यात्रा काढली. संसदेला १० लाख शेतकऱ्यांचा घेराव घातला. देशाच्या शेतकऱ्यांत मोठी अस्वस्थता आहे. तुम्हाला २३ मे रोजी दिसेल.

Trending