आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रष्टा विचारवंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तात्या टोपे यांच्या जीवनावरील "सत्तावन्नचा सेनानी', राजकीय धुमश्चक्रीवरील "प्रतिनिधी' आदी गाजलेल्या कादंबऱ्या, ध्येयाचा ध्यास, पूर्वग्रह , निरो आदी नाटके, सामाजिक-राजकीय निबंध, कवितासंग्रह... असा चौफेर संचार केलेले वैदर्भीय विचारवंत, लेखक वसंत वरखेडकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त त्यांच्या लेखिका असलेल्या कन्येने केलेले हे स्मरण...
 

सुप्रसिद्ध लेखक  वसंत वरखेडकर (जन्म १० सप्टेंबर २०१८)  हयात असते तर आता १०० वर्षांचे झाले असते. हा विचार मनात आला, की त्यांच्या आठवणी मनात गर्दी करू लागतात. बाबांचे व्यक्तिमत्व इतके धीरोदात्त होते, त्यांचे विचार इतके सुस्पष्ट आणि प्रगल्भ होते की फक्त आम्हा दोन मुलींनाच नव्हेत, तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच आजही ते दीपस्तंभासारखे दिशा दाखवित आहेत. त्यांच्या प्रेमाने, मायेने जशी आमची व्यक्तिमत्वे फुलली तसेच त्यांच्या पुरोगामी विचारांनी आम्ही वैचारिकदृष्ट्या घडत गेलोे. म्हणूनच ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही म्हण त्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडावी.


ते व्यक्तिस्वातंत्र्याचे इतके खंदे व अंर्तबाह्य पुरस्कर्ते होते,की त्यांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या लेखनात सर्वत्र त्याचे प्रतिबिंब दिसून येते. स्त्री-स्वातंत्र्याबाबतचे त्यांचे विचार तर सदैव काळाच्या चार पावले पुढेच होते. बाबांनी आयुष्यभर विपूल लेखन केले. नाटके, कादंबऱ्या, कथा, ललितलेख, कविता तसेच सामाजिक विषयावरील ग्रंथदेखील. त्यांचे सर्वच लेखन अत्यंत विचारप्रवर्तक ठरले. 


त्यांची सगळ्यात गाजलेली कादंबरी म्हणजे, "सत्तावन्नचा सेनानी'. तात्या टोपेच्या जीवनावरील या कादंबरीने अक्षरश: इतिहास घडवला. या कादंबरीच्या सात आवृत्या निघाल्या. त्यासाठी त्यांना राज्य-पुरस्कार मिळाला. शाळा-कॉलेजांमधून अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यात आला. वरखेडकर व "सत्तावन्नचा सेनानी'.हे जणू एक समीकरणाच बनून गेले. आमच्या नागपूरच्या धरमपेठ येथील घरावर ‘सत्तावन्नचा सेनानी’ असे पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे मोठे म्यूरल लावले होते. त्यामुळे आमचे घरही त्याच नावाने ओळखले जाऊ लागले. आबालवृद्धांच्या मनात या कादंबरीने घर केले.


 बाबांची दुसरी गाजलेली कादंबरी म्हणजे, ‘प्रतिनिधी’. राजकीय विषयावरील या कादंबरीचे हिंदी व गुजराथी भाषेतही अनुवाद झाले. मराठी वाचकांच्या व जाणकारांच्या आजही ती चांगलीच स्मरणात आहे. बाबांची चौथी कादंबरी "आई याज्ञवल्क्याची' ही स्त्री-स्वातंत्र्याचा अत्यंत ठामपणे पुरस्कार करणारी प्रगल्भ विचारांच्या बाबतीत काळाच्या कितीतरी पुढचे पाऊल टाकणारी आहे. या कादंबरीची नायिका मोना ही स्वतंत्र आयुष्य जगलेली एक नटी, आयुष्याच्या परिपक्व टप्प्यावर आपल्या सुनेला म्हणते, सामाजिक नियमांच्या विरुद्ध जीवन मी जगले आहे. कौमार्यात पित्याचे संरक्षण मी घेतले नाही. यौवनात पतीचेही नाही. आता पुत्राचे संरक्षण घेण्याची ही तिसरी अवस्था चालू आहे माझी. पण मुलांनी असं डोळ्यात तेल घालून मला जपावं का? माझ्याकडे येणाऱ्याने माँ, बहन, म्हणतच आले पाहिजे का? व्यक्ति म्हणून आजही माझं स्वातंत्र्य मला महत्त्वाचं वाटतं.


बाबांच्या प्रत्येक साहित्यकृतीचा विषय हा अतिशय लक्ष्यवेधी असायचा. त्यांनी ध्येयाचा ध्यास, पूर्वग्रह व राजपुत्र ही सामाजिक नाटके व नीरो आनंदीबाई व सत्तावन्नचा सेनानी (रंगावृत्ती) ही ऐतिहासिक नाटके लिहिली. त्यांच्या राजपुत्र या नाटकाचा विषय नटसम्राटशी खूपच मिळता जुळता होता. पण ते नटसम्राटच्या दहा वर्ष आधी लिहिले गेले होते. व त्याचे रंगभूमीवर प्रयोगही झाले होते. त्यांच्या ‘नीरो’ नाटकामधून त्यांनी रोज जळत असताना फिडल वाजवीत बसणाऱ्या ‘नीरो’ या रोमन सम्राटाच्या व्यक्तिमत्वावर वेगळाच प्रकाश टाकीत मांडले होते की ‘नीरो’ला अत्यंत गलिच्छ असणारे ‘रोम’ शहर सुंदर करायचे होते. पण त्यासाठी त्याच्याच सैन्याधिकाऱ्यांनी त्याच्या नकळत रोमला आगीच्या हवाली केले. त्यामुळे तो अतिशय व्यथित झाला. ती वेदना असह्य होवून नीरोने फिडलमधून (व्हायोलिनमधून) आर्त सुरावटी छेडून आपल्या भावना व्यक्त केल्या. कारण तो क्रूरकर्मा नसून हळव्या संवेदनाशील मनाचा कलावंत होता.


‘आनंदीबाई’ या नाटकात "ध' चा "मा' करणाऱ्या कपटी समजल्या जाणाऱ्या आनंदीबाईचे वगळेच रूप बाबांनी रंगवले होते. त्यांच्या मते, उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांच्या मदतीने असेही सिद्ध करता येते की आनंदीबाई ही प्रेमळ व कर्तव्यदक्ष पत्नी होती. तिने राघोबादादांना खुनाच्या आरोपातून वाचवण्यासाठी "ध' चा "मा' ही कपोलकल्पित गोष्ट रचून आळ स्वत:वर घेतला. राघोबादादांच्या नंतर त्यांची १५० स्त्रियांची नाटकशाळा तिने मरेपर्यत सांभाळली.


वसंत वरखेडकर हे एक विचारवंत होते. त्यांचा "सार्वभौम' हा ग्रंथ आदर्श समाजव्यवस्था व राजकीय परिस्थितीवर सखोल भाष्य करतो. आणीबाणीच्या काळात त्यांनी आपल्या लेखनातून आणीबाणीचा कट्टर विरोध केला. लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणीबाणीच्या विरोधात त्यांनी अनेक कविताही लिहिल्या. जेष्ठ नागरिक रहिवासासाठी त्यांच्या ठाम कल्पना होत्या. त्यानुसार मोठ्या योजना त्यांनी आखल्या होत्या. हे काम जरी त्यांच्या हातून पूर्ण झाले नाही तरी त्यांच्या कल्पनेवर आधारित अनेक ज्येष्ठ नागरिक निवास योजना आज प्रत्यक्षात उतरलेल्या बघताना त्यांच्या दूरदृष्टीची व मूलभूत विचारांची प्रचिती येते. आजही नागपूरात त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ज्येष्ठ नागरिक मंडळे कार्यरत आहेत.


बाबांचे विचार जेवढे उच्च व प्रगल्भ होते ; तितकेच त्यांचे आचरणही स्वच्छ व उदात्त होते. अन्याय त्यांनी कधी केला नाही. व सहनही केला नाही. कोणत्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा त्यांना कधीही मान्य नसायचा. आमच्या स्वत:च्याच घरातील रेंट कंट्रोल अॅक्टमध्ये अडकलेला फ्लॅट दिवंगत काकांच्या कुटुंबासाठी सोडवताना त्यांनी एकही पैसा लाच न देता, ती केस नऊ कोर्टातून स्वत: लढवली व जिंकली. त्यांच्यामध्ये तत्वासाठी कडवी टक्कर घेण्याची हिंमत व जिद्द होती. त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी होती.


मी व माझी धाकटी बहीण डॉ. दीपा नाईक, आम्हा दोघी बहिणींना वाढवताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. उलट आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले. मुली म्हणून कोणत्याही प्रकारची बंधने कधीच लादली नाहीत. मला स्वीमिंग कॉस्च्युम व पहिले लिप्स्टिक त्यांनीच आणून दिले. नृत्य शिकण्यासाठीही त्यांनीच प्रवृत्त केले. कथ्थक नृत्याचे शिक्षण मी त्यांच्याच प्रेरणेने घेतले. लेखनाचा वारसा त्यांच्याकडून  मिळालेला असला तरी वृत्तपत्र व्यवसायाचे शिक्षण घ्यावे हे त्यांनीच सुचवले. माझ्या बहिणीलाही डॉक्टर बनण्यासाठी त्यांनीच प्रवृत्त केले.


ते अत्यंत शांत संयमी व समजूतदार होते. त्यांच्या तोंडून मोठमोठ्याने रागवणे वा आरडाओरडा आम्ही कधीच ऐकला नाही. आमची चूक झाली तरी ते समजावून सांगत असत. त्यामुळे त्यांच्याशी कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलण्यास आम्हाला कधीच संकोच वाटला नाही. 
कुणी दांभिक वागावे, खोटे बोलले तर मात्र त्यांना सात्विक संताप येत असे. पण कितीही संताप आला तरी लुच्चा, लफंगा, बदमाश, याशिवाय अपशब्द त्यांच्या तोंडून कधीच बाहेर पडले नाहीत.


माझ्या आईच्या पूर्वाश्रमीची लीला मनोहर, हिच्या फक्त ४६व्या वर्षी झालेल्या अपमृत्यूनंतर सिंधू बोरवणकर या त्यांच्या कॉलेजातील सहाध्यायिनीशी त्यांनी दुसरा विवाह केला. पण त्यापूर्वी आम्हा दोघींची मने दुखावू नयेत व आम्हाला आईचे प्रेम व माहेरची माया आणि ऊब मिळावी याची पुरेपूर काळजी घेतली. कै. सिंधूताईंनीदेखील हे नाते शेवटपर्यंत उत्तम निभावले.


आमच्यावर झालेले बाबांच्या विचारांचे व मायेचे संस्कार कधीच न पुसणारे आहेत. तसेच एक थोर विचारवंत लेखक म्हणून त्यांनी जनमानसावर उमटवलेला ठसा देखील तेवढाच अविस्मरणीय आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


लेखिकेचा संपर्क : ९४२३५७७६८१

 

बातम्या आणखी आहेत...