आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Justice Is Not Instantaneous, Justice Will Be Lost Credibility Due To The Spirit Of Rebel

न्याय तत्काळ होत नसतो, सुडाच्या भावनेमुळे न्याय चारित्र्य गमावेल; निकालास लागत असलेल्या विलंबावर फेरविचार करण्याची गरज

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ लखनऊमध्ये दोन बहिणींनी अशी निदर्शने केली. - Divya Marathi
बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ लखनऊमध्ये दोन बहिणींनी अशी निदर्शने केली.

जोधपूर : न्याय कधीच तत्काळ होत नसतो. हा न्याय जर सुडामध्ये दिसू लागला तर न्यायतत्त्वाच्या चारित्र्यालाच धक्का पोहोचेल, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटले आहे. शनिवारी राजस्थान हायकोर्टाच्या इमारत उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आजच्या काळात न्यायाला होत असलेल्या विलंबावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतिपादित करून न्याय जेव्हा आपले वैशिष्ट्य गमावतो तेव्हा तो सुडाचे रूप घेतो, असे न्या. बोबडे म्हणाले.

सरन्यायाधीश म्हणाले, देशात गेल्या काही दिवसांत ज्या घटना घडल्या त्यावरून सर्वत्र गांभीर्याने विचार आणि चर्चा सुरू आहे. गुन्हेगारीच्या प्रकरणांत न्यायप्रणालीत निकालास विलंब होत असल्याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची गरज आहेच. अशी प्रकरणे निश्चित कालावधीत निकाली काढण्यावर विचार केला पाहिजे. परंतु, न्याय तत्काळ मिळावा, असे मात्र होऊ शकत नाही.

उन्नाव पीडितेचे वडील म्हणाले : 'हैदराबाद चकमकी'प्रमाणेच माझ्या मुलीला न्याय मिळावा

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे जिवंत जाळण्यात आलेल्या बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांनी हैदराबाद एन्काउंटरसारखाच न्याय मागितला आहे. पीडितेचे वडील शनिवारी म्हणाले, मला मदत नकोय. पोलिसांनी हैदराबादेतील एन्काउंटरप्रमाणे आरोपींना गोळ्या घालाव्यात किंवा फासावर लटकवावे. पीडितेच्या भावानेही हीच मागणी केली. दरम्यान, योगी मंत्रिमंडळातील दोन मंत्री कमल राणी वरुण, स्वामी प्रसाद मौर्य आणि खासदार साक्षी महाराज पीडितेच्या घरी गेले तेव्हा त्यांना लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. या नेत्यांचा काफिला पुढे सरकला तेव्हा ग्रामस्थ मोठ्याने ओरडून विचारत होते, आता का आला आहात? काँग्रेसच्या प्रियंका गांधींनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर मायावती यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली.

पाच आरोपी १४ दिवसांसाठी तुरुंगात

बलात्कारपीडितेला जिवंत जाळणाऱ्या ५ आरोपींना गुरुवारी उशिरा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

निर्भयाच्या दोषीचा नवा पवित्रा : विनय शर्माने केली दया अर्ज मागे घेण्याची विनंती

निर्भया हत्याकांडातील चार दाेषींपैकी विनय शर्मा याने राष्ट्रपतीकडे असलेला दयेचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. विनयने आपले वकील ए. पी. सिंह यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, या दयेच्या अर्जावर त्याची स्वाक्षरी नाही. त्याच्या सहमतीविना हा अर्ज पाठवण्यात आला, हे षड‌्यंत्र आहे. वकिलाने दावा केला की, विनयने अद्याप त्याच्याकडे असणाऱ्या सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर केलेला नाही. विशेष म्हणजे हा दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस दिल्ली सरकार आणि गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे केली आहे.

सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची घोषणा केली. तसेच त्या कुटुंबाला २५ लाख रुपये भरपाई आणि घर देण्यात येईल.
 

बातम्या आणखी आहेत...