आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतींचा चित्रदर्शी ‘मेळा’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक लिहितो म्हणजे काय करतो? स्वत:ला खोदतो खोल खोल. पाठलाग करतो अव्यक्ताचा. एकेका अनुभवाला गाठतो खिंडीत. पकडू पाहतो शब्दांत. हे अव्यक्त अनुभव बऱ्याचदा दुसऱ्यांचे असतात. पण आपण कधीतरी स्वत: स्वत:च्या आत डोकवायला हवं. निदान स्वत:ला निरखून पाहायला तरी हवं. यासाठी तरी किमान दासू वैद्य यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘मेळा’ वाचायला हवं.
 
‘दासू वैद्य हे कवी तथा गीतकार म्हणून सुपरिचित आहेत. त्यांचा ‘मेळा’ हा ललित लेखसंग्रह पॉप्युलर प्रकाशनतर्फे अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. गद्य स्वरुपातील त्यांचं हे दुसरं पुस्तक. यातही कवितेप्रमाणे ते कमालीचे यशस्वी झाले आहेत, असे प्रथमत:च म्हणता येते. कारण एकतर त्यांना मिळालेल्या कॅनव्हासचा ते उत्तम उपयोग करून स्वत:ला सिद्ध करतात. आणि दुसरे म्हणजे वृत्तपत्रीय सदर लेखनाला असलेल्या मर्यादा उल्लंघून ते एक सूत्र कायम ठेवतात. ते सूत्र समकालीन जग व निसर्ग यांच्यातील वाढलेली दरी आणि कृत्रिम जगाचं मानवी जीवनात वाढलेलं प्राबल्य या अंगाने अधिक विस्तारत जातं. त्यांच्या कवितांचा सुद्धा हाच स्थायीभाव आहे. कवितेत सामावू न शकलेले स्वजीवनातील अधिक तरल, सूक्ष्म, निसरडे असे क्षण भावानुभवांचे रूप घेऊन ‘मेळा’द्वारे अवरतात आणि त्याद्वारे पूर्वायुष्यातील कडूगोड स्मृतींचा एक सुंदर गोफ विणला जातो, हे विशेष; पण तो नॉस्टेल्जिक न होता वर्तमानाशी संवादी राहत भविष्याच्या भयकारी चाहुलीचा वेधही घेतो.  
ललित लेखन हा मुक्त आविष्कार असल्याने लेखक दासू वैद्य जीवनातील एका धुसर, स्मृतीच्या खोल गाभाऱ्यात दडलेल्या घटना-प्रसंगांपासून विषयाला प्रारंभ करतात आणि त्यातून क्षणातच रम्य शब्दचित्र/चिंतन साकारले जाते. या चिंतनात समकालीन जगाचे निसर्गापासूनचे तुटलेपण आणि कृत्रिमतेच्या अधिपत्याखाली आलेले ‘बिचारे माणूसपण’ अधोरेखित होते. वर्तमान सामाजिक पर्यावरणात लेखक सभोवतालास भिडत असतांना ‘स्व’शी संवाद साधतो. हा संवाद केवळ एकाकी राहत नाही, वाचकांना त्याचा एक अविभाज्य भाग बनवून चिंतन करण्यास, विचार करण्यास प्रवृत्त करतो. तसेच ‘स्व’ अर्थात लेखक समाज जीवनातील अनेकविध तरंगांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ‘स्व’च्या स्मृतीचे अनेक कोश उकलत जातात. कवी वैद्य यांच्या स्मृतीकोशातील बालपण ते अगदी परवापर्यंतच्या अनेक गोष्टी वाचकांसमोर येतात. तेव्हा एका कवीची, लेखकाची जडणघडण, सृष्टी आणि दृष्टी लक्षात येते.

‘रंग’ या पहिल्याच लेखात लेखक विद्यापीठ हॉस्टेलमधील गोष्टींना उजाळा देत मानवी जीवनातील रंग विभ्रम आणि नाटकातील रसभंगचा वेगळ्या दृष्टीने अन्वयार्थ लावतो. ‘कटिंग’या लेखातून खेड्यापाड्यातील लहान मुलांच्या हजामतीच्या निमित्ताने होणाऱ्या गमती-जमती मांडतो, तेव्हा आपल्या स्मृतीकोशातून अलवारपणे दृक आणि गंध प्रतिमा उजागर होतात. चित्रदर्शी शैली व कवितांमुळे या लेखांना चार चांद लागतात. या कविता इतरांच्या व स्वत: लेखकाच्यादेखील आहेत. यामुळेच कवीने ललित लेखन करण्याला अनन्यत्व प्राप्त होते आणि काव्यमयतेमुळे ‘मेळा’तील लेख भावसघनतेची उच्च पातळी गाठतात.

‘गळा दाबल्याने / गाणे अडते का? / वाढलेल्या काजळीने / ज्योत विझते का?’ या ‘मेळा’च्या उपोद्घातातून समकालीन घडामोडींचे सूचन होते. पेरुमल मुरुगन या तामीळ लेखकाला‘वन पार्ट वुमन’मुळे स्वत:तील लेखकाचं मरण घोषीत करावं लागलं. यामुळे भारतभर उलटसुलट चर्चा झाली... शमलीही. याप्रमाणेच दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या विचारवंतांच्या झालेल्या हत्यांनी देशाचं सांस्कृतिक वातावरण ढवळून नितळलं(?). या पार्श्वभूमीवरील ‘गळा दाबल्याने गाणे अडते का?’ व ‘लांब नाकवाल्याची गोष्ट’ हे लेख येतात. तर ‘गोष्ट लिहिणाऱ्याची गोष्ट’,  ‘न लिहिलेलं पत्र’, ‘पाठलाग आणि प्राप्ती’ हे निखळ वाङ्मयीन पर्यावरण पटलावर समकालीन गुंत्यांची उकल मांडू पाहणारे लेख उत्कटतेबरोबरच चिंतन पातळी गाठतात. नव्यानं काहीतरी लिहू लागलेला एखादा विद्यार्थी ‘तुमच्यासारखं मला लिहायचंय...मोठं व्हायचंय’ची आस घेऊन विद्यापीठात प्रवेश घेतो. कालांतराने राजकारणात जातो. पुनर्भेटीत लेखक त्याच्या लेखनाविषयी प्रश्न करतो तेव्हा “सर, गोष्टी लिव्हायच्या म्हणजे तळ निर्मळ पाहिजे. आपलं पाणी आता लई गढूळ झालंया.” हे त्याचे उत्तर साहित्यकारण आणि राजकारणाविषयी खूप काही सांगून जाते. तद्वतच लेखक तेंडुलकरांना पत्र लिहून ‘बाबा, इकडे सर्व काही क्षेम नाही.’ असे म्हणत दुष्काळ, पोस्टरकारणी, संस्थानिक शिक्षणसंस्था, शेतकरी आत्महत्या, बेकारी, मजूरांचा अभाव यासारखे अनेक प्रश्न मांडतो. सोबतच (तेंडुलकर) तेंच्या आयुष्यातून राजू-प्रियाच्या जाण्याविषयी बोलल्यानंतर “पोरांच्या वस्तू आता मीच वापरतो” हे तेंचं उत्तर वाचकांच्या मनाचा तळ ढवळून काढतं. किंवा “खऱ्या अर्थाने मातीत राबणारा शेतकरी इथे पुरस्कृत झालाच नाही. परत करण्यासाठी त्याच्याजवळ पुरस्कार नाहीत. म्हणून तो जगणंच परत करतोय, लटकलेल्या देहाच्या स्मृतिचिन्हासह.” हे शेतकरी आत्महत्या व जीवित्वाचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पुरस्कार वापसी संदर्भाने येणारे चिंतनशील निरीक्षण प्रज्ञावंतांच्या मेंदूला जागवल्याशिवाय राहत नाही. नाटककार तेंडुलकरांना न पाठवलेले पत्र वा पेरुमल मुरुगन संदर्भाने लिहिलेले पत्र मुळातच वाचनीय आहेत. ‘मेळा’तील अनेक लेखांतून सुरेख व्यक्तिचित्र मुद्रा उमटवून जातात; पण सध्याच्या (मुखपृष्ठावरील रंगांच्या) भडकपणात ‘मेळा’चं झाकोळलं जाणं, हे सांस्कृतिकदृष्ट्या अस्वस्थ करतं.  

साहित्य व कलांप्रमाणेच पांढरपेशी समाजाचं म्हणजेच आपलं बदलेलं जीवनमान आणि सेंद्रीय संवेदनांचं बोथट होणं हा दासूंच्या चिंतनाचा एक पैलू. आनंद मिळवण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तुमय कल्चरने घराचं घरपण जाऊन त्याला बाजाराचं स्वरूप आलं आहे. “या चकचकीत लोणच्यापासून / तयार होते कैरी / हेच दूध नेऊन भरलं जातं / गायी म्हशीच्या आचळात”, असं एक संवेदनांचं (गोठवणारं की जागवणारं?) वर्तमान चक्र लेखक मांडतो. तेव्हा ‘जगण्याच्या धडपडीत बधीर होणं आणि मनस्वी जगताना बेहोश होणं’ यापैकी नेमकं काय? हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. उपरोक्त समाजभानाप्रमाणेच कमालीचं स्त्रीभान हा ‘मेळा’चा आणखी एक विशेष. ‘बाई संभाळ कोंदण’, ‘अरण्यरूदन’ मध्ये स्त्री आणि पुरूष हे दोघेही मानवप्राणीच; पण पुरुषांची वाढत चाललेली दहशत प्रत्येक पुरुषांविषयी स्त्रीच्या मनात अविश्वास 

निर्माण करते. याविषयी लेखक दाखला देतो, “प्रत्येक लाल मुंगी आपल्याला चावत नसते. पण लाल मुंग्या दिसल्या की आपण सावध होतो. कारण लाल मुंगीच्या कडाडून चावण्याची किमान माहिती आपल्या गाठीशी असते. बायका अशाच दचकून असतात पुरुषांच्या बाबतीत.” वरवर पाहता ही वाक्ये सुभाषितवजा वाटतात; पण यामध्ये खोलवर दडलेली अंतर्बाह्य हादरवून टाकणारी चिंतन वेदना आहे, संवेदना आहे. 

स्त्रीरुदन वा स्त्रीदु:ख मांडताना लेखक “बाईचे डोळे सतत पाझरणाऱ्या खडकासारखे असतात.” असं सहज लिहून जातो. वा “बायकांनी विहिरीत सोडलेले पोहरे दगडी भिंतीला लागून वाजतात, फुटतात, गळतात. ते दु:खाचं वाजणं, मनाचं फुटणं आणि डोळ्याचं गळणं असतं.” यासारखी वाक्ये हजारदा विचार करायला लावतात. ‘मेळा’मधील लेखांपैकी ‘मनातलं घर’ या लेखाचा विशेष उल्लेख करावा लागतो. हा लेख वाचताना आपलं गावाकडील घर आणि गदिमांच्या ‘मंतरलेले दिवस’ची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. शेवटी “लेखक लिहितो म्हणजे काय करतो? स्वत:ला खोदतो खोल खोल. पाठलाग करतो अव्यक्ताचा. एकेका अनुभवाला गाठतो खिंडीत. पकडू पाहतो शब्दांत.” हे अव्यक्त अनुभव बऱ्याचदा दुसऱ्यांचे असतात. पण आपण “कधीतरी स्वत: स्वत:च्या आत डोकवायला हवं. निदान स्वत:ला निरखून पाहायला तरी हवं.” यासाठी तरी किमान ‘मेळा’ वाचायला हवं.

लेखकाचा संपर्क - ७५८८१६५२२१

बातम्या आणखी आहेत...