आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची महती !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका नामांकित क्लासमध्ये मराठी व समाजशास्त्र विषय शिकवत असतानाचा प्रसंग. मी इयत्ता दहावीच्या वर्गावर मराठीचा तास घेत होते. त्यादिवशी मी फ. मुं. शिंदे यांची ‘आई’ ही कविता शिकवत होते. ‘पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप.’ असे संस्कार करणा-या ‘श्यामच्या आई’ची गोष्ट सांगितली. विश्वासाठी पसायदान मागणा-या संत ज्ञानेश्वरांना माउली का म्हणतो ? याचा अर्थ उलगडत ‘आई’ ही कविता शिकवत होते. मध्येच माधव ज्युलियन यांची ‘प्रेमस्वरूप आई’ बहिणाबाईची ‘माय माय म्हणता’ यासारख्या कवितांचा आधार घेत मी फ़. मुं. शिंदे यांच्या ‘आई’ या कवितेतील भावार्थ उलगडून दाखवत असताना ‘पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात’ ही कवितेची ओळ पूर्ण करून पुढील ओळ म्हणण्यापूर्वीच मागच्या बाकावरून रडण्याचा आवाज आला. मी शिकविण्याचे थांबवून वर्गावर नजर फिरवताच सोनाली फर्नांडिस नावाची विद्यार्थिनी खाली मान घालून रडताना दिसली. मी तिच्याजवळ गेले.
तिला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु ती काही रडणे थांबवू शकली नाही. तेव्हा तिच्या दोघी-तिघी मैत्रिणी म्हणाल्या, ‘बाई, तिला आई नाही म्हणून तिला तिच्या आईची आठवण आली.’ त्यादिवशी सोनालीचे रडणे काही करता थांबले नाही आणि मला पुढील कविता शिकविणे शक्य झाले नाही. फ.मुं. शिंदे यांच्या ‘आई’ या कवितेचे मोल जन्माला येणा-या प्रत्येक जीवासाठी कसे आणि किती आहे ? हे सांगणे खरंच अशक्य आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फ. मुं. शिंदे यांनी भूषवले याचा आनंद आम्हा साहित्य रसिकांना तर आहेच पण त्याचबरोबर समस्त मातांनाही झाला आहे. वीस ओळींची ‘आई’ कविता शिकविण्यासाठी मला दोन तास लागले. परंतु त्या दोन तासांनी अन् आई कवितेने मला जे काही दिले ते शब्दांच्याही पलीकडचे होते. त्यादिवशीच मी फ. मुं. शिंदेच्या लेखणीला मनोमन सलाम केला होता. आईची महती थोरमोठ्या लेखक-कवींनीच पटवून दिली आहे. म्हणूनच समर्थ रामदासांनी म्हटले आहे, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी..’