आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कदम कदम बढाये जा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आरण’ म्हणजे युद्धभूमी. युद्धं फक्त सीमेवरच घडतात, असा ज्यांचा समज असेल तो असो! गेल्या काही वर्षांपासून आपल्या सर्वांवर जे दृश्य-अदृश्य युद्ध लादलं गेलंय त्याच्याशी चार हात करण्याची वेळ नजीक येऊन ठेपलीय, हे हरघडी जाणवत होतंच. पहिल्या सदरापासूनच मग हे ‘आरण’ माझा अविभाज्य हिस्सा झालं. कविता लिहिण्याइतकंच ते मला जखमी करू लागलं नि जखमा भरूही लागलं. युद्धभूमीवर हल्ला करणं आणि प्रतिहल्ल्यात जखमी होणं हे टाळता येत नाही...


स्थितिवादी मध्यमवर्गीय मानसिकतेला ‘अच्छे दिन’ हे स्लोगन घेऊन धर्माची, संस्कृतीची, इतिहासाची, गतकातरतेची गुंगी देणारा आणि स्वतःला प्रेषित वगैरे समजणारा प्रधानसेवक अवतरतो. कष्टकऱ्यांपासून स्त्रीवर्गापर्यंतच्या सर्वच माणसांना खातेऱ्यात लोटू पाहतो, तेव्हा केवळ लिहिणाऱ्या माणसानेच नव्हे, तर या  हवेत जगणाऱ्या सगळ्यांनीच राजकारणविरहित असणं म्हणजे एका अर्थी सामूहिक आत्महत्या करण्यासारखं आहे...

 

बघता बघता २०१८ हे वर्ष संपत आलं. ‘अर्वाचीन आरण' या सदरातला माझा हा शेवटचा लेख. तो लिहीत असताना, मनात काहीशा संमिश्र भावनांचा कल्लोळ आहे. पण सर्वात गडद ठसा आहे तो, या सदराच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या वाचकांशी सातत्याने बोलता आलं, त्या संवादाचा. सदराचा रविवार वाचकांच्या फोननेच उजाडू लागला. येणारे फोन हे अक्षरशः इतक्या वेगवेगळ्या लोकेशनवरुन आले आहेत आजवर की, मी चाट पडलेय. महाराष्ट्राच्या बहुआयामी भौगोलिकतेची प्रचिती इतक्या तीव्रतेने कधी आली नव्हती, मला. यात हातावर पोट असणारे, शेती करणारे, कुरियर बॉय, वेटर ते फर्ड्या इंग्रजीत ईमेलने प्रतिक्रिया धाडणारे असे अनेक. वकील, प्राध्यापक, डॉक्टर, गृहिणी, पत्रकार ते कॉर्पोरट सेक्टरमधले, नगरसेवक किती म्हणून नावं घ्यावीत? माझ्या कवीलेखक बिरादरीतल्या अनेकांनी माझ्या या सदरावर बारीक लक्ष ठेवलं आणि वेळोवेळी उमेद दिली.

 

तसं तर मी कधीच पॉप्युलर लिहीत नव्हते. मग हा असा इतका प्रतिसाद कसा? या प्रश्नातच अनेक उत्तरं सामावलेली आहेत. नाही म्हणायला, काही काही लेखांवर हेट मेल्सचा मारा झालाच, आणि ते साहजिकही होतं, कारण वर्तमानात आपल्या पायाखाली जळणाऱ्या धगधगत्या वास्तवाविषयी व्यक्त होणं, ही बाब कधीच सोपी नसते. त्यातच आजचा भारतातील काळ अघोषित आणीबाणीचा. अशा काळात अभिव्यक्ती करता येणं, हीदेखील फार मोठी चैन म्हणावी लागेल. तरीही मला हातचं काहीही न राखता लिहिता आलं आणि ते शब्दाचाही बदल न करता छापलं गेलं, सदर प्रसिद्ध झाल्यावर माझी बोटं छाटली गेली नाहीत, माझ्यावर अॅसिड फेकण्यात आलं नाही, मला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या नाहीत, यासाठी मी कृतज्ञता बाळगावी की आनंद मानावा? लेखणी चालवल्याची किंमत म्हणून ज्यांच्या वाट्याला हे दु:खभोग आले त्या माझ्या कुळातल्या महानुभावांची यादही या क्षणी मला तीव्रतेने येते आहे. कधी कधी तर फरक फक्त ‘मी सुपात आणि ते जात्यात होते’ इतकाच आहे, असंही वाटून गेलंय.  वस्तुतः खूप काही आधीच ठरवून, नियोजनपूर्वक वगैरे लेखनकामाठी करणाऱ्यांपैकी मी नाही. त्यामुळे ‘दिव्य मराठी रसिक’च्या संपादकीय टीमकडून मागच्या डिसेंबरमध्ये विचारणा झाली, तेव्हा जरा साशंक होते. कामाच्या अनेक ठिकाणी गुंतलेल्या हातातून इतक्या नियमितपणे लेखन होईल का, हा प्रश्न गंभीरपणे पडला होता. मुळात सदर लिहिणं ही सोपी गोष्ट नाहीये. तशी तर कुठलीच गोष्ट मला सोपी वाटत नाही. पण अगदी खरं सांगायचं, तर आपल्या भोवतालात ज्या ज्या घटना घडल्या, ज्यांनी ढवळून काढलं, आपल्या सगळ्यांना त्या घटनांनीच मला लिहितं ठेवलं वर्षभर. असत्याचा एक आकर्षक पडदा असा, काही भव्यदिव्य स्वरूपात झगमगत ठेवला गेला आहे, आपल्यासमोर की पलीकडचं काही दिसूच नये, याची भक्कम सोय व्हावी! मी तो पडदा थोडासा का होईना बाजूला सारण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यातून काय दिसतंय, जाणवतंय ते मांडू पाहिलं. धैर्य दे अन् नम्रता दे / पाहण्या जे जे पाहणे / वाकू दे बुद्धीस माझ्या / तप्त पोलादाप्रमाणे... ही मर्ढेकरांची प्रार्थना मीच केली माझ्यासाठी, आणि समस्त लिहित्या-बोलत्या हातांसाठीही. ‘भावनेला येऊ दे गा, शास्त्र काट्याची कसोटी' हे त्यांचेच उद््गार पुन्हा पुन्हा आठवत राहिले मी; भावना उचंबळून येण्याचा संसर्गजन्य रोग पसरण्याच्या आजच्या काळात. 

 

‘अर्वाचीन आरण'मधले काही लेख वाचून मला माझ्या एका ज्येष्ठ हितचिंतकाचा काळजीने फोन आला. ‘तुझ्यासारख्या कवयित्रीने असं उघड उघड राजकीय लेखन करू नये' असं सांगणारा. मला सतर्क करणारा. मला त्यांची काळजी समजत होती. मात्र फिक्शन रायटरने थेट राजकीय म्हणवल्या जाणाऱ्या विषयांवर लिहावं का? हा जो त्यांचा प्रश्न होता तो काही मला मान्य होत नव्हता. राजकीय लेखनात भूमिका घ्यावी लागते आणि अनेकांना अशी रोखठोक भूमिका घ्यायचीच नसते, कारण ती त्यांना अडचणीची ठरू शकते हे त्याचं एक सरळसोट कारण आहे. मराठी सांस्कृतिक विश्वात तर हे चित्र फारच ठसठशीतपणे दिसतं. पण ‘भूमिका न घेणं' हीदेखील राजकीय भूमिकाच असते, जी प्रस्थापित - ‘जैसे थे’वादी ढाचा टिकवून ठेवायला सिमेंटचं काम करत असते. खरं तर लिहिणारा प्रत्येक माणूस हा राजकारण लिहीत असतो. मुद्दा इतकाच आहे की तो कोणतं आणि कुणाचं राजकारण पुढे आणतो आणि कुणाकुणाचं मागे ढकलतो? उदाहरणार्थ, आपल्याकडे जे जे लोकप्रिय म्हणवलं जाणारं साहित्य आहे अथवा चित्रपट, नाटकं किंवा विविध वाहिन्यांवरून रतीब घातल्यासारख्या तिन्ही त्रिकाळ तुडुंब वाहणाऱ्या आणि आपले पाय पसरणाऱ्या कौटुंबिक मालिका असोत त्यात काय कमी राजकारण असतं? जीर्णशीर्ण परंपरेची अतिभडक भलामण व गौरवीकरण, मध्यमवर्गीय मानसिकतेला अस्थिर करणारी कुठलीही घटिते जवळपासही फिरकू न देणं, चटपटीत परिवर्तन, माफक विरोध, कृतक व पृष्ठस्तरीय संघर्ष हा मालमसाला ठासून भरलेल्या लोकप्रिय कलादि-साहित्यात चुकूनही राजकारण नसण्याचं राजकारण असणं किंवा असलंच तर वेष्टनातून प्रक्षेपित होईल इतकंच असणं, हे आपल्या हाडीमांसी खिळलेलं आहे. ग्राहकवादावर पोसलेलं आपलं ‘कल्चर' - अंबानींच्या मुलीच्या लग्नातली अतिश्रीमंतीची रसभरित वर्णने वाचतो/पाहतो आणि अमिताभ बच्चनपासून आमीर खानपर्यंत तिथे कसे वाढपी होते, याविषयीच्या व्हिडिओ क्लिप्सना लाखो हिट्स मिळवून देतं. एकूणच भौतिक वस्तुमात्रांपासून ते मानवी नातेसंबंधांपर्यंतचा सगळा पट सांस्कृतिक बराकीकरणाच्या त्याच त्या संकेतात गोठवून ठेवला जातो, आपल्या लोकप्रिय रचितांमधून. 

 

याच स्थितिवादी मध्यमवर्गीय मानसिकतेला ‘अच्छे दिन’ हे स्लोगन घेऊन धर्माची, संस्कृतीची, इतिहासाची, गतकातरतेची गुंगी देणारा आणि स्वतःला प्रेषित वगैरे समजणारा प्रधानसेवक अवतरतो. त्याच्या पोतडीतून एखाद्या विध्वंसक, सर्वसंहारक अण्वस्त्राप्रमाणे एका पाठोपाठ एक योजना काढतो आणि सर्वांगसुंदर भारतीयत्वाच्या संकल्पनेला नख लावू पाहतो. कष्टकऱ्यांपासून, शेतकऱ्यांपासून, आदिवासी, भटक्याविमुक्त समूहांपासून ते तमाम स्त्रीवर्गापर्यंत अशा सर्वच माणसांना खातेऱ्यात लोटू पाहतो, तेव्हा केवळ लिहिणाऱ्या माणसानेच नव्हे, तर या जमिनीवर, या हवेत जगणाऱ्या सगळ्यांनीच राजकारणविरहित असणं म्हणजे एका अर्थी सामूहिक आत्महत्या करण्यासारखं आहे. 

 

त्यामुळेच सदराच्या प्राथमिक जुळवाजुळवीत असताना काय लिहायचं नाही. हे कुठे तरी मनाशी नक्की होत गेलं. ‘अर्वाचीन आरण’ हे सदराचं शीर्षक माझ्याच एका कवितेतून फाट्कन प्रकाश पडल्यासारखं सुचलं आणि त्याच वेळी सदराचा चेहरा-मोहराही माझ्यासमोरून तरळून गेला. ‘आरण’ म्हणजे युद्धभूमी. युद्धं फक्त सीमेवरच घडतात, असा ज्यांचा समज असेल तो असो! गेल्या काही वर्षांपासून आपल्या सर्वांवर जे दृश्य-अदृश्य युद्ध लादलं गेलंय त्याच्याशी चार हात करण्याची वेळ नजीक येऊन ठेपलीय, हे हरघडी जाणवत होतंच. पहिल्या सदरापासूनच मग हे ‘आरण’ माझा अविभाज्य हिस्सा झालं. कविता लिहिण्याइतकंच ते मला जखमी करु लागलं नि जखमा भरुही लागलं. युद्धभूमीवर हल्ला करणं आणि प्रतिहल्ल्यात जखमी होणं हे टाळता येत नाही. या सदरातून माझा अनेकदा काहीसा तिखट सूर लागलेला आहे. २०१९च्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. मध्य भारतात झालेल्या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची मोठी हार झालेली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेली हार मोठी कशी, असं कुणी विचारू शकतं. कारण या दोन्ही राज्यात काँग्रेसला जेमतेम बहुमत मिळालेलं आहे. पण या राज्यात काँग्रेसचा मुकाबला फक्त भाजपशीच होता, असं मला वाटत नाही. हा मुकाबला भाजपच्या ताकदवान सत्तायंत्रणेशी तर होताच, पण त्याहीपेक्षा तो भाजपच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या विक्राळ भांडवलाशी आणि मुख्यतः भांडवली प्रसारमाध्यमांशी होता. या वर्षभरात झालेल्या चार महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला काँग्रेसने धूळ चारली आहे. तसं तर याची सुरुवात २०१७च्या डिसेंबरपासून झाली. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश यांची ताकद जोडून घेत उभ्या राहिलेल्या काँग्रेससमोर गुजरातचा गड राखता राखता भाजपला अक्षरशः घाम फुटला होता. तिथे अखेर भाजपला जेमतेम बहुमत मिळालं. २०१९ची लोकसभा निवडणूक उण्यापुऱ्या तीन-चार महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पराभव होणं, ही देशातील संविधानात्मक लोकशाही वाचवण्याची केवळ पहिली पायरी आहे. पण देशाच्या इतिहासात अशी वेळ क्वचितच येते, जेव्हा एका प्राथमिक पायरीचं महत्त्व अतोनात वाढतं. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेचं ‘कदम कदम बढाये जा, ख़ुशी के गीत गाये जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पर लुटाये जा' हे समरगीत आज कधी नव्हे इतकं प्रस्तुत झालेलं आहे! एका कवयित्रीला आपल्या लेखमालेचा शेवट समरगीताच्या ओळी आळवून करावा लागतो, यावरून परिस्थितीचं गांभीर्य कळून यावं! (समाप्त)

बातम्या आणखी आहेत...