आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या गावगाड्याचे सांस्कृतिक समाजशास्त्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैलास अंभुरे  

नुकतेच प्रकाशित झालेल्या लेखक राजन गवस यांच्या ‘लोकल ते ग्लोबल’ मधील सर्वच लेख ग्रामसंस्कृतीचे आचके मांडतात. गावांच्या दुराग्रही प्रगतीचा आलेख मांडत भ्रमित विकासाचे भान देतात. गावगाड्यातील बदलत्या सांस्कृतिक समाजशास्त्राची कथा आणि व्यथा मांडत वाचकांना अस्वस्थ करतात.
 
कधी काळी शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा, गावं ही पेशी, नद्या या धमण्या अन् खेड्यापाड्यातली माणसं ही घनास्त्रपेशी होती. तो काळ घनास्त्रपेशींनी (हजारो माणसांनी) आत्महत्या करण्यापूर्वीचा अन् धनास्त्रपेशींच्या उपरेपणाचा होता. ज्या काळात गावं सक्षम होती. तेथे अभाव असूनही एकजीवत्वाचा भाव होता. ह्या खेड्यांचे चरित्र आजपर्यंत अनेकांनी अनेक पद्धतींनी मांडले. कुणाला खेडे शोषणाचे केंद्र वाटले, तर कुणाला समूहभावाने जगणारे ममताळू गाव वाटले. पण खेड्याचा अन् गावगाड्याचा गांभीर्याने शोध घेत, शंभर वर्षापूर्वी त्रिं. ना. आत्रे यांनी ग्रामव्यवस्थेचे चेतनाशास्त्र ‘गावगाडा’द्वारे मांडले. यानंतर शंभर वर्षांनी उल्का महाजन यांनी ‘कोसळता गावगाडा : २०१५’ व अनिल पाटील-सुर्डीकर यांनी ‘गावगाडा : शतकानंतरचा’ मांडून शतकातील वादळी स्थित्यंतराचा वेध घेतला. अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांनी मध्यावधीमध्ये ‘महाराष्ट्राची ग्रामीण रचना’ समजून घेत गावगाड्याच्या स्वयंपूर्णतेचं माध्यम असलेल्या शेतीमाणसांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांची म. भा. जगताप यांच्या मदतीने ‘गावरहाटी’ मांडली. मागे काही दिवसांपूर्वी पत्रकार तथा लेखक आसाराम लोमटे यांनी आजच्या गावगाड्याच्या अस्वस्थतेची ‘धूळपेर’ केली. अलीकडे लेखक राजन गवस यांनी बदलता गावगाडा ‘लोकल ते ग्लोबल’ या लेखसंग्रहातून सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्रागतिक (की वाताहातिक?) व भाषिक अंगाने मांडला आहे.

गावगाडा म्हटलं की काळी-पांढरी, जातिव्यवस्था, बलुतेदारी, आलुतेदारी या गोष्टी  प्रथमत: डोळ्यासमोर येतात. वास्तवात ‘पांढरीवर वस्ती करून काळीची मशागत करून, त्यात हवे ते धान्य गरजेनुसार पिकवून उपजीविका करणाऱ्या लोकांच्या जगण्यामरण्यातून कृषिव्यवस्था आकारास आली. येथे श्रम केंद्रभागी होते. या श्रमातूनच कृषिजनसंस्कृती विकसित झाली. या कृषिजनसंस्कृतीच्या पोटात अनेक गावगाडे सामावलेले. प्रत्येक गावगाड्याचे स्वरूप भिन्न. हा गावगाडा केवळ माणसांचा असतो असे नाही. गावगाडा हा पशूपक्षी, प्राणी, झाडेझुडपे, किडामुंगी, आळीबळी या सर्वांसह आकाराला आलेला असतो. शेती पिकवण्यासाठी जे जे गरजेचे ते ते सारे गावगाड्यात आपोआपच सामील झालेले.’ हा गावगाडा जगण्याच्यादृष्टीने सक्षम असला तरी तेथे अभावग्रस्तता होती. ही अभावग्रस्तताच गावगाड्याचे सामर्थ्य होती. कारण ‘राजालाही सुईची गरज असते’ हे जीवनाचं साधं तत्वज्ञान. यामुळेच माणसांमध्ये ममत्व होते. जिव्हाळा होता. प्रेम होते. ते एकमेकांच्या जगण्याला बळ द्यायचे. पण हा गावगाडा कालौघात अस्तंगत होणार याचे सूचन आत्रेंनी शतकापूर्वीच केले होते, तर या अस्तंगततेचा, वाताहतीचा प्रवास राजन गवस मांडतात.

ब्रिटिशांनी Society व Caste या संज्ञा लागू केल्याने गावगाड्यात भिंती निर्माण झाल्या. शेती कसणारा तो शेतकरी समूह होता; इथं जातीचा प्रश्नच नव्हता, पण त्यालाही जातीत अडकवल्या गेले. पुढे खरा भारत देश हा खेड्यात असल्याचे जाणून गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’चा तर डॉ.बाबासाहेबांनी ‘शहराकडे चला’चा आदेश दिला. हे दोन्ही परस्पर विरोधी वाटत असले तरी यांनी गावगाड्याच्या पुनर्रचनेला हातभारच लावला. कारण खेड्यातल्या उच्चनिचतेला, जातीयतेला छेद देण्यासाठी, गावकीच्या कामातून माणसांच्या मुक्तीसाठी, शिक्षणाची कास धरण्यासाठी दलितांनी शहराकडे येणं गरजेचं होतं. तर प्रगतीच्या मूलभूत शिक्षण, आरोग्य, शेतीच्या जनजागृतीसाठी संबंधितांनी खेड्यात जाणं आवश्यक होतं. याचा तत्काळात फायदाही झाला; पण आज शहरातही जातींच्या वसाहती-शाळा-महाविद्यालय-विद्यापीठांचे गड निर्माण झाले आहेत आणि खेड्यात गावठी शिक्षणसम्राट, दलाल डॉक्टर, बोगस बी-बिवाळ्यांमुळे ग्रामव्यवस्थाच घायकुतीला आली आहे. परिवर्तन, आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण, हरितक्रांती, विज्ञान-तंत्रज्ञान क्रांतीमुळे आज खेडे, खेडे राहिलेले नाही. खेड्यांच्या देशातच आज खेडीच हद्दपार झाली आहेत. शिक्षणाची गंगा खेडोपाडी आली; आता ती मैली झाली आहे. यामुळेच ‘शिकला तो भकला’ सारखी म्हण प्रचलित झाली. हजार हातांचा ऑक्टोपस गावगाड्याला गिळंकृत करत असल्याचे निरीक्षण राजन गवस नोंदवतात. सोबतच हे का झाले? कसे झाले? काय घडले? काय बिघडले? हे तपासण्याचा, मांडण्याचा ते प्रयत्न करतात.

आपल्या राज्याचा, देशाचा मुख्य आधार शेती होती. शेतकऱ्यांची, बहुजनांची मुलं सत्तेच्या केंद्रस्थानी आले. ते बगळे झाले. हल्लीच्या खेड्यापाड्यातल्या लेखकांनादेखील आपल्या माणसांविषयी, संस्कृतीविषयी लिहिण्याची लाज वाटते. त्यांना ग्लोबल व्हायचं असल्याने मोबाईल, कॉम्प्युटर, स्क्रीन, मॉल, इंटरनेट इ. शब्द जाणीवपूर्वक आणले जातात. यामागे जगण्यापेक्षा प्रचंड रेटा असल्याचे जाणवते. यामुळे गाव-गावस्कीच्या-माणसांच्या चिंधड्या होणं थांबलेलं नाही. यातच वैश्विकीकरणाच्या  रेट्यातून, प्रग‍तीच्या नावाखाली अनेक नव्या गोष्टी गावात, घरात आल्या आहेत, सातत्याने येताहेत. यामुळे ‘गाव बदललं. हळूहळू खेड्यातला समूहभाव कात्रीत सापडला. दिलं की वाढतं हे जीवनसूत्र बाद झालं. पंगतींचं स्वरूप बदललं. चूलबंद जेवण बंद झालं. एकमेकांना मदत करण्यात, एकमेकांची उष्टी–खरकटी काढण्यात कमीपणा वाटू लागला. गावातही केटरिंग वाढलं.’ एवढंच नाही तर घरातली पंगतही आता इतिहासजमा होत आहे. घर, गावातल्या पंगतीप्रमाणेच गावाचं चालतं-बोलतं विरेचनाचं ठिकाण असलेला पानोटा, पार कट्टा नाहीसे झाल्याने माणसं एकमेकांपासून तुटली. घरातली पंगत मोडल्याने कुटुंबातला संवाद आटला अन् ताणतणाव वाढले. पानोटा उरला नसल्याने ‘गावानं दु:ख धुवायचं तरी कुठं? असा प्रश्न निर्माण होतो. गावातला पारही गाव-घर-माणसांचं चालतं बोलतं वर्तमानपत्र होतं. हे सर्व नष्ट झाल्यानं माणसातला संवाद संपला. मन मोकळं होणं, एकमेकांना मदत करणं, सत्ताधाऱ्यांनी पाठीशी असणं ही जीवनप्रणाली इतिहास झाल्याचे निरीक्षण राजन गवस नोंदवतात.

आधुनिकीकरणाच्या प्रचंड वेगवान प्रगतीने दृश्यत: डोळे दिपवून टाकले. नानाविध बदलांनी ग्रामव्यवस्थेला कवेत घेतलं. अनेक नवनवीन संकेत, शब्दांनी मराठी भाषेला समृद्ध केले; पण गावगाड्याच्या जगण्यातून अनेक गोष्टी, शब्द हद्दपारही झाले. खेड्यापाड्यात धाबे, परमीटरूमची संस्कृती उदयाला आल्याने खेड्यात क्वार्टर, हाफ, खंबा, तुंब्या, ब्रँडी, व्हिस्की, रम इ. शब्द रूजले. स्वयंपाक घरातल्या चुली ऐवजी गॅस, शेगडी आल्याने शेगडी, लायटर, सिलेंडर, चिमणी अशा मोजक्या शब्दांनी चूल, भानुसं, वैल, खोपडा, जळण, फुंकणी, आहार, कोळसा, राख, ढेपसा, गवऱ्या आदींची जागा घेतली. पूर्वी पिकांची कापणी, मळणी केली जायची. पण मळणीयंत्र आल्याने खळं, खुरूट, तिवडा, झाडणी, रास या क्रियांसोबतच शब्दही नाहीसे झाले. तद्वतच धुमी, सोंड, मोळ, झाडोरा, चौमाळ, महामूर, पेव, खारकांड, मुराळी, पावणेर, तिरावड, इरलं, आडोळ, गठळी, घुंची इ. बोलींचं, ग्रामव्यवस्‍थेचं स्वत्व-सत्व असलेले शब्द स्मृतिकोशापुरतेच मर्यादित झाले. असे अनेक सांस्कृतिक संचित असलेले शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वस्तू, पदार्थ राजन गवस यांच्या या लेखातून येतात. परिणामी स्मृतिगंधांचा दरवळ वाचकांना समृद्ध करत जातो. तसेच प्रत्येकाच्या मनात भूतकाळ डोकावल्याशिवाय राहात नाही.

एकूणच ‘लोकल ते ग्लोबल’ मधील सर्वच लेख ग्रामसंस्कृतीचे आचके मांडतात. गावांच्या दुराग्रही प्रगतीचा आलेख मांडत भ्रमित विकासाचे भान देतात. गावगाड्यातील बदलत्या सांस्कृतिक समाजशास्त्राची कथा आणि व्यथा मांडत वाचकांना अस्वस्थ करतात.
लेखकाचा संपर्क - ७५८८१६५२२१