आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी अधिका-यांची तत्परता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी ग्रामीण भागात शाळेत नववीला होतो. वय साधारण पंधराच्या आसपास. आई माझ्याबरोबरच असायची आणि वडील नोकरीनिमित्ताने मुंबईला राहायचे. एक दिवस अचानक वडिलांचे पत्र आले. गावच्या बँकेमध्ये ठेवलेले दहा हजार रुपये काढून आणून मी मुंबईस त्यांना नेऊन द्यावे. माझे वय लहान. एवढी मोठी रक्कम घेऊन आई मला एकट्याला पाठवायला तयार नव्हती. जोखीम तर मोठीच होती, पण काही पर्याय नव्हता. दोन-एक दिवसांतच आईने माझी प्रवासाची पिशवी तयार केली. नोटांचे पुडके काळजीपूर्वक केलेल्या वेष्टणामध्ये पिशवीच्या तळाशी ठेवले आणि त्यावर एक दोन पुस्तके आणि माझ्यासाठी प्रवासातले खाणेपिणे वगैरे. देवाला पुन:पुन्हा नमस्कार करून, आईच्या पाया पडून एसटी स्टँडवर आलो. मुंबईला जाणारी एसटी तयार होती. मी खिडकीजवळची जागा पकडून पिशवी मांडीवर घेऊन बसलो. तेवढ्यात मला एक मित्र भेटला. तो मला म्हणाला : बरेच दिवसांनी भेटलास. चल, चहा घेऊ या का आपण ? न जाणो नंतर गर्दी झाली तर आपल्याला बसायला खिडकीशेजारची जागा मिळणार नाही या विचाराने मी पिशवी सीटवरच ठेवली आणि आम्ही चहापानासाठी टपरीवर गेलो. चहापानानंतर गप्पा मारत आम्ही परत येऊन पाहतो तो एसटी तिथे नव्हती. मला घाम फुटला. मी तिथेच चौकशी केली तर मला कळले की एसटी नुकतीच गेली. मला काही सुचेना. एसटीच्या पुढच्या थांब्याचे गाव साधारण दहा मैल अंतरावर होते. गावचे पोस्ट बाजूलाच होते. मी त्या गावच्या एसटी स्टँडचा दूरध्वनी क्रमांक चौकशी करून शोधून काढला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. तिथल्या अधिका-यांना सर्व माहिती देऊन पिशवी काढून ठेवण्याची विनंती केली. जवळच्याच सायकलच्या दुकानातून सायकल भाड्याने घेतली आणि जिवाच्या आकांताने सायकल दामटीत घाबरलेल्या अवस्थेत एसटीच्या अधिका-यांसमोर दीनवाणा होऊन उभा राहिलो.माझी चौकशी करून त्यांनी पिशवी परत दिली. त्यांचे सहकार्य मोलाचे होते.